Showing posts with label Theme. Show all posts
Showing posts with label Theme. Show all posts

Sunday, 31 January 2016

भेट वृत्तांत

कुमार निर्माण टीमने (प्रफुल्ल, प्रणाली व शैलेश) मराठवाडयातील गटांना भेटी दिल्या. सर्व गटांनी खूप छान प्रतिसाद दिला. मुलांसोबत खूप मज्जा आली.

डोमरी गट
सगळ्यात पहिली भेट आम्ही डोमरीतील ‘गुरुकुल’ येथील ‘जागृती’ गटाला भेट दिली. गुरुकुलाचा निसर्गरम्य परिसर हेच तेथील मुलांसाठी प्रेरणा आहे. गट निवासी शाळेत राहतो. मुले खूप स्मार्ट आहेत. खूप छान गट आहे. गटातील मुलांनी दिवाळीत बरेच कृतिकार्यक्रम केलेत. दुपारी गटातील सर्व मुले आम्हाला घेऊन शाळेच्या बाजूच्या डोंगरावर गेली. तिकडे पण आम्ही खूप मज्जा केली. थोड्याच दिवसात मुलांची पालकसभा असल्याने त्यासाठी मुले नाच, गाणी, नाटक यांच्या सरावात गुंग होती. आम्हालापण मुलांनी त्यांची नाटकं करून दाखवली.
गुरुकुलातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्व मुले तिथे शिक्षकांना भैय्या, काका, ताई असं म्हणतात. आम्हालाही सर्व मुले ताई-दादा म्हणून आवाज देत होती. सकाळ – संध्याकाळ मुले आमच्यासोबतच जेवायला बसत होती. मुले खूप लाघवी आहेत. दोन दिवसांत त्यांच्याशी छान attachment झाली.

आमची शाळा, खरपुडी

खरपुडीचा गटही निवासी शाळेत राहतो. त्यांचा परिसर खूप सुंदर आहे. गटात लहान-मोठी सगळीच मुले एकत्र छान काम करतात. गटातील मुलांनी सांडपाण्यावर खूप सुंदर बाग फुलावालीय. त्या बागेला त्यांनी Oxygen Park नाव दिलंय. गटातील मुलांसोबतच शाळेतील इतर मुले आणि शिक्षकही त्या बागेची खूप काळजी घेतात.
आम्ही शाळेतील मुलांसोबत छान खेळ घेतले, कोडी घातली, गाणं घेतलं. मुलांना खूप मज्जा आली. त्यानंतर गटातील मुलांसोबतही आम्ही memory game घेतला. मुलांनी त्याही खेळाचा खुप आनंद घेतला. आम्हालाही मुलांनी खूप प्रश्न विचारले. तिथे मुलांची एक नमुना बैठक आम्ही घेतली. मुलांनी खूप शांतपणे सगळं काही समजून घेतलं. मुलांसोबत एकूण छान मज्जा करून आम्ही गटाचा निरोप घेतला.
चौसाळा गट, बीड

चौसाळ्यातील गट हा शाळेतील विद्यार्थ्यांचा गट आहे. गट संख्येने लहान असला तरी गटात मुले-मुली दोघेही समप्रमाणात आहेत. शाळेचा परिसर खूप सुंदर आहे. मुले आमची वाट पाहत होती. आम्ही गेलो त्यादिवशी युवकदिन असल्याने गटातील मुलांनी आमचं छोटेखानी स्वागत केलं. मुले खूपच बोलकी आणि active आहेत. याआधी गटातील मुलांनी दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून वापरलेली आपट्याची पाने त्याच झाडाखाली खड्डा करून त्यात परत टाकली. एका मुलांनी घरी rain water harvesting करण्याचा प्रयत्न केला, गटातील काही मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली तसेच इतर वर्गांवर जाऊन बाकीच्या विद्यार्थ्यांनाही फटाक्यांचे दुष्परिणाम समजावले आणि फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. दिवाळीच्या फराळातील थोडंसं नाली साफ करणाऱ्या लोकांनाही दिलं. आणि याबरोबरच बरंच काही केलंय.
गटातील मुलांसोबतच इतरही काय चाललय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिथे मुलांसोबतच जेवलो, आणि मुलांनी आम्हाला थोडा खाऊपण दिला. मुलांसोबत खूप छान गप्पा झाल्या. काही मुलांनी आम्हाला भरारी अंकात दिलेले गाणेही म्हणून दाखवले. तिथेही एकूण खूप मज्जा आली.

माजलगाव - सिद्धेश्वर गट

साधारण दुपारच्या सुमारास आम्ही सिद्धेश्वर विद्यालयात पोचलो. लगेचच निलेश राठोड सर आम्हाला भेटले. आम्ही गेलो तर गटातील मुले आमची वाट पाहत एका रुममध्ये बसलेली होती. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे या गटात जास्त प्रमाणात बहिण-भावंडे आहेत. त्यामुळे त्याचं छान जमतं. गटातील मुले खूपच बोलकी आणि चुणचुणीत आहेत. गेल्यानंतर गटाची व आमची एकमेकांशी ओळख व्हाही म्हणून आम्ही त्यांच्यासोबत memory game खेळलो. मुलांना तो खेळ खूप आवडला. त्यानंतर मुलांशी कुमार निर्माणशी संबंधित बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. इतरही गप्पा झाल्या. मग मुलांनी हसत खेळत कुमार निर्माण म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजून घेतलं. हे समजून घेत असताना मुलांनी आम्हाला खूप वेगवेगळे प्रश्न विचारले, त्यावरून त्यांचा संवेदनशीलपणा दिसून आला. कुमार निर्माण समजून घेताना आम्ही मुलांना आपल्या शाळेतील समस्या काही जाणवतात का असे सांगून मुलांना शाळेचे निरीक्षण करायला पाठवले. निरीक्षण करून गटात परत आल्यानंतर असं जाणवलं की मुलांनी खूप विचार करून समस्यांची यादी केलेली आहे. यावर मुलांनी हळूहळू काम करण्याचे ठरवले आहे.
त्यानंतर आम्ही मुलांसोबत ‘इहा...’ नावाचा खेळ खेळलो. त्यातही मुलांना खूप मज्जा वाटत होती. एका मुलाने छान भक्ती गीत म्हणून दाखवले.
आम्ही गेलो त्यादिवशी सिद्धेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा सुरु होता. त्यात मुलांनी ‘खरी कमाई’ साठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे ठेले लावलेले होते. त्यात मग मुलांनी आम्हाला बरंच काही चविष्ट खायला दिलं.  बऱ्याच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन आम्ही गटाला पुन्हा लवकरच भेटू असं सांगून मुलांचा निरोप घेतला.
मोहा गट
सकाळच्या सुमारास आम्ही मोह्याला पोचलो. जाताना अंबाजोगाई दर्शन करत आम्ही मोह्याला पोचलो.  मोह्याच्या गटात जवळपास ३२ मुले-मुली आहेत. त्यातही मुले-मुली समप्रमाणात आहे. गटात ५ वी पासून ते १० वी पर्यंतची मुले आहेत. त्यामुळे मोठी मुले लहानांची छान काळजी घेतात. याही गटातील मुलांसोबत आम्ही ओळख करून घेण्यासाठी गमतीदार memory game खेळलो. मुलांनी त्या खेळाचा खूप आनंद घेतला.
आम्ही गेलो होतो त्या दिवशी संक्रांत होती. मुलांनी सांगितलं की आज १२ भाज्या आणि तिळीच्या भाकरीचं जेवण असतं. ते मस्तपैकी खाऊन आम्ही परत गटासोबत बसलो. मग गटाशी कुमार निर्माण संबंधित बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे या गटातील काही मुलांना मागील वर्षी माजलगावला झालेल्या कार्यशाळेचा संपूर्ण तपशील आठवत होता. याच तपशिलावरून पुन्हा एकदा आम्ही गटाला कुमार निर्माण म्हणजे काय हे समजून सांगितले.
याआधी गटातील मुलांनी यात्रेत खराब झालेली टेकडी साफ केली होती. गटातील बऱ्याच मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली होती आणि त्यातून वाचलेल्या पैशातून त्यांनी काहीतरी उपयोगी वस्तू घेतली होती. आता मुलांनी शाळेचं सुशोभीकरण करण्याचे ठरवले आहे. एकूण मुलांचं खूप छान चालू आहे.

उमरी गट

दुपारी १ च्या सुमारास आम्ही उमरी गावात पोचलो. गाव बरंच मोठं होतं. गावात गेल्यावर थोडावेळ भारतकडे बसून आम्ही शाळेवर गेलो. इथल्याही मुलांचा गट शाळेतील आहे. उमरीला दोन गटात प्रत्येकी १५ जण असून फक्त मुलांचा गट आहे. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे गटात १०वीची मुले जास्त प्रमाणात आहेत. एकाच गावात राहत असल्याने दोन्ही गटातील मुलांमध्ये खूपच चांगली ओळख आणि छान attachment होती. याही गटाची आम्ही मजेशीर memory game च्या मदतीने ओळख करून घेतली. मुलांनी छान आनंद घेतला.
यानंतर मुलांनी याआधी केलेल्या कृतिकार्यक्रमांचं sharing केलं. त्यात एक मुलगी शाळेसमोरील खड्ड्यात पडून तिचा हात मोडला होता तो खड्डा मुलांनी बुजवला तसंच शाळेसमोर एसटी बसचा थांबा असूनही तिथे एसटी बस थांबत नव्हती आणि यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या मुलांची खूप गैरसोय होत होती. यावर उपाय काढण्यासाठी गटातील मुलांनी एकत्र येऊन एक नवीन एसटी बस थांब्याची पाटी बनवून ती शाळेसमोर लावली, यामुळे आज तिथे एसटी बस थांबते. यासोबतच नवरात्रीच्या यात्रेत एका मंदिरावर जाण्यासाठीच्या पायऱ्यांवर पडलेले बारीक खडे गटातील काही मुलांनी जाऊन उचलले आणि काहींनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. हे सगळे कृतिकार्यक्रम सांगतांना मुलांना खूप आनंद होत होता.
यासोबतच पुन्हा एकदा गटातील सर्व मुलांनी कुमार निर्माण म्हणजे काय हे चर्चेच्या माध्यमातून समजून घेतले. या चर्चेनंतर मुलांनी एका कागदावर गावातील त्यांना सोडवता येणाऱ्या प्रश्नांची यादी बनवली आम्हाला वाचून दाखवली. यानंतर मुलांनी यादी केलेल्या प्रश्नांवर काम करण्याचे ठरवले आहे.
छान गप्पागोष्टीच्या स्वरुपात मुलांसोबत बोलून आम्ही गटाचा निरोप घेतला.

औरंगाबाद गट

अगदीच सकाळी ८च्या सुमारास आम्ही साताऱ्याच्या गटाला भेटलो. संक्रांतीचा दुसराच दिवस असल्याने शाळेतील मुले छान रंगीबेरंगी कपडे घालून आली होती. आम्ही गेल्यावर निमंत्रक तसेच गटातील मुलांनी आम्हाला तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पटांगणावर मस्तपैकी उन्हात आम्ही गटासोबत गप्पा करायला बसलो. गटात मुलींचं प्रमाण जास्त आहे. गटातील मुलं खूपच active आहेत.
याआधी मुलांनी शाळेमागील टेकडीवर जाऊन प्लास्टिकच्या पिशव्या उचलल्या होत्या. गटातील बऱ्याच मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली तसेच फटाकेमुक्त दिवाळी संदर्भात भित्तीपत्रके बनवून ती शाळेच्या भिंतींवर लावली आणि इतर मुलांनाही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन दिले. नुकतंच संक्रांतीच्या निमित्ताने गटातील मुलांनी कागदी पिशव्या बनवून तेथील भाजीवाले तसेच मेडिकलवाल्यांना दिल्या. मुलांनी आम्हालाही आठवण म्हणून एक-एक पिशवी दिली. यापुढे गटाने शाळेजवळील अनाथालयाला भेट देण्याचे ठरवले आहे. गटासोबत कुमार निर्माण संबंधित चर्चा होत असताना मुलांनी बरेच प्रश्न विचारले. आम्ही घातलेल्या कोड्याचा बराच विचार करून गटातील एकीने त्या कोड्याचे उत्तरही दिले. आम्हालाही गटासोबत खूप मज्जा आली. मुलांसोबत ‘इहा...’ हा खेळ खेळून आणि बऱ्याच गप्पा करून आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालो.


एकूण सर्वच गटांसोबत खूप मज्जा आली. आम्हाला वाटलेली सर्वात छान गोष्ट म्हणजे आम्हाला “तुम्ही पुन्हा आमच्याकडे कधी येणार?, तुम्ही लवकर आमच्याकडे या, आम्हाला पुन्हा भेटायला नक्की या.” हे आम्हाला प्रत्येक गटाने हक्काने सांगून पुन्हा येण्याचे promise आम्हा तिघांकडून घेतले. आणि म्हणून तुम्हा सर्वांना promise केल्याप्रमाणे आपण सर्वजण लवकरच पुन्हा एकदा भेटू आणि अशीच मज्जा करू.

Saturday, 31 October 2015

रचनावादाची भूमिका

जीवन आणि शिक्षण यांचा घनिष्ठ संबंध आहे. शिक्षण जीवनानुसार असावे, असे म्हटले जाते. कारण, जीवन चांगले घडविणे हेच मुळी शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट असते.

मानवी जीवन हे प्रवाही असते. ते दर पिढीगणिक बदलत जाते. आत्ताच्या २१व्या शतकात तर ते वेगाने बदलत जात आहे. शिक्षणाने जीवनाचा हा वेग पकडावा अशी शिक्षणाकडून अपेक्षा केली जाते, असे झाले तरच शिक्षण जीवनाला उपयोगी पडू शकेल. शिक्षणाने पुढील पिढीला नुसती जगण्याची दीक्षा द्यायची नसते तर जगताना, वेळोवेळी उगवत जाणाऱ्या समस्यांच्या त्वरित निवारणाची ताकदही द्यायची असते. शिक्षणाकडून या गोष्टी घेत असतानाच, जीवनाकडून शिक्षणाकडे जाण्याची वाट प्रत्येक पिढीसाठी मोकळी ठेवायची असते.

आज गरज निर्माण झाली आहे ती, गेल्या सात पिढ्या कुंठीत राहिलेल्या शिक्षणात अमुलाग्र बदल करण्याची. असे बदल करण्यासाठी, कधी नव्हे एवढी शास्त्रज्ञानाची नि तंत्रज्ञानाची मदत उपलब्ध झाली आहे. विविध शास्त्रांतील संशोधनांनी, मूल निसर्गतः असते कसे, वाढते कसे, शिकते कसे, याची अधिक नेमकी समज आपल्याला दिली आहे. त्यामुळे या नव्या माहितीचा वापर करून, शिक्षणात, आजवरच्या प्रथेप्रमाणे ‘शिकविण्याच्या’ नव्हे तर, मुलांच्या ‘शिकण्या’च्या अंगाने विचार व्हावा ही नवी भूमिका शिक्षणशास्त्रज्ञ घेऊ लागले आहेत. शिक्षणात हा जो विचार प्रवाह आला आहे त्याला शिक्षणविषयक रचनात्मक दृष्टीकोण (Constructive Approach) असे म्हटले जाते. हा नवा ज्ञानरचनावाद समजावून घेताना, शिक्षणाच्या एका मुलभूत उद्दिष्टाचे उदाहरण घेऊन सुरवात करणे इष्ट ठरेल असे वाटते.

समस्या निवारणाची ताकद
शिक्षणाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे, ते विद्यार्थ्यांमध्ये समस्या निवारण्याची चिरंतन अशी ताकद निर्माण करणे. समस्या निवारण्याची ही ताकद, ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल, अशी शक्ती शिक्षणाच्या आशयात व पद्धतीत असावी लागते. अशी शक्ती रचनात्मक शिक्षणात असते, असे आढळून आल्यामुळे, रचनात्मक शिक्षणाला आज सार्वत्रिक मान्यता मिळताना दिसून येते.

समस्या निवारण्याची प्रक्रिया ही तशी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. तिच्या प्रत्येक पायरीला वेगवेगळ्या मानवी क्षमतांची गरज असते. अशी विविध क्षमतांची तयारी करून देण्याचे काम शिक्षणाला – विशेषतः शालेय शिक्षणाला करून दयायचे असते.
समस्या निवारण्याच्या संभावित पायऱ्या व त्यासाठी लागणाऱ्या क्षमता पुढीलप्रमाणे असतात.
१.       प्रथमतः समस्या, प्रश्न जाणवणे. (संवेदनशीलता)
२.       ‘अशी समस्या आहे’ हे मानसिक स्तरावर स्वीकारणे. (धिटाई)
३.       समस्येचे नेमके स्वरूप आकळणे. (आकलनक्षमता)
४.       समस्येचे प्राधान्य, महत्व कळण्यासाठी त्याचे मूल्यमापन करता येणे. (मूल्यमापन)
५.       समस्या सोडवणुकीच्या पर्यायी मार्गांचा शोध घेता येणे. (शोधक्षमता)
६.       विशिष्ट परिस्थितीत योग्य पर्यायाची निवड करता येणे. (निवडक्षमता)
७.       निवडलेला पर्याय वापरण्याचे कौशल्य अंगी असणे. (कुशलता)
८.       समस्या सोडवण्यासाठी निर्णय घेता येणे. (निर्णयक्षमता)
९.       निर्णयानुसार कृती करता येणे. (कृतीक्षमता)
१०.   समस्या सुटल्याची खात्री करता येणे. (विवेचकदृष्टी)

यांपैकी प्रत्येक पायरीसाठी काही ना काही क्षमता, ज्ञान, कौशल्य अशा गोष्टींची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, समस्या जाणविण्याची संवेदनशीलता, समस्येचा स्वीकार करण्याची धिटाई, समस्येचे स्वरूप सर्वांगाने कळण्यासाठी लागणारी आकलनक्षमता, सारासार विचाराने समस्येचे मूल्यमापन करता येणे, समस्या सोडविण्यासाठी असणाऱ्या पर्यायी मार्गांचे ज्ञान, व त्यांचा शोध घेण्यासाठी लागणारी शोधक्षमता, पर्यायांची तुलनात्मक योग्यायोग्यता ठरविण्याची विश्लेषणक्षमता, प्रत्यक्षात विशिष्ट समस्या सोडविण्यासाठी लागणारी कौशल्ये, निवड व कृतीसाठी लागणारी निर्णयक्षमता, प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा व पात्रता आणि शेवटी, सुटलेल्या समस्येचीसुद्धा शहानिशा करण्याची विवेचक दृष्टी. या साऱ्या गोष्टी, प्रत्येक विद्यार्थी – विद्यार्थिनीस मिळतील याची मोठी जबाबदारी शिक्षणाला घ्यायची असते.

यातील कोणत्याच गोष्टी, शिक्षकाने द्यायच्या आणि विद्यार्थ्याने घ्यायच्या या स्वरूपाच्या नाहीत. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त माहिती देऊ शकतो, उदाहरणे देऊ शकतो, फार तर समस्येपर्यंत नेऊही शकतो पोहोचण्यासाठी तलावाची खोली, पोहण्यासाठी हातपाय मारण्याची पद्धती शिक्षक सांगू शकतो. थेट तलावापर्यंत नेउही शकतो. पण प्रत्यक्ष भीती, दडपण दूर करून आपली आपण उडी टाकण्याचे, हातपाय हलविण्याचे, नाका-तोंडात पाणी जाऊन जाणवणाऱ्या अस्वस्थेचे आणि असे करत करत पोहायला शिकण्याचे काम हे ज्याचे त्यालाच करावे लागते.  पोहण्याची ही सारी प्रक्रिया स्वानुभवाने पार करतच पोहायला शिकावे लागते. अशाप्रकारे पोहायला शिकण्याची ही सारी शिक्षणप्रक्रिया जशी मुळातच रचनात्मक शिक्षणप्रक्रिया असते, त्याचप्रमाणे कोणतीही शिकण्याची प्रक्रिया ही अशी मुळातच करून शिकण्याची प्रक्रिया असते, असं ‘रचनावादी’ शिक्षणपद्धतीचा दावा आहे.

समस्या निवारण्याच्या एखाद्या घटनेत, स्वतःच्या प्रयत्नांनी, विविध पायऱ्याना काय काय, कसे कसे घडते याची शहानिशा करीत जाऊन, विद्यार्थी यशस्वीरीत्या ही कामगिरी करू शकला तर त्याचे, यातूनच अर्थपूर्ण शिक्षण झाले असे म्हणता येईल. येथे विद्यार्थ्याने आपल्या उपलब्ध क्षमतांचा वापर करून समस्या निवारण केले आहे असे रचनात्मक दृष्टीकोण मानतो.

आपल्या असलेल्या पूर्वज्ञानाचा नि आत्मसात केलेल्या कौशल्यांचा वापर करून जेव्हा व्यक्ती आपल्या चालू प्रश्नांना भिडत असते, तेव्हा ती आपल्या परीने, आपल्या दृष्टीकोणातून समोर येणाऱ्या घटनांचा, कल्पनांचा अर्थ लावीत असते. वेगवेगळ्या घटकांत आणि आपल्या अगोदरच्या अनुभवांत परस्परसंबंध बांधीत जाते, म्हणजेच आपल्या ज्ञानाची नवी रचना करीत जाते, असे रचनावादी विचारसरणीचे प्रतिपादन आहे.
मा. रमेश पानसे

‘रचनावादी शिक्षण’ या पुस्तकातून साभार

Wednesday, 30 September 2015

कुमार निर्माण व कृती कार्यक्रम

कुमार निर्माण ही मुलांच्या हक्काची अशी जागा आहे जिथे कुठलाही कृती कार्यक्रम करताना तो मुलांकडून सुरु होणे यावर भर देण्यात आला आहे. कृती कार्यक्रम करताना मुलांना काय वाटतं, त्या कृतीमागे त्यांचा काय विचार आहे हे जास्त महत्वाचे आहे. तसेच कुठलाही कृती कार्यक्रम करताना मुलांचं स्वातंत्र्य पूर्णपणे जपल्या गेले पाहिजे.
कुठलाही कृती कार्यक्रम ठरवण्याआधी मुलांनी एखादा विषय घेऊन त्यावर सखोल आणि चहुबाजूनी चर्चा व अभ्यास केल्यास कृती कार्यक्रम अधिक चांगले होऊ शकतील. जेव्हा अशा चर्चेला सुरवात होते तेव्हा त्या चर्चेला अगणित फाटे फुटू शकतात, ज्यामुळे मुलांच्या विचारांना चालना मिळते. याबरोबरच चर्चा सुरु असताना अनेक वेगळेच कृती कार्यक्रम सुचण्याचीही शक्यता जास्त असते. लक्षात घेऊया की निव्वळ कृती कार्यक्रम करणे हा आपला हेतू नसून आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे ते फक्त एक साधन आहे.

बैठकांमध्ये विद्यार्थी खालील गोष्टींबाबतही चर्चा घडवून आणू शकतात.
-       छानशी गोष्ट ऐकून त्यावर चर्चा करणे
-       वर्तमानपत्र/ मासिक एकत्र वाचणे
-       चित्र काढणे
-       गाणी म्हणणे
-       आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटनेवर चर्चा करणे
-       वस्तू बनवणे
-       उत्तम सिनेमा/ नाटक/ लघुपट/ माहितीपट पाहणे
-       एकत्र फिरायला जाणे (परिसराचे निरीक्षण करणे)

उदा.
१.       व्यक्तिगत कृती कार्यक्रम:
‘भरारी’च्या प्रथम अंकातील ‘चित्र चर्चा’ यावर चर्चा केल्यास काही कृती कार्यक्रम ठरवण्यास त्याची मदत होऊ शकते.
जसे की, चित्र क्र. २ मध्ये एका ओढ्याजवळ लहान मुले व काही महिला पाणी भरण्यासाठी एक मोठी रांग लावून उभे आहेत आणि चित्रात पाण्याचा साठा मर्यादित दिसतोय. त्यामुळे प्रत्येकाला आपला नंबर येईपर्यंत भर उन्हात उभे रहावे लागत आहे. चर्चेअंती स्वतःशी निगडीत एखादा कृती कार्यक्रम देखील ठरवता येऊ शकतो, उदा. ‘महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे, मी स्वतः दैनंदिन आयुष्यात कमी व गरजेपुरताच पाण्याचा वापर करेन.’
२.       सांघिक कृती कार्यक्रम:
मुलांनी एखादी घटना पाहिली असेल तर त्यावर चर्चा करून गटात एखादा कृती-कार्यक्रम ठरवता येऊ शकतो.
जसे की, अंबेजोगाईच्या गटातील मुलांच्या कॉलनीत नेहमी एक कुत्रा खेळत असे. एक दिवस तो झोपूनच होता. म्हणून मग मुलांनी प्राण्यांच्या डॉक्टरना बोलावून त्या कुत्र्याला तपासले व डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची काळजी घेतली. लवकरच तो कुत्रा बरा झाला.
कुमार निर्माण हा एक सांघिक उपक्रम आहे, म्हणजेच सर्व कृती कार्यक्रम ठरवणे, निर्णय घेणे ई. बाबी विद्यार्थ्यांनी एक संघ म्हणूनच पार पाडायच्या आहेत. म्हणूनच कृती कार्यक्रमाआधी विद्यार्थ्यांमध्ये संघभावना निर्माण होणेही महत्वाचे ठरते.

Ø  मुलांमध्ये संघभावना तयार करण्यासाठी त्याना आवडतील असे अनेक उपक्रम घेता येतील. उदा.
·         विविध सांघिक खेळ
·         गप्पागोष्टी
·         गाणी
·         चर्चासत्रे
·         छोटी नाटके, पथनाट्ये बसवणे
·         जवळपासच्या स्थळाला किवा संस्थेला एकत्र भेट देणे 

संघउभारणीनंतर विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या कृती कार्यक्रमांची रचना खालीलप्रमाणे असू शकेल.
·      स्व
सुरवातीचे कृती कार्यक्रम स्वत: शी निगडीत असू शकतात.
उदा. स्वतःचे जेवणाचे ताट रोज स्वतःच धुणे, आपली खेळणी, कपडे व्यवस्थित ठेवणे. आपल्या कपड्यांना इस्त्री करणे ई.
·      कुटुंब
‘स्व’ ला जोड देताना आपापल्या कुटुंबात करता येणाऱ्या कृती देखील करता येतील.
उदा. कुटुंबातील सदस्यांना काही ठराविक मदत सातत्याने करणे (आईला कामात मदत), आजी आजोबाना काही मदत.
·      परिसर
परिसराशी निगडीत कृती करताना व्यक्तिगत पातळीवर आपण अथवा विद्यार्थी विरोधाभास निर्माण करणाऱ्या कृती करत नाही ना याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आपले शेजारी, गल्ली, सोसायटी ई. शी संबंध येणारे कृती कार्यक्रम इथे करता येतील.
उदा. परिसरात फुल-झाडे लावणे व जोपासणे, परिसरात स्वच्छता ठेवणे, इतर वयोवृद्ध, महिला लहान मुले यांना मदत करणे, चर्चासत्र चालवणे, सर्वे करणे, स्पर्धा व इतर उपक्रम आयोजित करणे.
·      गाव / शहर / समाज
काही कृती आपल्या लगतच्या परीसरापलीकडे मुलांना घेऊन जातील.
उदा. परिसरातील विविध शासकिय व अशासकीय संस्थाना भेट देणे, विविध प्रकारे गावातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, गावाचे पर्यावरण व त्याचे महत्व समजून घेणे.

Monday, 31 August 2015

‘कुमार निर्माण’ केंद्रीय कार्यशाळा - २०१५

कुमार निर्माणची केंद्रीय कार्यशाळा दि.२२ व २३ ऑगस्ट रोजी जे. पी. नाईक एज्युकेशन इन्स्टिट्यूट, पुणे येथे पार पडली. ही कार्यशाळा मुख्यतः गट निमंत्रकांसाठी होती. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतून ५२ गटांतर्फे आलेले ५० निमंत्रक, निर्माण युवा व स्वयंसेवकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

पार्श्वभूमी
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश
-    कुमार निर्माणची संकल्पना स्वतः समजून घेणे व आपल्या संघातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना ती समजून सांगणे.
-    गट निमंत्रकाची मुलांसोबत काम करतानाची भूमिका समजून घेणे ई. हा होता.


या २ दिवसात विविध सत्रे घेतली गेली. या सत्रांमध्ये शिक्षण व मूल्यशिक्षण म्हणजे नेमके काय; शिक्षणाचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध, सामाजिक व भावनिक बुद्धीमत्ता म्हणजे काय, मुल कसं शिकतं, माणसात उपजतच सहकार्याची भावना कशी असते, वैश्विक मानवी मुल्ये कुठली आणि त्यांचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध यासारख्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या activities, उदाहरणे, लघुपट व खेळांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा उपयोग आपण आपापल्या गटासोबत काम करताना कसा होईल यावर विचारमंथन झाले.

कुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस पहिला

दि. २२ ऑगस्ट २०१५


पहिल्या दिवसाची सुरवात ही विनायक कदम यांच्या ‘राहो सुखाने हा मानव इथे’ या सुंदर गीत गायनाने झाली. या गीतानी उत्साहपूर्ण वातावरण निर्मिती केली.

१.    विविध खेळ व परिचय सत्र - सायली तामणे आणि सनत गानू
गीत गायनानंतर निमंत्रकांसोबत सायली व सनत या निर्माण युवांनी वेगवेगळे खेळ घेतले. यात सुरवातीला सायलीच्या ‘लंबी दाढीवाला बाबा’ या गाण्याने सर्वांना उल्हासित केले. यानंतर एकमेकांशी ओळख करून घेण्यासाठीचे काही खेळ तिने घेतले. जसे की, विविध गटांमध्ये फिरून एकमेकांना धम्माल हाय-हेल्लो करणे, ‘अरे यहाँ कैसे?’ असे विचारणे, स्वतःचा एक गुण लिहून तो आपल्या गटातील जोडीदाराला समजून सांगणे, ई. यानंतर सनतने मोकळ्या अंगणात काही खेळ व गाणे घेतले. 

पहिला खेळ होता पत्त्यांचा. या खेळात त्याने सर्वांना वेगवेगळे पत्ते वाटून एकमेकांशी न बोलता एका क्रमाने उभे राहावयास सांगितले व नंतर हाच खेळ तीन वेगवेगळ्या प्रकारे घेतला, यानंतर हा खेळ खेळताना काय झालं यावर निमंत्रकांची मतं घेण्यात आली. या खेळातून मुलांसोबत काम करताना पूर्वापार चालत आलेली विचारांची तसेच वृत्तीची साचेबद्ध चौकट मोडून मुलांच्या सर्जनशील विचारांची देवाणघेवाण करायला हवी हे समजले. यानंतर सनतने टीमवर्क या पार्श्वभूमीवर एक मजेदार असा विटांचा खेळ घेतला. ज्यात निमंत्रकांचे गट करून त्यांना एका जादुई विटेच्या सहाय्याने काल्पनिक दलदल पार करावयाची होती. या खेळातून सर्वांना सहकार्याची भावना व सांघिक कार्य याचे महत्व समजले. यासोबतच सनतच्या ‘हरियाली इधर उधर’ या गाण्यावर नाचून सर्वांनी खूप धम्माल केली.
       शेवटी त्याने ‘सहकार व असहकार’ यास अनुसरून ‘जितो जीतना जीत सको’ हा खेळ घेतला. यातून सर्वांना सहकार - असहकार व त्यातून होणारे फायदे व नुकसान हे खूप चांगल्या प्रकारे समजून घेता आले. सायली व सनतने घेतलेल्या या सत्रांनी कार्यशाळेच्या सुरवातीलाच प्रचंड उर्जा निर्माण केली, सर्व निमंत्रक खेळीमेळीच्या वातावरणात बोलू वागू लागले. याचा पुढील सत्रासाठी खूप फायदा झाला. 

२.    उत्क्रांती, सहकार्याची भावना आणि कुमार निर्माण - धनंजय मुळी
सनतच्या व सायलीने घेतलेल्या ‘जितो जीतना जीत सके!’ या खेळाचा धागा पकडून निर्माण युवा धनंजयने पुढील सत्र घेतले. यात त्याने लघुपटांच्या सहाय्याने मुंग्या व चिंपांझी यांच्यात उपजतच असलेली सहकार्याची भावना ही त्यांनी केलेल्या कामांतून कशाप्रकारे दिसून येते हे दाखवले. याच लघुपटांच्या माध्यमातून प्राण्यांत व माणसात उपजतच सहकार्याची, सामंजस्याची व परोपकाराची भावना असते याची त्याने सर्वांना जाणीव करून दिली. या सत्राच्या शेवटी या विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध प्रश्नांवर बराच उहापोह करण्यात आला.

३.    शिक्षण म्हणजे काय? – सायली तामणे
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे का? ह्या मूळ प्रश्नापासून सायलीच्या सत्राची सुरुवात झाली. योग्य शिक्षण कुठले? अनुभव माणसाला शहाणे करतो की शिक्षण? असे प्रश्न घेऊन सायलीने चर्चेच्या स्वरुपात सद्य परिस्थितीतील शिक्षण हे जगण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान देण्यास कसे कमी पडत आहे ह्याची जाणीव करून दिली. सद्य परिस्थितीतील शिक्षण हे फक्त मानवाच्या वाढीव गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला पूरक ज्ञान देणे एवढेच काम करत आहे पण हे करताना एक जबाबदार व संवेदनशील नागरिक बनवण्याकडे मात्र दुर्लक्ष करते आहे ह्याची जाणीव निमंत्रकांना झाली.

४.    वैश्विक मानवी मूल्ये - अमोल फाळके
माणूस हा सामाजिक प्राणी आहे व समूहात राहण्याकडे आपला त्याचा कल असतो. पण समूहात राहताना काही मूल्य त्यांनी जपली तर त्याचे तसेच तो राहत असलेल्या समूहाचे जगणे सुसह्य होते, सोपे होते. बंधुभाव, सहकार्य, प्रेम, मैत्री, समता, न्याय, पर्यावरणपूरकता, श्रमप्रतिष्ठा, अहिंसा,  वैज्ञानिक दृष्टीकोन हीच ती मूल्ये ज्यांना वैश्विक मानवी मूल्ये मानले जाते. समाज, देश, धर्म, भौगोलिक रचना ह्याच्या पलीकडे ही मूल्ये आहेत, जे लोक ह्या मुल्यांचा स्वीकार करतात त्यांचे आयुष्य सुकर होते, अन्यथा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वैश्विक मूल्यांचे महत्व त्यांनी विविध ध्वनी-चित्रफितीतून विषद केले.

५.    सामजिक बुद्धिमत्तेची ओळख आणि कुमार निर्माण - नरेंद्र खोत
समाजात आनंदी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी काही किमान कौशल्ये आणि बुद्धीमत्तांची गरज असते ज्यात संवेदनशीलता, संयम, नेतृत्व, कृतिशीलता यासारख्या घटकांचा अंतर्भाव असतो. ही सर्व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तसेच विकसित करण्यासाठी आवश्यक असते ती सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता. हे दोनही घटक आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेचा योग्य विकास होणे गरजेचे असते. मात्र मुल्यांचा आणि संस्कारांचा अभाव असला तर बुद्धिमत्ता जशा तारक असतात तशाच त्या मारक देखील ठरू शकतात. त्यामुळे या बुद्धिमत्ता विकसिक करतानाच त्यांचा योग्य वापर करण्याची शिकवण मुलांना देणे गरजेचे असते यावर नरेंद्र खोत यांनी त्यांच्या सत्रात भर दिला.
सुरुवातीलाच त्यांनी प्रत्येकाला एका कागदावर आवडत्या व नावडत्या व्यक्तींचे नाव व त्या मागील करणे लिहायला सांगितली. त्यानंतर प्रत्येकाला आवडणारी / नावडणारी व्यक्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे स्वभावदोष आणि गुणविशेष सारखेच असतात याकडे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले.

६.    सिनेमा - The gods must be crazy II  - केदार आडकर
रात्रीच्या जेवणानंतरच्या सगळ्यांसाठी एका चित्रपटाचे आयोजन केलेले होते. जंगलात अडलेले 2 वैज्ञानिक, एकमेकांवर पाळत ठेवणारे नंतर अचानकपणे समोर आल्यानंतर एकमेकांचा जीव घेण्याच्या प्रयत्न करणारे आणि नंतर स्वतःचाच जीव वाचवण्याची धडपण करणारे 2 सैनिक, जंगलातील वन्य प्राण्यांची चोरी करणारे तस्कर, हरवलेल्या मुलांच्या शोधात निघालेला आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासी, त्यांच्या प्रथा, संकटात सापडलेलं असतानाही मदतीची, सहकार्याची भावना ह्या सगळ्यामुळे The God must be crazy इंग्रजी सिनेमा भाषेची बंधने मोडून सर्वांच्याच हृदयाला जाऊन भिडला. या चित्रपटाच्या अनुषंगाने एखादा चित्रपट कसा पहावा, त्यातील बारीक सारीक गोष्टींचा कुमार निर्माण मधील मुलांच्या कृती व विचारांना चालना देण्यासाठी कसा उपयोग करता येतो याचे प्रात्यक्षिक पार पडले. 

कुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस दुसरा

दि. २३ ऑगस्ट २०१५

१.    रिफ्लेक्शन शेअरिंग
पहिल्या दिवशीच्या विविध सत्रांमधून व एकमेकांपासून निमंत्रकाना नवीन काय शिकायला मिळाले, काय भावले ई. गोष्टींबाबत निमंत्रकांनी व्यक्तिगत भावना व्यक्त केल्या. आपापल्या गटासोबत काम करताना वेळोवेळी मुलांचे असे शेअरिंग घेणे गरजेचे आहे हे लक्षात आले. 

२.    कुमार निर्माण – प्रफुल्ल शशिकांत
कुमार निर्माण शिबिरातील सर्व सत्रातून कुमार निर्माण सुरु करण्यामागील विचारांची पार्श्वभूमी टप्प्याटप्प्याने निमंत्रकांना उलगडून सांगण्यात येत होती पण हे करताना कुमार निर्माण म्हणजे नेमकं काय याचे कुतुहूल अजूनही सगळ्यांना होतच.
ह्याचा उलगडा प्रफुल्लच्या सत्रात झाला. कुमार निर्माणची सुरुवात, त्याची उद्दिष्टे, कार्यपद्धती, शैक्षणिक प्रक्रिया, गेल्या २ वर्षातील वाटचालीचा आढावा, विविध गटांनी केलेली कामे ह्या बद्दल प्रफुल्लने त्याच्या सत्रात सविस्तर माहिती दिली. या सत्रांनंतर कुमार निर्माण म्हणजे नेमक काय, विद्यार्थ्यांनी काय करणे अपेक्षित आहे, तसेच निमंत्रकाची भूमिका या बद्दल सर्वांना स्पष्टता आली. या सत्रातच केदार आडकर, रज्जाक पठाण, निलेश राठोड या निमंत्रकांनी त्यांच्या गटाने केलेल्या उपक्रमांबद्दल थोडक्यात माहिती दिली.

३.    एक आदर्श निमंत्रक – सुदाम भोंडवे
लौकिकार्थाने जास्त शिक्षण नसलेले पण ऊस तोड कामगारांच्या मुलांनी शिकले पाहिजे म्हणून अनेक वर्षापासून बीडजवळ डोमरी येथे एक अनोखी शाळा (गुरुकुल) चालवणारे सुदाम भोंडवे (काका) ह्यांची मुलाखत निर्माण युवा व निमंत्रक वृंदन बावनकरने घेतली. मुल हे अनुभवातून शिकते. शाळेतील चार भिंतींच्या आत छडीच्या धाकाने दिलेल्या शिक्षणापेक्षा निसर्गाच्या सानिद्ध्यात राहून, अनुभवातून घेतलेले शिक्षण हे कधीही जास्त चांगले असतें असे त्यांनी सांगितले. ह्याचे उदाहरण देताना त्यांनी त्यांच्या शाळेतील एक घटना सांगितली - वृक्षारोपणासाठी शाळेतील विद्यार्थी माती जमा करण्यासाठी खड्डा खणत असताना त्यांना अचानकपणे मानवी सापळा आढळला, सुरुवातीला मुले घाबरली पण नंतर एकेकाने धीर धरून जवळ जाऊन सापळा बघायला सुरुवात केली. त्यावेळी मुलांनी निरीक्षणातून, स्वतः हाताळून पाहिलेल्या त्या सांगाड्यातून मुलं जे मानवी शरीराबद्दल शिकली ते ती कधीही विसरणार नाहीत. अनुभवातून आलेलं शिक्षण हेच खरे शिक्षण असते व तेच मुलांच्या जास्त चांगले लक्षात राहते असे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी गुरुकुल व तेथे चालत असलेले इतर उपक्रम यांचीही माहिती दिली.

४.    कौतुक सोहळा
कुमार निर्माणच्या केंद्रीय शिबिराच्या समारोप प्रसंगी मा. डॉ. अभय बंग तसेच MKCLचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विवेक सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निर्माण कार्यकारी समितीचे प्रमुख श्री. सुनील चव्हाण व महाराष्ट्र नॉलेज फाऊनडेशनचे श्री. उदय पंचपोर व श्री. नरेंद्र खोत हे देखील उपस्थित होते.

ह्यावेळी सुरुवातीला मागील वर्षी कुमार निर्माणमध्ये सहभागी काही गटांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र तसेच पुस्तकांचा संच देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले. 

डॉ. अभय बंग यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला फक्त पहिला येण्याच्या उद्देशाने मुलांना दावणीला बांधले जाते. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांच्या पुढे जायचे याच्या अट्टाहासात मग शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी न राहता, नकोशी-कंटाळवाणी होत जाते. मात्र आज हीच प्रक्रिया आनंददायी करण्याची गरज आहे, शिक्षणाला चार भिंतीत न अडकवता, निसर्गाच्या सानिद्ध्यात घेऊन जाण्याची गरज आहे. अनुभवातून आलेले शिक्षण आणि शहाणपण हे एका खोलीत बसून नुसती पुस्तके वाचून मिळत नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी एका विद्यार्थ्याने  त्यांना कुमार निर्माणची प्रक्रिया सुरु करण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली असे विचारले असता, कुमार निर्माणच्या मागची प्रेरणा ही तुम्ही, लहान मुले आहात, असे सुंदर उत्तर त्यांनी दिले


या कौतुक सोहळ्यानंतर लहान मुलांसाठी सामोसे, वेफर्स, आईस्क्रीमची व्यवस्था केलेली होती ज्यावर मुलांसमवेत निमंत्रकांनी देखील ताव मारला.
ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडण्यामागे निर्माणच्या अनेक युवा मित्रांचा सहभाग होता.  ज्यात केदार अडकर, सम्मित वर्तक, निरंजन तोरडमल, शैलेष जाधव, संतोष गवळे (सुत्रसंचलन), अमोघ पांडे (फोटोग्राफी) हे मित्र होते.
यांच्यासोबतच वयाने मोठे असणारे परंतु मनाने तरुण असणारे आपले सर्वांचे आवडते मित्र व आयकॉन श्री. नंदा खरे (नंदा काका) श्री. सुनील चव्हाण (सुनील काका) व श्री. उदय पंचपोर हेही कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

अशाप्रकारे अतिशय उत्साहपूर्ण, आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात ‘कुमार निर्माण’ ची कार्यशाळा पार पडली.