Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Tuesday, 26 June 2018

सुट्ट्यांनंतर


सुट्ट्यांनंतर

वृषाली ताई व्हरांड्यात बसून विचार करत होत्या. शाळेला सुट्ट्या असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या कुमार निर्माणच्या सांकव संघाची नियमित बैठक झालेली नव्हती. बरीच मुलं-मुली सुट्ट्यांत नातेवाईकांकडे गावाला गेलेली होती. तसं हे अपेक्षितच होतं म्हणा, म्हणूनच वृषाली ताईंनी देखील नियोजन करून बाहेरगावची कामं करून घेतली होती आणि काही दिवस त्याही नातेवाईकांकडे फिरून आल्या होत्या. त्यासोबतच कुमार निर्माणची द्वितीय प्रशिक्षण कार्यशाळा देखील या दरम्यान झाली तिथे देखील वृषाली ताई जाऊन आल्या होत्या.
आता मुलं-मुली परत आल्यानंतर बैठका पुन्हा नियमित सुरु होण्यासाठी काय करूया असा विचार त्यांच्या मनात सुरु होता. हा विचार करत असतानाच वृषाSSलीSSS ताईSS वृषाSSलीSSS ताईSS असे ओरडत ओरडत सुरज, अरबाझ, मोनाली, लिसा आणि सानिका व्हरांड्यात आले. सर्वांना बघून ताईंना खूप आनंद झाला. ताईंनी खूप आपुलकीने सर्वांची चौकशी केली.
अरबाझने त्याच्या आत्त्याच्या गावावरून करवंद आणले होते तर सुरजने आंबे आणलेले होते ते त्यांनी ताईंना दिले. सानिका आणि मोनालीने त्यांच्या आजी आजोबाच्या शेतातून जांभळं आणली होती ती ताईंना दिली.

“हा खाऊ सगळ्यांना वाटण्यासाठी आणि सगळ्यांनी सुट्ट्यांत काय मजा केली ते ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनाच बोलवूया का?” वृषाली ताईंनी मत मांडलं.
“हो ताई, तशीही आपली कुमार निर्माणची बैठकदेखील बऱ्याच दिवसांत झालेली नाहीये.” सुरज म्हणाला.
सुरज आणि सानिका संघातील सगळ्यांना बोलावून आणायला पळाले.
थोड्याच वेळात एक-एक करत सर्व मुलं-मुली जमले. सोनाली आणि अरबाझने सर्वांना जमलेला खाऊ दिला. खाऊ खात सर्वांनी सुट्ट्यात काय केलं ते सांगायला सुरुवात केली.
“मी तर खूप आंबे खाल्ले, आंब्याच्या झाडावर सूरपारंब्या खेळलो, आणि खेळताना माझ्या मावशीचा मुलगा बाद्कन चिखलात पडला.” – सुरजने सांगितलं. हे ऐकून सगळ्यांना हसू आलं.
“माझ्या मावशीच्या गावाला नदी आहे तर आम्ही नदीत पोहायला शिकलो” – मोनाली आणि सानिका एकत्रच म्हणाल्या.
सर्वांनी सुट्टीत केलेल्या गमती-जमती एकमेकांना सांगितल्या.
“मी कुमार निर्माणच्या गटात आपण खेळतो ते खेळ आणि गाणी मामाकडे सर्वांना शिकवले.” लिसा म्हणाली.
“आम्ही खूप सारी फळं तर खाल्लीच पण त्यांच्या बिया जपून ठेवून त्यापासून सीड बॉल्स बनवले, मी ते सोबत देखील आणले आहेत. हे बघा!” – फातिमा म्हणाली.
“ताई आपण सीड बॉल्सचा उपक्रम करूया का?” – फातिमाने विचारलं.
“ताई त्यापेक्षा आपण रोपं आणून ती लावूया आणि त्यांची काळजी देखील घेऊया.” – मनोज म्हणाला.
यावर मग बरीच चर्चा झाली आणि शेवटी लांबच्या परिसरात सीड बॉल्स टाकायचे आणि जवळपास रोपं आणून ती लावायची आणि त्यांची काळजी घ्यायची असं ठरलं.
ही चर्चा सुरु असताना बाहेर पाऊस पडायला लागला आणि सगळे पाऊस बघण्यात दंग झाले.
“चला पावसात खेळायला जाऊया!” – प्रिया म्हणाली.
“अरे पण हे उपक्रम कसे करायचे ते ठरवायचं बाकी आहे की अजून” – वृषाली ताई म्हणाली.
“ताई. आपण सध्या शाळा सुरु होईपर्यंत रोज भेटूया. आणि उद्याच्या भेटीत या उपक्रमांचं नियोजन करूया, कोण कुठली जबाबदारी घेईल ते देखील उद्याच ठरवूया.” प्रशांतने प्रस्ताव ठेवला.
सगळ्यांनी तो आवाजी मतदानाने पारित करून पावसात खेळण्याकडे मोर्चा वळवला.
वृषाली ताई पुन्हा एकदा व्हरांड्यात बसल्या होत्या पण आता त्या मुला-मुलींचं खेळणं बघण्यात रमून गेल्या होत्या.

 पावसाचं पाणी

पाऊस सुरु झाला आणि संघातील मुलं-मुली खेळायला पळाले, पण प्रिया मात्र लगेच घरी पळाली.
प्रियाचं घर गावाच्या जरा बाजूला होतं आणि त्यामुळे त्यांच्या घरापर्यंत ग्रामपंचायतचं पाण्याचं कनेक्शन पोहचलेलं नव्हतं. तसं तर उन्हाळ्यात सर्वांनाच पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवायचा पण प्रियाच्या घरी नळ कनेक्शन नसल्याने त्यांना मात्र पूर्ण उन्हाळ्यात बाहेरून बैलगाडीवर मोठी टाकी ठेवून पाणी आणावं लागे. इतर वेळी मात्र त्यांच्या शेतातील विहारीचं पाणी त्यांना पुरत असे.
प्रिया घरी आली तेव्हा तिचे आई, बाबा आणि लहान भाऊ; रमेश तिघेही पाईप मधून येणारं छतावरील पावसाचं पाणी घरातील भांड्यांमध्ये भरत होते. प्रिया देखील झटपट मदतीला धावली.
पाणी भरताना रमेश आई बाबांना सारखे प्रश्न विचारत होता.
“बाबा उन्हाळ्यात आपल्या विहारीतलं पाणी का संपतं?”
“मग पाऊस पडला की ते कुठून परत येतं?”
“आपल्या विहिरीला तर कठडे बांधलेले आहेत तर त्यात पावसाचं पाणी आत कुठून जातं?”
“हे सगळं छतावर पडणारं पाणी साठवून ठेवायला किती मोठी टाकी लागेल?”
“जर आपण सगळ्या शेतावर पडणारं पाणी साठवून ठेवलं तर आपल्याला उन्हाळ्यात देखील पाणी पुरेल का?”
“आपल्याला वर्षाला किती पाणी लागतं?”
असे एक ना अनेक प्रश्न रमेश विचारत होता. आई बाबांनी मात्र त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं पाणी भरायचं काम सुरु ठेवलं होतं.
प्रियाच्या डोक्यात मात्र हे प्रश्न ऐकून एक आयडिया चमकली. आपण खरंच जर छतावर पडणारं पाणी जमा करू शकलो तर...? खरंच किती बरं पाणी लागत असेल आपल्याला रोज ..? हे प्रश्न आपण कुमार निर्माणच्या उद्याच्या बैठकीत मांडूया आणि जमलं तर यावर काही तरी कृती करूया.
तिचा असा विचार होईपर्यंत त्यांचं पाणी भरून झालेलं होतं आणि आता पाईप मधून येणारं पाणीही रस्त्यावर वाहत जाऊन पुढे नालीत जात होतं. त्या वाहणाऱ्या पाण्याकडे बघून प्रियाचा निश्चय अजूनच पक्का झाला. उद्याच्या बैठकीची वाट बघत ती सुट्टीतील अभ्यास पूर्ण करायला बसली.
मित्रांनो, प्रियासारखा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी? तुम्ही देखील प्रिया आणि सांकव संघाप्रमाणे तुमच्या संघात या विषयावर चर्चा करा आणि बघा तुम्हाला पुढील गोष्टी मोजता येताय का?
. तुम्हाला स्वतःला एका दिवसात किती पाणी लागत असेल?
. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वर्षाला किती पाणी लागत असेल?
. तुमच्या छतावर वर्षभरात पावसाचं किती पाणी पडत असेल?
. छतावर पडणारं पाणी वाया जाण्यापेक्षा त्याचा वापर कसा करता येईल?
तर मित्रांनो, पावसात भिजून मज्जा करताना या प्रश्नांचा नक्की विचार करा...



गेट-टूगेदर


गेट- टुगेदर!

मित्रांनो, यावर्षीच्या जून आणि जुलै महिन्यात कुमार निर्माणमध्ये आपण एक वेगळा प्रयोग करणार आहोत. आम्हाला खात्री आहे की हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल.
तर होतं असं की, तुम्ही मुलं-मुली कुमार निर्माणमध्ये सहभागी होतात, तुमच्या ठिकाणी एक संघ बनवतात, मग वर्षभर विविध तऱ्हेचे कृतिकार्यक्रम करतात आणि वर्षाच्या शेवटी काही संघ ‘कौतुक सोहळ्यां’ना जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र येतात. यात वर्षभर तुमचा संघ फक्त तुमच्याच ठिकाणी काम करतो अन त्यामुळे तुमची इतर संघातील मुला-मुलींशी भेट होऊ शकत नाही.
तुमच्या सर्व दादा-ताई निमंत्रकांना जेव्हा आम्ही वर्षातून 
दोनदा कार्यशाळेसाठी भेटायला सुरुवात केली तेव्हापासून बहुतांश निमंत्रकांचा उत्साह निश्चितच वाढीस लागलाय हे आमच्या लक्षात आलं. परंतु तुम्हा मुलांना अशी संधी कुमार निर्माणमध्ये आतापर्यंत मिळत नव्हती. मग यावर काय करता येईल जेणेकरून तुमच्या जवळपासचे संघ्तरी वर्षाच्या मध्ये एकदा एकमेकांना भेटतील असा विचार सुरु असताना 'गेट-टूगेदर' ही आयडिया आम्हाला सुचली. चला तर मग, ‘गेट- टुगेदर’  ही कल्पना नेमकी काय आणि कशी आहे ते समजून घेऊया.
मित्रांनो, ‘गेट- टुगेदर’  म्हणजे मुलांनी मुलांसाठी आयोजित केलेला एक दिवसीय कार्यक्रम होय! यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्हा मुलांनाच करायचं आहे. यात तुमच्या दादा-ताई निमंत्रकांची कमीत कमी मदत तुम्ही घ्यायची आहे. यात होणार असं आहे की जवळपासचे काही संघ एका दिवसासाठी एकत्र येतील आणि वार्षिक कौतुक सोहळ्याला जसे तुम्ही एकमेकांना भेटतात, तुमच्या कृतिकार्यक्रमांचे शेअरिंग करतात, सहभोजन करतात आणि सोबतच खुप सारी मजाही करतात तसंच दिवसभराच्या कार्यक्रमाचं आयोजन करतील. तुमच्या विभागातील एक संघ या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी घेईल आणि इतर संघांना गेट- टुगेदर साठी आमंत्रित करेल.
तर तुम्हाला यात करायचं असं आहे की, तुमच्या आजुबाजूच्या भागात कुमार निर्माणचे तुमच्यासारखेच काही संघ आहेत, त्यांची यादी तुम्हाला बनवायची आहे. (यात निमंत्रक तुमची मदत करतील.) आणि एकमेकांना संपर्क करायचा. या संपर्कातून ठरवायचं आहे की कोणत्या संघाला आयोजनाची जबाबदारी घेणे शक्य आहे. जो संघ आयोजनाची जबाबदारी घेईल त्या संघाकडे पुरेशी जागा उपलब्ध असणंही गरजेचं आहे. आयोजक संघाने दिवसभराच्या कार्यक्रमाचचं नियोजन ठरवायचं आहे. (मदतीला निमंत्रक आणि आम्ही आहोतच)
जे संघ प्रवास करून गेट- टुगेदरसाठी जातील त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी कसं जायचं, तिथे पोहचण्यासाठी कुठले वाहन उपलब्ध आहे, प्रवासाला किती वेळ लागतो, तिथे जाऊन काय नवीन करायचं याचं संपूर्ण नियोजन करायचं आहे. या सोबतच प्रवासाचे पैसे जमवणे हे देखील एक आव्हान असेल.
यात अजून एक गम्मत म्हणजे सर्वांनी आपापला डबा घेऊन जायचा आहे आणि सर्वांनी एकत्र मिळून जेवायचं आहे.
या दिवसभराच्या कार्यक्रमात तुम्ही विविध खेळ, गाणी, नाटकं आणि सोबतच तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकतात आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे यात आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या कृतिकार्यक्रमांचं शेअरिंगही करायचं आहे. कुठल्याही संघाच्या शेअरिंगनंतर, त्यांनी केलेले कृतिकार्यक्रम समजून घेण्यासाठी, त्यांना आलेल्या अडचणी व त्यावर काढलेले उपाय जाणून घेण्यासाठी इतर संघ त्यांना प्रश्नही विचारू शकतात. आता पर्यंतचा अनुभव बघता तुम्हा सर्वांना कौतुक सोहळ्याला मजा येते आणि तुम्ही त्याची वाट बघत असता हे आमच्या लक्षात आलं. हे गेट- टुगेदर म्हणजे या कौतुक सोहळ्याचं छोटं स्वरूप असणार आहे. फरक फक्त एवढाच की कौतुक सोहळ्याचं सगळं नियोजन आम्ही करतो तर या गेट-टुगेदरचं सगळं नियोजन तुम्ही करणार आहात!
चला तर मग लागा कामाला. आणि ठरवा कोण संघ कुठली जबाबदारी घेणार आहेत ते!
आणि हो, आम्हाला (प्रणाली ताई आणि शैलेश दादा) तुमच्या गेट- टुगेदरसाठी बोलवायला विसरू नका हं! जर तुम्ही आम्हाला आठवडाभर आधी कळवलं तर आम्हीही नक्कीच तुमच्या गेट- टुगेदरला येण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि तुमच्यासोबत धम्माल करू!
आता तुमच्या आमंत्रणाची वाट पाहत आहोत. लवकरच भेटुया!
(गेट- टुगेदर मध्ये काय काय करायचं याचा विचार तुम्हीच करायचा आहे. काही अडचण असल्यास आम्हाला नक्की फोन करा.) 

Monday, 26 February 2018

कुमार निर्माण म्हणजे काय रे भाऊ !


कुमार निर्माण म्हणजे काय रे भाऊ !
मुलांनो तुम्ही कुमार निर्माण मध्ये सहभागी तर झालात, पण कुमार निर्माण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का ?
चला तर मग कुमार निर्माण विषयी आपण थोडं जाणून घेऊया.
कुमार निर्माण हा निर्माण - सर्च, गडचिरोली आणि MKCL KF, पुणे या दोन संस्थांद्वारे तुम्हा मुलांसाठी चालवण्यात येणारा एक उपक्रम आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळालेले डॉ. अभय बंग व एम के सी एल चे संस्थापक श्री. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा उपक्रम पाच वर्षांपूर्वी सुरु झाला.
शाळेतील शिक्षण भविष्याच्या दिशेने जसे महत्त्वाचे आहे तसेच शाळेच्या बाहेरील जगातून मिळणारे अनुभवाचे शिक्षण देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षणासोबतच चार भिंतींच्या बाहेर जाऊन, प्रत्यक्ष कृती करून जर आपल्याला शिकता आलं तर अधिक आनंददायी असं अनुभवातून शिक्षण देखील आपल्याला घेता येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आनंदाने कृतीतून शिकता यावं म्हणून हा उपक्रम आहे. इथे शिकता यावं म्हणजे अनेक भन्नाट गोष्टी करून शिकता येणं अपेक्षित आहे.
मनातील चांगले उपक्रम, नवीन आईडिया, विधायक कृती, प्रयोग इ. करण्याची हक्काची जागा म्हणजे कुमार निर्माण! हा उपक्रम तुमचा असल्याने कुठलंही चांगलं काम करण्याचं तुम्हाला येथे स्वातंत्र्य आहे. चला तर मग तुमच्या बुद्धीला चालना द्या, डोकं चालवा आणि नवनवीन कल्पना करा, चांगले चांगले उपक्रम करा, इतरांना मदत करा, आपली, त्यासोबतच आपल्या घरच्यांची, मित्रांची, परिसराची त्यातील व्यक्तींची, प्राण्यांची, झाडांची आणि इतरही सर्व गोष्टींची काळजी घ्या, आणि हे सगळं करत असतांना भरपूर मज्जा करा!
कुमार निर्माण मधील उपक्रम तुम्ही मुलांनी स्वतः निवडायचे आणि संघात चर्चा करून ठरवायचे आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या संघासोबत काम करणाऱ्या ताई, दादा, पालक, शिक्षक यांची मदत घेऊ शकता. (या तुमच्या ताई, दादा, पालक, शिक्षक यांना आम्ही ‘निमंत्रक’ असे म्हणतो) तुम्हाला उपक्रम सुचण्यासाठी तुम्ही परिसराकडे उघड्या डोळ्यांनी बघणं गरजेचं आहे. परिसराचं निरीक्षण करून, विचार करून, चर्चा करून उपक्रम निवडावे आणि त्यावर कृती करावी असं अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला गरजेनुसार मदत करूच.
तुमच्या माहितीसाठी मागील वर्षात कुमार निर्माणच्या संघांनी केलेले काही कृती कार्यक्रम या अंकात देत आहोत. हे उपक्रम मुलांना सुचलेले आहेत आणि त्यांनीच ते प्रत्यक्षात उतरवलेले आहेत. तुम्हीदेखील असे उपक्रम नक्कीच करू शकता आणि इतरही नवे उपक्रम करू शकता.
कुमार निर्माण मध्ये उपक्रम करताना एक काळजी नक्की घ्या की ते उपक्रम करताना कुणालाही त्रास होता कामा नये, परिसराचं नुकसान होऊ नये आणि संघातील कुणालाही इजा होता कामा नये.
चला तर मग तुम्हाला असे उपक्रम करण्यासठी अनेक शुभेच्छा! एखादा उपक्रम करताना किंवा सुचण्यास तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला देखील फोन करू शकता. त्या सोबतच उपक्रम करताना किंवा उपक्रमानंतर तुम्हाला काय अनुभव आला तेही आम्हाला नक्की लिहून अथवा फोन वर कळवा.
तुमचे,
कुमार निर्माण टीम

संघप्रमुख व संघबैठक


संघप्रमुख
रविवारची मस्त सकाळ उजाडली. आज शाळा नसल्यामुळे सुरज मात्र अंथरुणातच लोळत होता. रात्री उशीरापर्यंत जागून त्याने भारत – इंग्लंड क्रिकेट मॅच पहिली होती. त्यामुळे आईनेदेखील त्याला अजून उठवायला हाक मारली नव्हती. बाबा आणि आई कालच्या मॅच विषयीच बोलत होते.
‘काय सुंदर मॅच झाली ना काल?’, आई म्हणाली.
‘विराट सारखा कप्तान असल्यावर टीम सुंदर काम करणारच’, बाबा म्हणाले.
सुरज अर्धवट झोपेत हे संभाषण ऐकत होता. अचानक त्याला आठवलं की आज सकाळी कुमार निर्माण संघाची बैठक आहे. सुरज आपल्या कुमार निर्माण संघाचा प्रमुख होता. संघाच्या बैठका बोलावणं, त्यामध्ये काय झालं हे लिहून ठेवणं, मुलांशी व निमंत्रकांशी संपर्क ठेवणं ही त्याची जबाबदारी होती.
सुरज खडबडून जागा झाला, अंथरून फेकून देतच तो उठला व आन्हिक आवरायला पळाला. आई-बाबा त्याच्या गडबडीकडे आश्चर्याने पहातच राहिले.
‘आज कुमार निर्माणची बैठक आहे, संघप्रमुख म्हणून मी सर्वात आधी पोचायला हवं!’, सुरजने घोषणा केली.
अंघोळ करून सुरजने स्वच्छ कपडे घातले. आईने दिलेला दुधाचा ग्लास एका घोटात रिकामा करून तो बाहेर पडणार इतक्यात त्याला त्याचं अंथरूण दिसलं.
‘कुमार निर्माण संघात असताना मी माझी कामं स्वत: करायलाच हवीत, त्यात मी तर संघप्रमुख आहे! अंथरुणाची घडी घालूनच जायला हवं’, त्याच्या मनात विचार आला.
अंथरुणाची घडी घालून त्याने ते जागेवर ठेवलं. संघाची नोंदवही आणि पेन घेऊन उत्साहाने तो घराबाहेर पडला.
------------------------------------------------------------------------------------
१.      संघप्रमुखाच्या जबाबदाऱ्या काय यावर चर्चा करा.         
२.      संघप्रमुख लोकशाही पद्धतीने निवडा.
संघ बैठक
सुरज लगबगीने बैठकीच्या ठिकाणी म्हणजे शाळेसमोरील झाडाखाली पोहचला. संघातील प्रिया व मोनाली या दोघी तिथे आधीच पोहोचलेल्या होत्या. त्यांच्यासोबत संघ निमंत्रक ‘वृषाली ताई’ देखील होत्या. मग सुरज, प्रिया आणि मोनाली यांनी मिळून कोण कोणाला बोलावणार हे ठरवलं व त्याप्रमाणे त्यांनी संघातील इतर सर्वांना बोलावून आणलं. सगळे आल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली पण या सगळ्यात बैठकीला ठरलेल्या वेळेपेक्षा जवळपास अर्धा तास उशीर झाला होता.
सगळयांनी एक छान गाणं म्हणून बैठकीची सुरुवात केली. त्या नंतर चर्चेला सुरुवात झाली. गप्पा छान रंगात आल्या होत्या पुढची
कृती काय करणार यावर सगळे हिरीरीने आपापली मतं मांडत होती. तेवढ्यात वृषाली ताईंनी मुलांना घड्याळ दाखवत थांबवलं.
“चला मुलांनो मला आता निघायला लागेल. माझं जरा तालुक्याच्या ठिकाणी काम आहे.”
मुला-मुलींना एवढी रंगत आलेली बैठक सोडून जायला नको होतं. या बैठकीत काय कृती करायची हे ठरवायचंच असं त्यांनी ठरवलं होतं. बैठकीच्या शेवटी नेहमीप्रमाणे खेळ देखील खेळायचा होता आणि आता मध्येच ताई जायचं म्हणत होत्या. काहींना तर ताईंचा राग देखील आला.
“ताई जरा वेळात आपली बैठक संपेलच” प्रशांत म्हणाला.
पण ताईंना तालुक्याच्या गावी जाण्यासाठी एकच एसटी होती त्यामुळे ताईंना वेळेत निघायला हवं होतं.
“तुम्ही बैठक सुरु ठेवा, बैठकीत काय झालं ते सुरज मला सांगेल.” असं म्हणून ताई तिथून निघाल्या. ताई मधूनच गेल्याने सर्वांचाच मूड गेला.
“ताई अशा कशा जाऊ शकतात बैठक सोडून?” प्रशांत जरा रागातच म्हणाला.
“आपण उशिरा आल्याने बैठक उशिरा सुरु झाली म्हणून ताईंना अशी बैठक अर्ध्यात सोडून जावं लागलं” प्रिया समजूतदार पणे म्हणाली.
“माझा अभ्यास बाकी होता, मी तो संपवून आलो म्हणून मला उशीर झाला.” मनोज म्हणाला.
“माझी आवडती सिरीयल सुरु होती” सानिका जीभ चावत म्हणाली.
“काही असलं तरी आपली बैठक आहे हे आपल्या सर्वांना माहिती होतं तरी देखील आपण उशिरा आलो म्हणून आज ताईंना असं बैठक सोडून जावं लागलं” मोनाली म्हणाली. सर्वांनी यावर काही वेळ विचार केला. शेवटी इथून पुढे योग्य नियोजन करून बैठकीला वेळेत हजर राहायचं सगळ्यांनी कबुल केलं.
“पुढच्या बैठकीला ताईंना आपण सॉरी म्हणूया.” प्रशांत म्हणाला
“चला तर मग पुढची बैठक वेळेत सुरु करूया आणि आता खेळ खेळूया” असं म्हणत मुलं-मुली खेळ खेळला मैदानाकडे पळाली..
-----------------------------------------------------------------------------------------
असंच इतर गटांच्या बैठकीत काय झालं ते बघूया...
झोळंबे, सिंधुदुर्ग
आमची पहिली बैठक १० फेब्रुवारीला झाली. बैठकीत मुलांच्या आवडीचे बरेच खेळ घेतले. एक गाणंही घेतलं. मुलांनी संघाला काही नावं सुचवली, त्याचा निर्णय पुढच्या बैठकीत करायचा ठरला. नोंदवहीदेखील तेव्हाच करायची ठरली.
मग संघप्रमुख कसा निवडावा यावर चर्चा सुरु झाली आणि मुलांनी वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या. जसे की, चिठ्ठ्या करून एक प्रमुख निवडणे, ज्यांची इच्छा आहे त्यांनी उभे राहून साधे मतदान करणे, दोन गट करून प्रत्येक गटाचा एक प्रतिनिधी ठरवून नंतर त्या दोघांत मतदान घेणे आणि प्रत्येकाने आपल्याला कोण प्रमुख व्हावा असे वाटते त्याची चिठ्ठी बनवणे व ज्याच्या नावाच्या जास्त चिठ्ठ्या येतील तो प्रमुख!
यातून शेवटी पहिल्या पद्धतीला बहुमत आल्याने चिठ्ठ्या करून एक प्रमुख निवडला. प्रमुख मात्र दर महिन्याला बदलायचे ठरले. म्हणजे पुढच्या महिन्यात; १० मार्चला नवीन प्रमुख होणार. तेव्हा कॅलेंडर पाहून मुलांच्या लक्षात आलं की तेव्हाही शनिवार आहे. मग प्रत्येक महिन्यात असं होतं का की याच महिन्यात असं आहे? लीप वर्ष आहे का हे? लीप वर्ष म्हणजे काय? अशी चर्चा आपसूक सुरु झाली. एक मुलगी स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्ता चाचणीच्या अभ्यासातील वर्ष आणि वारांचे नियम सांगू लागली. मला हे सगळं पाहून फार मज्जा येत होती. माझ्या अपेक्षेपेक्षा मुलांनी छान प्रतिसाद दिला. बैठक छान झाली!
निमंत्रक: अश्विनी जोशी, झोळंबे, सिंधुदुर्ग
राईझिंग स्टार्स संघ, जळगाव
आम्ही आमची बैठक माझ्या घरीच घेतली. संघाचं नाव व प्रमुख मतदान करून ठरवावे लागले. आमच्या संघाचं नाव राईझिंग स्टार्स असं ठरलं आहे.
नंतर नुकताच कुमार निर्माणचे मार्गदर्शक डॉ. अभय व राणी बंग यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराचा आधार घेऊन चर्चा सुरु झाली. पुढचे दोन तास वेगवेगळ्या बाजूंनी आम्ही यावर चर्चा करत होतो. एकूण बैठक छान झाली.
निमंत्रक: मंजुषा पत्की, जळगाव


संस्कृती संघ, मुक्ताईनगर
आमच्या संघाची पहिली बैठक जोशात पार पडली. त्यातील काही ठळक मुद्दे – बैठकीची सुरुवात व शेवट उत्साहपूर्ण खेळाने झाली. वेगळ्या पद्धतीने सर्वांचा परिचय करून घेतला. कुमार निर्माणबद्दल सर्वांना माहिती सांगितली व त्यावर चर्चा केली. मग संघाचे नाव ठरवायची वेळ आली तेव्हा संस्कार आणि संस्कृती अशी दोन नावे समोर आली. मग मुलांनी मतदान करून संस्कृती हे नाव ठरवलं. संघप्रमुखाची निवडही मतदान करूनच केली. त्यानंतर कुमार निर्माणचे माहिती पत्रक वाचण्यात आले आणि बैठकीचा समारोप झाला.
निमंत्रक: योगेश जवंजाळ, मुक्ताईनगर
स्पंदन संघ, दापोली
आमच्या संघाची पहिली बैठक ११ फेब्रुवारीला झाली. सुरुवातीला आम्ही चिठ्ठ्या टाकून संघाचं नाव स्पंदन ठेवलं. सगळ्यांनी मिळून संघातील गायत्रीला संघप्रमुख म्हणून नेमलं. मग पालकसभा घ्यावी असं मी सुचवलं तेव्हा उद्या पालकांना विचारून तारीख ठरवुया असं मुलं म्हणाली. मग २५ फेब्रुवारीला म्हणजे रविवारी गावाच्या नदीवर डबापार्टी करण्याचे ठरले आणि त्याचे नियोजन पुढील सभेत करू असं मुलांनी ठरवलं. ‘वादळ सुटलं वारा सुटला’ हा खेळ आम्ही खेळलो आणि नंतर ‘पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी... या मनामनातून भांधूया एक वाट जाणारी’ हे गाणं सर्वांनी मिळून म्हटलं. मुलं फारच उत्साहात होती, त्यांना मजा वाटत होती वेगळं काहीतरी करणार याची!
निमंत्रक: सुप्रिया पाटणकर, दापोली




प्रगती संघ, दापोली
आमच्या प्रगती संघाची पहिली सभा ७ फेब्रुवारीला झाली. संघाचं नाव मुलांनी पहिलेच ठरवलं होतं. मग मुलांनी चिठ्ठ्या टाकून प्रियांशूची संघप्रमुख म्हणून निवड केली. मग उप संघप्रमुखही निवडायचं ठरवलं. पुन्हा चिठ्ठ्या टाकून तन्वीची उप संघप्रमुख म्हणून निवड झाली. मुलांनी पुढच्या बैठकीत पालकसभा आणि डबा पार्टी घेण्याचं ठरवलंय. मुलांनी प्रश्नखोका तयार केला आहे. त्यात त्यांना पडलेले प्रश्न चिठ्ठ्यांवर लिहून टाकले आहेत. जसे की, सह्याद्री शिखर उंच का आहे?, काच कशाची बनते?, फुलांमध्ये मध कुठून तयार होतो? आपल्या शरीरात मन नावाचा अवयव नाही तरीही आपण मनापासून हे करा ते करा असं का म्हणतो?, कांगारूच्या पोटाला पिशवी का असते?, समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का दिसतो?, जगात ज्वालामुखी का असतात?, पृथ्वीसारखी जीवसृष्टी सूर्यमालेतील इतर ग्रहांवर का नाही?, इ. यातील काही प्रश्नांची आम्ही चर्चा केली आणि नंतर मग आम्ही ‘लंबी दाढीवाले बाssबाss’ हे गाणं म्हटलं आणि बैठक संपली!
निमंत्रक: विद्यालंकार घारपुरे, दापोली
लिटील ग्रुप, अकोला
आम्ही आमच्या बैठकीला प्रार्थनेने सुरुवात केली. नंतर एक खेळातून सर्वांशी ओळख करून घेतली. मग मुलांना कुमार निर्माणची
माहिती सांगितली, त्यात मुलांनीही काही प्रश्न विचारले. डॉ. अभय बंग यांच्या विषयी जाणून घेण्यास मुले उत्सुक होती.
संघाचं नाव ठरवताना प्रत्येकाने आपल्या संघाचं नाव काय असावं ते सांगितलं. त्यात मुलांनी बरीच नावं सुचवली. मग प्रत्येकाने स्वतःला हवं असणाऱ्या नावाची एक-एक चिठ्ठी टाकली. त्यातून एक चिठ्ठी उचलली अन त्यानुसार मुलांनी संघाचं नाव लिटील ग्रुप असं ठेवलं. चिठ्ठ्यांच्या मदतीनेच गौरव हा संघप्रमुख तर आदर्श हा उप संघप्रमुख बनला.
आम्ही परत एक खेळ खेळलो आणि पुढच्या बैठकीत आम्ही डब्बापार्टी करायचं ठरवलं आहे. अशाप्रकारे आमच्या संघाची सुरुवात छान झाली!
निमंत्रक: प्रतिभा काटे, सारिका तेलगोटे, अकोला
प्रगती संघ, बेडकुचीवाडी, बीड
आमच्या प्रगती संघाची बैठक ८ फेब्रुवारी रोजी झाली. बैठकीची सुरवात छानपैकी खेळाने करण्यात आली.
नंतर मुलांनी पालकसभा भरवली. दादांनी सुरुवातीला पालकांना कुमार निर्माण बद्दल सविस्तर माहिती दिली. आम्ही कुमार निर्माण मध्ये काय काय करतो, निमंञक म्हणुन दादा काय करतात हे पण पालकांना सांगितलं. आमचा संघ मागील एक वर्षापासून कुमार निर्माण मध्ये असल्यामुळे संघातील सागरने पुर्ण वर्षभरात आम्ही काय काय केलं व कशी मज्जा आली ते पालकांना सांगितलं. त्यानंतर पालकांनी काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं आम्ही दिली. हे सर्व आटोपल्यानंतर पालक गेले.
मग दादांनी बैठकीत संघप्रमुख निवडीबद्दल विचारलं. आम्ही भन्नाट आयडिया सुचवल्या; एकजण म्हणे चिठ्ठी टाकून निवडू तर दुसरा दादांना म्हणे तुम्हीच ठरवा. दादा म्हटले संघप्रमुख तुम्हीच निवडावा. तर ओंकारने मतदान करून निवड करायची असं सुचवलं. तर सर्वजण तयार झाले. पण सुरुवातीला उमेदवार म्हणुन चार-पाच जण उभे राहिले, मग आधी संघप्रमुखाची कामं काय काय असतील यावर आम्ही चर्चा केली तर सगळे उभे राहिलेले उमेदवार खाली बसले. त्यानंतर सागर आणि रूपाली स्वत:हून निवडणूकीला उभे राहिले. ओंकार व अभिजीत या दोघांनी निवडणुकीचे नियम ठरवले, तसंच उमेदवाराला त्यांचं चिन्ह विचारून घेतलं.
नियम –
·        निवडणुकीमध्ये कुणीही गोंधळ घालायचा नाही.
·        मतदान करताना एकावेळी एकच जण खोलीत जाईल.
·        नावाच्या पुढे फक्त एकच खुण करायची.
·        मतमोजणी करून जिंकलेल्या संघप्रमुखाचे अभिनंदन करायचं.
·        सर्वांनी ठरवलं की संघप्रमुख दर तीन महिन्याला याच पध्दतीने बदलण्यात येईल.
मग एका वहीवर प्रगती संघ निवडणुक २०१८ व तसेच  दोन्ही उमेदवाराची नावे, त्यांची चिन्ह टाकून तयार केली. दोघेजण दरवाज्याजवळ थांबुन एकेकाला आतमध्ये सोडत होते. अशाप्रकारे प्रगती संघाची निवडणुक एकदम सुरळीत पार पडली!
मतमोजणी करून जिंकलेल्या उमेदवाराचं म्हणजे रूपालीचं सर्वांनी आभिनंदन केलं. विशेष म्हणजे आमच्यातील काही मुलांनी सागरला सॉरीही म्हटलं की आम्ही तुला मत नाही दिलं.
बैठकीच्या शेवटी दादांनी आम्हाला डब्बा पार्टी बद्दल विचारलं तर सर्वांनी खुप आनंदाने ठरवलं की शेजारील गावाजवळ नदीच्या कडेला छान मंदिर, नदीवर बंधारा आहे तिकडे जाऊया. आम्ही १३ तारखेचा महाशिवराञी निमित्त सुट्टीचा दिवस निवडला.
एकंदरीत आमची बैठक मस्त झाली आणि आम्ही खुप मज्जाही केली.
निमंत्रक: सदानंद चिंचकर, बेडकुची वाडी, बीड