Wednesday 1 August 2018

‘सांकव संघ’ बैठक



सुरज आज खूप आनंदात होता कारण त्यांच्या संघाने आयोजित केलेले गेटटुगेदर खूपच छान झाले होते. त्यांचा ‘सांकव’ संघ जवळच्या गावातील ‘आनंदाचे शिलेदार’ संघ आणि टेकडी पलीकडील पाड्यावरचा ‘अवेंजर’ संघ असे तीन संघ या गेटटुगेदर साठी एकत्र जमले होते. तीनही संघांनी मिळून खूप धमाल केली.
सांकव संघाने गेट टुगेदरसाठी या दोन संघाना बोलावण्यासाठी एक छान निमंत्रण पत्र त्यांना पाठवलं होतं (ही कल्पना त्यांना देगावच्या संघाने लिहिलेलं पत्र बघून सुचली). त्यात त्यांनी या दोन संघांनी काय काय तयारी करून यावी हे देखील नमूद केलं होतं. त्याशिवाय तुमच्या काही कल्पना किंवा सूचना असतील तर त्या देखील नक्की सांगा असं आवाहन देखील केलं होतं. ‘आनंदाचे शिलेदार’ यांनी लगेच आम्ही नक्कीच येऊ व तुम्ही सांगितलेली सर्व तयारी करून येऊ असं उत्तरही पाठवलं. ‘अवेंजर’ संघाने देखील पत्र पाठवून आम्ही येतोय असं कळवलं. त्यासोबतच हे गेटटुगेदर आमच्याकडे घ्यायला आम्हाला आवडलं असतं पण काही हरकत नाही पुढच्यावेळेस आमच्याकडे करू आता तुमच्याकडे करूया असं देखील त्यांनी त्या पत्रात लिहिलं. ‘सांकव’ संघाने लगेच बैठक बोलावून नियोजनाविषयी चर्चा केली. या बैठकीत गेटटुगेदर मध्ये काय काय करायचं याचं नियोजन करून एक वेळापत्रक सांकव संघाने बनवलं (अगदी संस्कृती संघाने बनवलं तसंच) आणि ते देखील या दोन संघाना पाठवलं.
ठरलेल्या दिवशी नियोजित पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पडला. मुला-मुलींनी गाणी म्हटली, विनोद सांगितले, एकमेकांना कोडी विचारली, सर्व संघांनी मिळून खेळ खेळले, एक सिनेमा बघितला. सोबतच आतापर्यंत झालेले कृतिकार्यक्रम आणि पुढील कृतिकार्यक्रमांचे नियोजन याविषयी देखील सर्वांनी मिळून चर्चा केली. अवेंजर संघाने एक छान नाटक बसवलं होतं ते सादर केलं तर आनंदाचे शिलेदार संघाने सर्वांसाठी भेळ आणली होती ती सर्वांनी खाल्ली. दुपारी सर्वांनी सोबत आणलेले डब्बे मिळून फस्त केले. सगळ्या आठवणी, नवीन मित्र-मैत्रिणी आणि पुन्हा भेटण्याचं प्रॉमिस घेऊन सगळे आपापल्या घरी गेले.

त्यानंतर सांकव संघाची आज आठवड्याची बैठक होती. वृषाली ताईंनी सर्वांचं कौतुक केलं. गेट टुगेदरचे अनुभव ऐकून झाल्यानंतर चर्चा पुढील नियोजनाकडे वळाली.
“ताई या महिन्यात झेंडावंदन आहे.” मोनाली म्हणाली.
“नाही स्वातंत्र्य दिन आहे.” लिसा म्हणाली.
“बरोबर आहे दोघींचंही, स्वातंत्र्यदिन आहे म्हणूनच आपण त्यादिवशी झेंडावंदन करतो.” वृषाली ताईंनी माहिती पुरवली.
“पण ताई झेंडावंदन आणि स्वातंत्र्यदिन वेगवेगळा असतो का ?” फातिमाने विचारलं.
“एवढंही माहिती नाही का ?” मनोज बोलून गेला पण मग त्यालाही आपल्याला यातील फरक माहिती नसल्याची जाणीव झाली आणि त्याने चीभ चावली.
“याचं उत्तर आता तुम्हीच शोधून मला सांगा.” वृषाली ताई म्हणाल्या.
“पण ताई, आपण काय करूया स्वातंत्र्य दिनाला ?” मोनालीने पुन्हा आपला मुद्दा मांडला.
“अरे आपलं काय ठरलंय ? हा संघ तुमचा आहे तेव्हा काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. मी फक्त बघायला आणि तुम्हाला मदत करायला आहे. फक्त हे उपक्रम करताना त्यात नाविन्य आणि उपयुक्तता असेल यासाठी आपण प्रयत्न करूया. बाकी कुमार निर्माण मध्ये कृतिकार्यक्रम किंवा उपक्रम करताना कुठले नियम पाळायचे असतात, हे तुम्हाला माहिती आहेच.” वृषालीताईंनी मुला-मुलींना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
सगळे विचार करू लागले.
“ताई, आत्ता लगेच काही सुचत नाहीये. आम्ही विचार करून सांगतो आपण पुढच्या बैठकीत ठरवूया काय करायचं ते.” अरबाझ म्हणाला.
“ताई, आता स्वातंत्र्य दिनासोबतच पुढे नागपंचमी, बकरी ईद, पोळा, गणपती असे अनेक सण येत आहेत.” सुरज म्हणाला. “त्या-त्या वेळेस काय करायचं याचं देखील नियोजन आपल्याला केलं पाहिजे.”
“बरोबर सुरज, तर आता पुढील बैठकीसाठी येताना आपण सगळे एक काम करूया का? या दोन महिन्यांत कुठले कुठले सण येत आहेत आणि त्या सणांना आपला कुमार निर्माणचा सांकव संघ काय-काय करू शकतो याविषयी जरा विचार करून या. म्हणजे आपल्याला पुढील दोन महिन्यात करायच्या उपक्रमांचं नियोजन करता येईल.” वृषाली ताई म्हणाल्या.
“येस्स ताई!!!” सगळे मुलं-मुली एका सुरात म्हणाले.
“तत्पूर्वी आपण या भरारी मध्ये आलेलं कुमार गीत ‘आम्ही प्रकाश बीजे .....’ म्हणायचं का?” वृषाली ताईंनी विचारलं.
“पण ताई आम्हाला कुठे त्याची चाल माहिती आहे?” मनोजचा प्रश्न तयार होता.
“अरे भरारी मध्ये त्या कुमार गीताच्या चालीसाठी युट्युब लिंक दिलेली असते. आपण युट्युबवर ते गाणं बघू म्हणजे त्यातून आपल्याला त्याची चाल कळेल” लिसाने समजावलं.
सगळ्यांनी मग वृषाली ताईंच्या लॅपटॉपवर ‘आम्ही प्रकाश बीजे...’ या गीताचा विडीयो बघितला आणि ते गीत म्हटले. 
तुम्ही देखील तुमच्या संघाचे असे पुढील दोन महिन्यासाठी नियोजन करू शकाल का? प्रयत्न तर करून बघा!



 

No comments:

Post a Comment