Wednesday 1 August 2018

उल्लेखनीय कृतीकार्यक्रम


लहान मुलांचे शिबीर
आम्ही लहान मुलांचे शिबीर घ्यायचं ठरवलं. पण आमच्या परिसरात लहान मुलं नव्हती आणि आम्ही सगळे पण एका परिसारत राहत नाही मग शिबीर कुठे घ्यायचं याचा विचार केल्यानंतर महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांसाठी शिबीर घ्यायचं असं ठरलं. त्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना एक विनंती अर्ज लिहिला आणि तो घेऊन त्यांच्या कार्यालयात गेलो. पण तेव्हा नेमके ते अधिकारी कामानिमित्त बाहेर गेलेले होते. मग आम्ही काही वेळ वाट बघून परत आलो. जेव्हा ते अधिकारी परत आले तेव्हा त्यांनी आमचे पत्र वाचून आम्हाला परवानगी दिली व तसे फोन करून कळवले.


आम्ही शिबिराचे नियोजन करण्यासाठी बैठक घेतली. त्यात कोण-कोण काय-काय करणार याविषयी चर्चा केली. शिबिरासाठी कामात येतील अशा काय काय वस्तू घरी आहेत हे देखील बघायचं ठरलं. ठरल्यानुसार आम्ही महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७१३३ मध्ये गेलो. तेथील तिसरीच्या वर्गावर आम्ही शिबीर घेणार होतो. तिथे मुलं आणि मुलींचे वर्ग वेगळे होते. मग आम्ही आमच्यात देखील दोन गट केले. एक गट मुलांच्या वर्गावर गेला तर दुसरा मुलींच्या वर्गावर.
मुला-मुलीना बोअर नाही झालं पाहिजे याची आम्ही काळजी घेत होतो. त्यासाठी खेळ, क्राफ्ट, जोक्स असे आलटून पालटून सांगत होतो. आम्ही त्यांच्यासोबत विविध क्राफ्ट तयार केले. श्लोक ने सर्वांना जोक सांगून हसवलं. चित्र काढली. आम्ही मुलांना कागाची टोपी बनवायला शिकवली. तर बाकीच्या वर्गातील मुलंही ‘आम्हाला पण टोपी शिकवा’ म्हणत होती. मग आम्ही त्यांना पण टोपी बनवायला शिकवली. कागाचे फटाके देखील बनवले. चित्र काढतानी मुला-मुलींनी खूप मजा केली. त्यांनी रंगत हात बुडवले. नंतर आम्ही हत्तीला शेपूट लावायचा खेळ घेतला. तेव्हा देखील मुलांना खूप मज्जा आली. सुरुवातीला त्यांच्या टीचर पण वर्गात होत्या तेव्हा मुलं जास्त खुलत नव्हती. पण टीचर काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुलं चांगली मिक्स झाली.
सगळे कार्यक्रम घेताना आम्हाला वेळ जरा कमीच पडला. अजून व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे होतं. आम्हाला वाटलेलं की एक-एक उपक्रमाला कमी वेळ लागेल पण प्रत्यक्षात जास्त वेळ लागला.
वेळ संपल्यावर सगळे मुलं-मुली विचारत होते, ‘तुम्ही परत कधी येणार?’ ‘तुम्ही रोज येणार का?’ मुलांना देखील खूप मजा आली आणि आम्हाला देखील खूप मजा आली.
मी माणूस संघ नाशिक
 मुलांनी केली शेती

बावधन येथील कुमार निर्माणच्या ‘ग्लोरिया किड्स’ या संघाने एक भन्नाट उपक्रम केला. शेती कशी करतात हे बघण्यासाठी त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या माळी दादाच्या मदतीने पालक लावला व त्याची काळजी घेतली. जेव्हा पालक भाजी मोठी झाली तेव्हा मुलांनी तो काढून आपापल्या घरी नेला व पालकचा उपयोग करून वेगवेगळे पदार्थ बनवले. हे सगळे पदार्थ घेऊन मुलांनी मस्त पैकी डब्बा पार्टी केली. तुम्हालाही ऐकायचंय का पालकचे नेमके कुठले कुठले पदार्थ या मुलांच्या डबा पार्टीला होते ते? तर पालक पनीर, पालक पकोडा, पालक कचोरी, पालक पिझ्झा, पालक इडली, पालक सॅंडविच, दाल पालक, आणि पालक भाजी. बापरे बापरे... एवढे पदार्थ! स्वतः उगवलेल्या पालकचे एवढे पदार्थ मुलांना नक्कीच खूप चविष्ट लागले असणार.


आता आम्ही आनंदाने खेळू शकू
आमची कुमार निर्माणची बैठक होती. मॅडम आल्यानंतर मुले जमा झाली. सर्वांत आधी आम्ही गाणी म्हटली. ‘लांबी दाढी वाले बाबा, गाडी आली गाडी आली आणि मग आम्ही सर्वांनी मिळून भरारीचं वाचन केलं. त्यावर विचार घेतले. नंतर काहीतरी करावं म्हणून विचार करू लागले. आमच्यातील एक जण म्हणाला, “आपण परिसरात वृक्षारोपण करूया.” मात्र मॅडम म्हणाल्या आपल्या परिसरात खूपच झाडे आहेत. त्यामुळे दुसरे काही विचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोन - तीन जण मल्लखांब खेळत असणाऱ्या मुलांकडे गेले. त्यातील काही मुलं पुश-अप्स काढण्यासाठी त्याकडे गेली पण त्याठिकाणी पाणी साचले होते व त्यावर मच्छर उडत होती. त्यावर काही करता येईल का? आम्ही मॅडमला विचारलं. आपण हे खड्डे बुजवावेत. त्यावर त्यांनी होकार दिला. मग आम्ही सर्वांनी वेगवेगळा विचार करण्यास सुरुवात केली. कुणी म्हणालं ‘आपण आधी दगड टाकू.’ मात्र ते शक्य नव्हते; कारण त्या ठिकाणी लहान मुले सुद्धा खेळतात. मग त्यावर चढताच आले नसते. मग कुणी म्हणालं ‘आपण खडी टाकू, मात्र ते सुद्धा चालणार नव्हतं. मग आम्ही मॅडमला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं; ‘ आपल्या परिसरात असे काय आहे, की रिकामे पडले आहे, आणि आपण त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्यावर होस्टेलची मुलांनी सांगितलं की आपण माती टाकू शकतो. मात्र माती टाकल्याने गाराच झाला असता. त्यावर एकाने सांगितले की हॉस्टेलच्या बाजूला रेती भरलेल्या पिशव्या पडल्या आहेत. आपण रेती टाकू शकतो. मग आमचं ठरलं. मात्र ती रेती आणायची कशी हा विचार सुरु झाला.


मग हॉस्टेलची मुले म्हणाली आपण लोटगाडी आणून त्यावर आणू शकतो. मग आम्ही लोटगाडी आणली. त्यावर काही मुलांनी रेतीच्या पिशव्या ठेवल्या. त्या आणल्या आणि ज्या ठिकाणी खड्डे होते पाणी साचले होते त्या ठिकाणी ते टाकले. दुसऱ्या मुलांनी ती रेती पसरवण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने आम्ही जाड-बारीक रेती टाकून त्या ठिकाणची जागा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सर्वांनी आम्हाला शाबासकी देखील दिली. आम्हाला त्यामुळे अधिक विचार करण्याची प्रेरणा मिळाली.
आम्ही अशाच पद्धतीने अजून वेगवेगळे विचार करण्याचा प्रयत्न करावा असे सर्वांचे म्हणणे पडले आणि आम्ही ते सर्वांनी मनाने स्वीकारले सुद्धा! 
धमालमस्ती संघ
सावदा, जळगाव
 आम्ही पाणी मोजलं!
आता आम्ही आपण रोज किती पाणी वापरतो याचं मोजमाप करण्याचा उपक्रम करत आहोत. मागील वर्षी आम्ही आपल्याकडे पावसाचं किती पाणी पडतं हे मोजलं होतं. आपण कमीत कमी पाणी वापरलं पाहिजे म्हणून आम्ही हा उपक्रम करत आहोत. आम्ही आठवडाभर रोज आपण किती आणि वापरतो याचे मोजमाप करतो आहोत. आम्ही सगळ्या कामांसाठी लागणारं पाणी मोजतो. पिण्याचे पाणी मोजण्यासाठी आम्ही एक तांब्यात किती पाणी मावतं तसंच एक पेल्यात किती पाणी मावतं हे मोजलं आहे. त्यानुसार आपण दिवसात किती पाणी पितो हे मोजता येतं. तर आई-वडील शेतात जाताना पिण्याच्या पाण्याचा हंडा घेऊन जातात त्या हंड्यात किती पाणी मावतं ते पण आम्ही मोजलं आहे. बादली मध्ये किती पाणी आहे हे पाहण्यासाठी बादलीवर खुणा असतात. त्यामुळे आम्ही धुनी, भांडी, आंघोळ, फरशी पुसणे या कामांसाठी किती पाणी लागले हे देखील मोजता येतं.
अशाप्रकारे दिवसाला किती पाणी लागलं हे मोजून आम्ही पाण्याचा वापर कुठे कमी करता येईल हे बघणार आहोत.
प्रगती संघ
बेडूकवाडी, बीड

 ग्रहणाची चर्चा !
देगावच्या स्पंदन गटाच्या बैठकीत ग्रहणाचा विषय मुलांनीच काढला. त्यावर भरपूर चर्चा ‘झाली अंधश्रद्धेची वावटळ’ या पुस्तकातील ग्रहणाबद्दलचं लिखाण वाचूया असं देखील मुला-मुलींनीच सुचवलं. मग ते वाचून त्यावर पुन्हा चर्चा झाली. ‘ग्रहणाविषयी अंधश्रद्धा बाळगणार नाही व ग्रहण बघणारच’ अशी प्रतिज्ञा सर्वांनी केली. त्यासोबच घरच्यांनाही ग्रहण दाखवायचं असं देखील मुला-मुलींनी ठरवलं.
ग्रहण बघितल्या नंतरचे काही अनुभव पुढे देत आहोत.
मी शाळेतून येत होती तेव्हा शेजारच्या आज्या गप्पा मारत होत्या आणि बोलत होत्या की ‘आता चंद्रग्रहण लागणार आहे. आता कोणी बाहेर नका पडू. आपल्याला काहीतरी व्हायचं.’ असं बोलत होत्या. ते मी ऐकलं आणि मी त्यांना तिथे जाऊन सांगितलं, “आजी असं काही नसतं. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. चंद्रग्रहण बघितल्यामुळे आपल्याला विविध तारे दिसतात. तुमच्या मनात काही आहे तसं काहीच नसतं. मी त्यांना सांगितले की तुम्ही चंद्रग्रहण पहा. त्यांनी चंद्रग्रहण लागायला सुरुवात झाल्यावर दरवाजा बंद करून घरात बसले.’

——————————————————————————————-
‘मी ग्रहण रात्री ११ वाजता पाहिलं पण त्याच्या अगोदर माझी आजी, मम्मी मला पाठवत नव्हत्या. माझी मम्मी म्हणाली ‘तुला काही समजतं का? ग्रहण पहायचं नसतं. आपल्या डोळ्यांना फार त्रास होतो. पण मी तिला बोलले की ग्रहणामुळे आपल्याला काहीच त्रास होत नाही. ग्रहण म्हणजे एकप्रकारे पृथ्वीचा उपग्रह चंद्र लाल होतो. नंतर तिला मी विचारलं आता मी जाऊ का ग्रहण बघायला? तरीही माझी मम्मी मला ग्रहण बघायला पाठवत नव्हती. मग मी आम्हाला बाईनी दिलेले ‘अंधश्रद्धेची वावटळ’ पुस्तक दिले व त्यातील ‘ग्रहण व करणी’ हा भाग वाचण्यास सांगितला. पण तिने त्यातला कोणताच भाग वाचून काढला नाही. दादा आणि मी मम्मी जेव्हा स्वयंपाक घरात काम करत होती तेव्हा बाबा झोपले होते तेव्हा आम्ही दोघांनी ग्रहण पाहिले. तेव्हा चंद्र लाल झालेला. पण दादा थोडं घाबरत होता. तेव्हा मी त्याला विचारलं तुला बाईंनी सांगितलं नाही. तेव्हा आम्ही ग्रहण पाहून झाल्यावर आम्ही घरी गेलो.’
 ——————————————————————————————-
‘मी घरी गेले व चहा पीत होती. माझ्या आईला मी बोलली की “आई मी आज ग्रहण पाहणार आहे.” तर माझी आई म्हणाली, “ग्रहण बघायचा नसतो. दुसऱ्या दिवसापासून माणसाला आजार होण्याची सुरुवात होते.” मी मझ्या दप्तरातील अंधश्रद्धेचं पुस्तक आणलं व तिला मी म्हणाली; “या पुस्तकामध्ये काही अंधश्रद्धेबद्दल लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवते.” मी ग्रहण हा भाग काढला व त्यावरचं वाचून दाखवलं. आणि काही भूत, साप, अंगात येणे असे काही पुस्तकातील भाग तीला वाचून दाखवले. तर मी तिला बोलली; “आता तरी मी ग्रहण पाहू शकते का?” तर ती बोलली “नको.” मी जेव्हा रात्री साडे सातला काकांकडे गेली. जेव्हा मी ११.३०ला माझ्या काकांबरोबर घरी येत होती तेव्हा मी आणि काकांनी दोघांनीपण ग्रहण पाहिलं. चंद्राचा पूर्ण भाग लाल रंगाचा झाला होता. पण मी अंधश्रद्धेच्या पुस्तकातील ग्रहण, भूत, अंगात येणे हे सगळं वाचून दाखवलं तरी तिने ग्रहण पाहिलंच नाही.’

No comments:

Post a Comment