Sunday, 31 January 2016

कुमार गीत – यापुढे यशाकडे !


यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची ||धृ||
शक्ती-युक्ती बुद्धीने सुजाण यत्न चालवू
संपदा समर्थता उदंड आम्ही मेळवू
सावधान पाऊले जयाप्रतीच जायची ||१||
वज्रता विनम्रता तनुमनात बाणवू
स्न्हेह्शील एकता निज-अंतरात तेववू
वीज वादळातही ज्योत न विझायची ||२||
अजिंक्य झेप अपुली अशक्य शब्द नेणते
मृगेन्द्रता स्वयं ही एवं मंत्र एक जाणते
सार्थ ती करू अशी शपथ ही वाहायची ||३||
विक्रमी कृती करू चला दिगंत हालवू
तेज मायभूमीचे उभ्या जगास दाखवू
चेतना स्वरातली उरात जागवायची ||४||
. – सौजन्य: जागृती गट, डोमरी



या गीताची चाल ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर


बनगरवाडी नावाच्या एका संस्थानांच्या काळातील वाडीवर मास्तर म्हणून एका तरुण मुलाची नेमणूक होते. बनगरवाडी इनमिन ३०-३५ खोपट्याची वस्ती, वाडीतील बहुतांश लोक हे मेंढ्या पाळणारे धनगर. वाडीतील शाळेची दुर्दशाच झालेली. शाळेत मुले येत नसत. सगळी मुलं मेंढ्यांच्या मागे दिवसभर हिंडत. अशा या वाडीवर नवीनच आलेल्या या मास्तराला गावात शाळा चालवायची असते आणि वाडीत स्वतःच एक स्थान निर्माण करायचं असतं.

वाडीत आल्या आल्या मास्तरला दादू बालट्या भेटतो. दादू बालट्या मास्तरला दम देतो, वाडीत ढवळाढवळ न करण्याचा सल्ला देतो. मागच्या मास्तरला कसं वाडीतील लोकांनी मारलं होतं ते सांगतो. गावात आल्या आल्याच तरुण मास्तरचा धीर यामुळे खचतो. त्याला वाटतं की आपल्याला काही हे जमणार नाही, सरळ राजीनामा द्यावा आणि या गावातून पळून जावं.

पण तो थांबतो, नंतर त्याला वाडीतील इतर लोक भेटतात. वाडीचा कारभारी त्याला शाळा सुरु करण्यासठी मदत करतो. वाडीतील इतर लोकही जमेल तशी मदत करतात. लवकरच मास्तर वाडीशी एकरूप होऊन जातो. मास्तरशिवाय वाडीचे पानही हलत नाही. मास्तर म्हणजे गावचा जज्ज, पोलीस अधिकारी, पाटील-कुलकर्णी, आणि स्टँपव्हेंडर असं सगळं काही बनून जातो. वाडीतील लोक मास्तरांचा शब्द प्रमाण माणू लागतात. वाडीची सुखः दुखः मास्तरला आपले वाटू लागतात.

अशातच मास्तरकडे गावातील रामा नावाचा धनगर, जुने चलनातून बंद झालेले रुपये मोड करून आणायला देतो. मोड करून आणल्यावर मास्तरच्या खोलीतून हे पैसे चोरीला जातात. मास्तरचा जीव यामुळे खूप घाबरा होतो. आता आपल्यावर पैसे खाल्ल्याचा आळ येणार अशी मास्तरला भीती वाटते. इकडे मास्तर गावाशी एवढा एकरूप झाल्याने दादू बालट्याचं गावातील महत्व कमी होतं. दादू बालट्या मग मास्तर आणि वाडीचा कारभारी यांच्या मध्ये भांडण लावतो. त्यामुळे कारभारी मास्तरशी बोलणं बंद करतो. समोर उभ्या राहिलेल्या या संकटातून मास्तर मार्ग काढतो आणि आपलं शिकवण्याचं काम सुरु ठेवतो.

मास्तरच्या व वाडीच्या इतर लोकांच्या प्रयत्नांनी वाडीत एक तालमीची इमारत बांधायची असे ठरते. त्यासाठी मग वाडीत लगबग सुरु होते. वाडीतील लोकांकडून वर्गणी गोळा केली जाते. लाकूड, दगड, बाकी सामान जमा करायला मास्तर आणि वाडीतील जाणत्या लोकांची धावपळ सुरु होते. इमारतीचं उद्घाटन राजाच्या हस्ते करायचं असं ठरतं. राजा वाडीत येण्याचा दिवस येतो तरी इमारतीवर छप्पर पडलेलं नसतं. मग सगळी वाडी रात्रभर जागून बांधकाम पूर्ण करते. राजा येतो आणि मास्तरला, वाडीच्या कारभाऱ्याला आणि बाकीच्यांना शाबासकी देऊन जातो.


अशी या बनगरवाडीची आणि मास्तरच्या प्रयत्नांनी वाडीने एकत्र होऊन केलेल्या कामाची गोष्ट या पुस्तकात आहे. पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या शब्द सामर्थ्याने पुस्तक वाचताना अक्षरशः बनगरवाडी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

चुन्नू-मुन्नूची गोष्ट!

आटपाट नगरातील एका डबक्यात चुन्नू-मुन्नू नावाचे दोन बेडूक राहत होते. दोघेही एकमेकांचे खूप जिवलग मित्र होते. ते दोघेही दिवसरात्र सोबतच असायचे. दिवसभर त्या डबक्यात खेळायचे, मस्ती करायचे आणि सोबतच जेवायचे. दोघेही आनंदाने आणि खेळीमेळीने त्या तळ्यात राहत होते.

एके वर्षी खूप उन्हाळा पडला आणि त्या कडक उन्हामुळे हळूहळू ते डबकं कोरडं पडू लागलं. आणि त्यासोबतच चुन्नू-मुन्नूचे खाण्यापिण्याचे देखील हाल होऊ लागले. जसजसं ते डबकं जास्त कोरडं पडू लागलं तसतसं चुन्नू-मुन्नू काळजीत पडून विचार करू लागले. एकदा चुन्नू मुन्नूला म्हणाला “मुन्नू, अरे लवकरच हे डबकं पूर्ण कोरडं पडणार आणि आपल्याला आता इथून जायला लागणार असं दिसतंय.” चुन्नूचं बोलणं ऐकून मुन्नूही विचारात पडला आणि दोघेही विचार करू लागले की ‘आता काय बरे करूया?’ या विचारात असताना काही दिवसातच ते डबकं पूर्णपणे कोरडं पडलं. शेवटी चुन्नू-मुन्नू दोघांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

ते डबकं म्हणजे चुन्नू-मुन्नूचं घर होतं, त्यांनी तिथे खूप मज्जा-मस्ती केली होती. तिथे त्यांच्या खूप सुंदर आठवणी होत्या. ते डबकं सोडून जाताना चुन्नू-मुन्नूला अक्षरशः रडू कोसळलं. पण तरीही मन घट्ट करून सकाळीच ते दोघेही तिथून नवीन जागेच्या शोधात निघाले.

बराच वेळ झाला चुन्नू-मुन्नू चालत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यही आग ओकत होता. खूप वेळ चालून शेवटी दोघेही दमले आणि एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. तिथे इकडे-तिकडे बघत असताना चुन्नूला अचानक एक पाण्याने भरलेली विहीर दिसली. ती विहीर पाहून चुन्नू आनंदाने जवळजवळ ओरडतच मुन्नूला म्हणाला, “मुन्नू, अरे बघ इकडे कित्ती मोठ्ठी विहीर आहे आणि त्यात खूप सारं पाणीही आहे. मला वाटतं आपण इथे राहू शकतो आणि हे आपलं छानपैकी घरही बनू शकतं. मला वाटतं आपण इथे राहायला हरकत नाही.” चुन्नूचं ओरडणं ऐकेपर्यंत मुन्नू त्या विहिरीजवळ पोचलादेखील होता. ती विहीर पाहून मुन्नू जरा विचारात पडला आणि थोड्यावेळानंतर चुन्नूला म्हणाला “अरे ही विहीर खूप खोल असेल आणि कशावरून ही पण विहीर कडक उन्हामुळे आटणार नाही? ही विहीर जर आटली तर आपण तिच्यातून वर चढून बाहेरपण नाही येऊ शकणार. आणि आपण आत्ताच्यापेक्षाही मोठ्ठ्या संकटात सापडू.” अजून थोडा वेळ थांबून मुन्नू चुन्नूला पुढे म्हणाला “अरे, कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना थोडा विचार करून घ्यावा, कुठलाही निर्णय घेताना इतकी घाई करू नये. या घाईमुळे कदाचित आपण भविष्यात अडचणीतही सापडू शकतो.” मुन्नूचं सांगणं चुन्नूला पटलं आणि त्या विहिरीजवळ थोडावेळ खेळून ते दोघे नवीन जागेच्या शोधात पुन्हा चालत राहिले.

दिवसभर चालून दोघेही लवकरच दमले आणि एका ठिकाणी थांबले, तिथेच झोपी गेले. थोडयावेळाने मुन्नूचा डोळा उघडला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. जेव्हा मुन्नू झोपेतून आळस झटकून जागा झाला तेव्हा त्याला थोडं गार-गार वाटू लागलं. त्याने बाजूला पाहिले तर चुन्नू गाढ झोपलेला होता. मुन्नूने त्याला हलवून उठवले आणि त्याला म्हणाला, “अरे बघ इथे किती गार वाटतंय. मला वाटतं इथे जवळपास नक्कीच कुठेतरी पाणी असलं पाहिजे.” मुन्नुचं हे वाक्य ऐकून चुन्नूला खुप हुरूप आला आणि दोघेही झपझप पावलं टाकीत पुढे निघाले.
मुन्नूचा अंदाज खरा ठरला. अगदी थोडंसंच पुढे गेल्यावर त्यांना एक छानसं तळं दिसलं. ते तळं आणि त्यातील भरपूर पाणी पाहून चुन्नू-मुन्नूला खूप आनंद झाला. ते उड्या मारत नाचू लागले. ते दोघे त्या
तळ्यात मनसोक्त खेळले. खूप मस्ती केली आणि शेवटी दोघांनीही तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.
आधी राहत असलेल्या डबक्याच्या मजेशीर आठवणी तर होत्याच परंतु ही नवीन जागाही चुन्नू-मुन्नूला खूप आवडली आणि ते आनंदाने त्या तळ्यात राहू लागले.




( वरील गोष्ट ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)


निर्णय घेताना


रोजच्या जगण्यात आपण अनेक लहान मोठे निर्णय घेत असतो. हे निर्णय लहान सहान असतात आणि म्हणून आपण जास्त विचार न करता चटकन निर्णय घेऊन मोकळे होतो. पण जेव्हा अचानक एखादी समस्या किंवा अडचणीचा आणि रोजच्या जीवनाचा भाग नसलेला प्रसंग आपल्या समोर अचानक उभा राहतो. तेव्हा आपण गोंधळून जाऊन योग्य निर्णय न घेता घाई घाईने चुकीचा निर्णय घेऊन समोरची परिस्थिती आणखीनच बिघडवून ठेवतो. अशा वेळेस जर शांतपणे विचार करून निर्णय घेतले तर योग्य निर्णय घेतल्या जाऊ शकतो.
अशा परिस्थितीत निर्णय घेण्याचा सराव जर आपण काही असे प्रसंग उदाहरण म्हणून घेऊन मुलांकडून करून घेतले तर त्याचा फायदा मुलांना नक्कीच होईल.
यासाठी गटात एखादी परिस्थिती देऊन या परीस्थितीत तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारावा.
‘घरात भावंड खेळत असताना काचेचे भांडे खाली पडून फुटले.’ यावर मुलांना तुम्ही काय कराल असे विचारले असता मुले विचार करून किंवा चर्चा करून अनेक पर्याय सुचवतील.
जसे की, ‘सगळ्या काचा जमा करून फेकून देईल. म्हणजे कोणालाच कळणार नाही.’, ‘आई ला सांगेन.’, ‘मार चुकवण्यासाठी भावाने किंवा बहिणीने भांडं फोडलं असं सांगेन.’, ‘भांडं मांजरीने पाडलं असं सांगेन.’, ‘आई मारेल म्हणून आधी बाबांना सांगेन.’ इ. इ.
अशा प्रत्येक पर्यायावर चर्चा करून कोणता पर्याय वापरल्याने काय परिणाम होऊ शकतो आणि म्हणून नेमका कोणता पर्याय निवडावा यावर चर्चा करावी.
वयोगटाप्रमाणे चर्चेसाठी वेगवेगळे प्रश्न निवडता येतील. माध्यमिकच्या मुलांसाठी ‘बाबा सहलीला जाण्यासाठी पैसे देत नाहीयेत.’ ‘एक जण पाण्यात बुडतोय आणि तुम्हालाही पोहता येत नाही.’ ‘आपल्या लहान भावाला त्याच्या वर्गातील मुलांनी मारलं, आणि त्याने रडत तुमच्याकडे येऊन तक्रार केली.’ ‘तुम्हाला तुमचा आवडता सिनेमा बघायचाय पण नेमके घरी आलेले पाहुणे बातम्या बघतायंत.’ ‘तुम्ही मित्रांसोबत गाडीवर फिरायला जाण्याचा प्लान केला होता पण बाबा गाडी घेऊन बाहेर गेलेत.’
असे अनेक प्रश्न घेऊन आता तुम्ही काय कराल यावर साधक बाधक चर्चा घ्यावी.
प्रत्यक्ष अशी परिस्थिती ओढवल्यावर निर्णय घेताना मन गोंधळलेले असते. पण चर्चा करताना मन शांत आणि निश्चिंत असते त्यामुळेच अधिक चांगला निर्णय घेतल्या जातो. या उपक्रमामुळे मुले लगेच चांगला निर्णय घेऊ शकतील अशी अपेक्षा करणे नक्कीच चुकीचे ठरेल पण शांत मनाने आणि सगळ्या बाजू लक्षात घेऊन, विचार करून निर्णय घेण्याचे महत्व मुलांना नक्कीच पटेल. प्रयत्नांनी मुले असा सगळ्या बाजूनी विचार करून निर्णय घेण्याचे शिकतील.
-          ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ – खेळघर हस्तपुस्तिकेतील लेखावर आधारित
कुमार निर्माणच्या गट बैठकीत देखील ही कृती करता येईल. विविध प्रसंग घेऊन त्यावर या परीस्थितीत तुम्ही काय कराल हा प्रश्न विचारता येईल.
यासाठी असे अनेक प्रसंग घेता येतील.
·        रात्री घरी येतानी अचानक दोन टारगट मुलांनी तुम्हाला अडवलं आणि पैसे मागितले.
·        तुम्हाला १ लाखाची लॉटरी लागली
·        तुम्ही परगावी गेलात आणि तुमचे पैसे संपले.
·        मोठ्या शहरात फिरायला गेलात आणि गटापासून लांब जाऊन हरवलात.
असे इतरही प्रसंग तुम्ही चर्चेसाठी घेऊ शकतात.

कोडं

चंगु मंगू  ची सहल 


दोन मित्र चंगु व मंगू सायकली घेऊन सहलीला निघाले. सहलीचे ठिकाण २५ किलोमीटर दूर होते. दोघांच्या सायकलीचा वेग ताशी १० कि.मी. होता. निघाल्यापासून अर्धातास झाला. रस्त्याच्या कडेला ५ कि.मी. चा दगड दिसत होता. एवढ्यात चंगुची सायकल पंक्चर झाली.
जवळपास सायकल दुरुस्तीची सोय कुठेही नव्हती. वस्तीही अगदी विरळ. रस्त्याच्या कडेला चहाच्या दुकानाची एक झोपडी होती. तेथे त्यांनी चंगूची बिघडलेली सायकल ठेवली व परत जाताना नेऊ असे सांगितले.
आता राहिलेला २० कि मी चा पल्ला कसा गाठायचा ? हा २० कि मी चा रस्ता अगदी सरळ होता व निर्जन रानातून जात होता. रस्त्याच्या कडेला कि.मी. चे दगड होते.
मंगुच्या सायकलवर डबलसीट बसून जाणे शक्य नव्हते. कारण तसे केल्यास ती सायकलसुद्धा नक्कीच बिघडली असती.
चंगूचा पायी चालण्याचा वेग ताशी ५ कि.मी. होता. यापेक्षा अधिक वेग शक्य नव्हता. घड्याळात सकाळचे ७ वाजले होते. सहलीच्या ठिकाणी दोघानाही एकत्र १० वाजता’ पोचायचे होते.
तर त्यांनी ते कसे साधले ?

या कोड्याचे उत्तर देणाऱ्या गटाला मिळेल एक छानशी भेट!

चित्र चर्चा


खालील चित्र पाहून काय वाटते? चर्चा करा. यावर एखादी गोष्ट रचता येईल का? 



Wednesday, 30 December 2015

मुखपृष्ठ


या अंकात




अंक पाचवा | डिसेंबर २०१५

हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/

(खाजगी वितरणासाठी)


शिक्षणाची रचनावादी विचारसरणी व रचनात्मक शिक्षणप्रक्रिया

जन्मल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत आपण सतत काही ना काही अनुभव घेत असतो. या अनुभवांचा जो काही अर्थ आपण स्वतः लावतो त्याची प्रतिमा मेंदूमध्ये तयार होत जाते, वेळप्रसंगी ती बदलतही जाते. आकलनवादी विचारसरणीतून आलेल्या या ‘घटने’च्या सहाय्याने आपण रचनावादी व्याख्या करू शकतो.

आपण आपल्या अनुभवांना सामोरे जाऊन, त्यांच्या आशयांना प्रतिमांकित करून घेऊन, आपण जगत असलेले विश्व स्वतः समजावून घेत असतो; या भूमिकेवर आधारलेले असे शिक्षणाचे तत्त्वज्ञान म्हणजे ‘रचनावाद’ होय.

वेगळ्या शब्दांत मांडायचे तर, मनुष्य आपल्या अनुभवांद्वारे स्वतःच्या ज्ञानाची रचना करीत असतो. मनुष्य शिकत जातो याचा अर्थ, तो नवनव्या अनुभवांच्या आशयांशी आपल्या अस्तित्वात असलेल्या मानस प्रतिमांची जुळवणूक करत जातो. थोडक्यात, नव्या अनुभवांचा आशय आपल्या आधीच्या मानस प्रतिमांशी जुळवणारी प्रक्रिया महणजे शिकण्याची प्रक्रिया किंवा शिकणे अशी ‘शिकण्या’ची व्याख्या करता येईल. आपण नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपल्या आधीच्या मानस प्रतिमांमध्ये बदल होऊन त्यांची संरचनाच बदलते, सुधारते किंवा विस्तारते (बिघडते किंवा संकोच पावतेही) याचाच अर्थ असा की, ज्याला आपण ‘शिकणे’ असे म्हणतो त्याने सुधारित मानस प्रतिमांची निर्मिती होत असते; नवी रचना होत असते. याठिकाणी, अर्थातच, शिकणे याचा व्यवहारातील अर्थ एखादी गोष्ट समजावून घेणे, किंवा त्यातून आपली ‘समज’ (understanding) वाढणे, असा होतो; मग ही समज, नवीन संकल्पनांविषयीची असेल, त्यांच्या वापराविषयी असेल अथवा अनेक घटकांमधील परस्परसंबंधांबाबतची असेल. म्हणजे असेही म्हणता येईल की, ‘शिकण्या’चे अंतिम पर्यावसान समजवृद्धी हेच असते.

‘समजवृद्धी’ असा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा साहजिकच आधीची काही एक ‘समज’ आपण गृहीत धरत असतो. ती अर्थातच आधीच्या किंवा पूर्वीच्या शिकण्यातूनच निर्माण झालेली असते. कोणत्याची स्तरावरचे विद्यार्थी जेव्हा आपल्या वर्गात येतात तेव्हा त्यातील प्रत्येक जण अशी आधीची समज घेऊन आलेला असतो, त्याची काही मते असतात, दृष्टीकोण असतात, त्याच्या काही श्रद्धा असतात, विश्वास असतात, काही विचार असतात, काही कौशल्ये असतात, मनात काही प्रश्न असतात आणि दैनंदिन जीवनांत काही समस्याही असतात. या सर्व ‘पूर्वतयारी’निशी विद्यार्थी नव्या शिकण्याच्या अनुभवांना समोरा जात असतो, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी.

नवी समज, नव्या धारणा, नवी ज्ञानरचना तयार व्हायची असेल तर पुढील ३ गोष्टींचा समन्वय व्हावा लागतो.
१.       पूर्वज्ञान (prior learning)
२.      नवी माहिती – नवा अनुभव (New information- New experience)
३.      शिकण्याची तयारी (Readiness to learn)
रचनावादी शिक्षणप्रक्रिया या ३ गोष्टींच्या आधारे सिध्द होत असते



अशा प्रकारची, विद्यार्थ्याची ज्ञानप्रक्रिया घडून यायची असेल तर, वैयक्तिकरित्या त्यासाठी लागणारा पुरेसा वेळ, क्रिया-प्रतिक्रियांसाठी लागणारा अवकाश आणि त्याचबरोबर ताबडतोबीच्या प्रत्याभरणाची संधी (opportunity for immediate feedback) या गोष्टी, रचनावादी व्यवहारात, आवश्यक मानल्या आहेत.
पूर्वज्ञान, नवी माहिती – नवा अनुभव, आणि शिकण्याची तयारी या ३ गोष्टींनी शिकण्याची प्रक्रिया घडून येते, असे रचनावादी विचासरणीचे प्रतिपादन आहे.

विद्यार्थ्यांच्या स्तरावरील रचनात्मक शिक्षणप्रक्रिया
शिक्षणाच्या प्रक्रीयेतील या तीनही घटकांचे स्वरूप समजावून घेणे आवश्यक आहे.



१.       पूर्वज्ञान
पूर्वज्ञान असे म्हणताना विद्यार्थ्याच्या संदर्भात त्याचा पूर्वज्ञानाचा स्तर आपण विचारात घेत असतो. त्याचे स्थूल मूल्यमापन होणे आपल्याला अभिप्रेत असते. शिक्षणाची प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असते, त्यामुळे या संदर्भात पूर्वज्ञान या संज्ञेचा अर्थ; शिकण्याच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेत, विशिष्ठ नवीन घटक शिकू पाहत असताना, त्या संदर्भातील आधीची पायरी माहीत करून घेणे, असा होतो. पूर्वज्ञान ही संज्ञा अधिक खोलवर जाऊन अधिक व्यापक करता येईल. व्यक्तीच्या ज्ञानाची विशिष्ठ वेळची, विशिष्ठ क्षणाची अवस्था ही तिच्या तोवरच्या अनुभवांनी, अनुभवांकडे तिने ज्या दृष्टीकोणातून पाहिले त्या दृष्टीकोणाने आणि त्या अनुभवांचा तिने शोधलेला अर्थ-आशय व त्यातून तिच्या ‘समजे’ची घडण या सर्वांचा परिपाक असतो. या साऱ्यांतून घडलेले व्यक्तिमत्वच आपल्या समोर येत असते.

व्यक्तीच्या या साऱ्या अंतर्गत प्रक्रीयांबरोबरच, तिच्या बाह्य जगाच्या संपर्कातून, म्हणजे विविध व्यक्ती, वस्तू, घटनांच्या क्रिया-प्रक्रियांतून आणि सामाजिक संकेत, परिस्थिती आणि सांस्कृतिक वारशातून प्राप्त झालेल्या संचिताचाही सहभाग, व्यक्तीच्या घडणीत असतो. त्यामुळे शिक्षणात शिकणाऱ्याची व्यक्तीगतता नि तिची सामाजिकता या दोन्ही घटकांना अलबत स्थान प्राप्त होते.

२.       नवी माहिती - नवे अनुभव
याचा शब्दशः अर्थ असा की, जी माहिती आजवर अनुभवली नव्हती अशी माहिती किंवा जो अनुभव आजवर घेतला नव्हता असा अनुभव. त्यामुळे या घटकांची ‘नवीनता’ हेच त्यांचे वैशिष्टय आहे. किंवा शैक्षणिक परिभाषेत बोलायचे झाले तर ते त्याचे आव्हानात्मक रूप आहे. ही नवी माहिती कशा स्वरुपात विद्यार्थ्यासमोर येते, यालाही महत्व आहे. पुस्तकांकरवी, व्याख्यानाकरवी, दृश्य स्वरुपात अशा वेगवेगळ्या स्वरुपात येणारी माहिती हे वेगवेगळ्या संवेदना जागृत करीत असते. विद्यार्थी त्याचे वेगवेगळ्या प्रकारे स्वागत करीत असतो, आकलन करून देत असतो. एकाच वेळी अनुभवाला येणारी माहिती किती आहे, तिचे प्रमाणही विचारात घ्यावे लागते; आणि मुख्य म्हणजे ही माहिती कशा भाषेत येते हेही महत्वाचे असते. भाषेचे सहजपणे आकलन झाले पाहिजे. विद्यार्थ्याच्या दृष्टीने भाषा सोपी असली पाहिजे, तरच आशय चटकन, विनासायास विद्यार्थ्याला आकलन होतो. भाषा कठीण असेल तर आशय समजावून घेण्याच्या बाबतींतला तोच एक मोठा अडथळा ठरण्याची शक्यता असते. नेमकेपणाने सांगायचे तर, विशिष्टवेळी असलेला बालकाचा भाषेचा स्तर आणि माहितीच्या भाषेचा स्तर यांचाही मिलाफ होण्याची गरज असते. कित्येकदा भाषा, भाषेतील प्रतीके नि संकेत यांची पुरेशी जाण नसेल तर मिळालेल्या माहितीबाबतच्या भाषेच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांच्या आकलनात फरक पडू शकतो, हे अनेक संशोधकांनी दाखवून दिले आहे.

३.       शिकण्याची तयारी
विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रक्रियेतील आणखी एक महत्वाचा घटक असतो. तो त्याची स्वतःची शिकण्याची तयारी असणे हा होय. येथे ‘तयारी असणे’ याचा अर्थ, त्याला विशिष्ट शिक्षण घेण्याची सर्वसाधारण पात्रता असणे आणि त्याचबरोबर त्याची शिकण्याची इच्छा असणे. पात्रता नि इच्छा अशा दोन्ही गोष्टी असतील तर त्या विद्यार्थ्याबाबत आपण ‘शिकण्या’ची अपेक्षा करू शकतो. मुलाची शिकण्याची तयारी असणे ही प्राथमिक बाब आहे. ही तयारी असणे हे मुलाच्या इच्छेवर अवलंबून असते; आणि मुलाची शिकण्याची इच्छा कशा प्रकारे वाढवावी हा शिक्षणातील एक कळीचा प्रश्न आहे. या प्राथमिक स्वरूपाच्या प्रश्नाचे तेवढेच प्राथमिक स्तरावरचे उत्तर बृनर यांनी आपल्या ‘प्रोसेस ऑफ एज्युकेशन’ या ग्रंथाच्या प्रास्ताविकातच देऊन ठेवले आहे. जे काही शिकायचे म्हणून आहे त्याच्यात रस वाटणे हेच शिकण्यासाठीचे सर्वोत्तम उत्तेजन आहे; परीक्षेत गुण मिळणे किंवा भावी काळातील स्पर्धेला तोंड देण्याची तयारी होणे, ही बाह्य आकर्षणे विद्यार्थ्यांच्या बाबतीत फारसे काही साधत नाही. विद्यार्थी शिकण्याला उद्युक्त होणे महत्वाचे. त्यासाठी लागणारी प्रेरणा जेवढी नैसर्गिक-उपजत, तेवढीच ती बाह्य वातावरणाशी संबंधित असते. माणसाचा मेंदू हा त्याचा ‘शिकण्याचा अवयव’ आहे. त्यामुळे सतत शिकत राहणे हेच खरे तर त्याचे कायमस्वरूपी काम असते. सतत नवे काहीतरी शिकण्याची, आत्मसात करण्याची उर्मी माणसाला उपजतच असते. ती व्यवहारात उत्सुकतेचे, जिज्ञासेचे रूप घेऊन अवतरते. विद्यार्थ्याच्या शिक्षणात ही उत्सुकता-जिज्ञासा कशी मारली जाणार नाही, कशी टिकविली नि वाढविली जाईल यावर लक्ष देणे ही रचनात्मक शिक्षणाची एक आवश्यक अट आहे.

विद्यार्थ्याला शिकण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या काही बाबी या विद्यार्थीबाह्य पण, त्याचे मन प्रसन्न करू शकतील अशा आहेत.
उदाहरणार्थ, शाळा स्वच्छ, सुंदर असणे, आजूबाजूला भीतीचे, अवास्तव शिस्तीचे वातावरण नसणे, वयोमानाप्रमाणे शिकण्याच्या मुबलक संधी उपलब्ध होणे, अनेक साधने हाताळायला मिळणे, हालचालींचे मुक्त स्वातंत्र्य असणे, आवडीनुसार घटकनिवडीचे स्वातंत्र्य मिळणे, जास्तीत जास्त कर्मेंद्रियांचा नि ज्ञानेंद्रियांचा वापर करायला मिळणे, या आणि अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्याला शिकण्याकडे आकर्षित करीत असतात. मुलांना सतत नवनवीन आव्हाने घ्यायला आवडतात. प्रत्येक पायरीला अधिक गुंतागुंतीच्या अधिक कठीण अशा प्रश्नांना भिडायला विद्यर्थ्याना आवडत असते. ते त्यांना, त्यांच्या बुद्धीला आव्हान वाटत असते. नवनवीन आव्हाने पेलण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. अशा संधी त्यांना पुरवणे, त्यासाठी पुरेसा अवकाश देणे, मुक्त विचारांचे स्वातंत्र्य असणे यांमुळे विद्यार्थी वेगाने शिकत जातो. रचनात्मक शिक्षणाचा हा गाभा आहे.
 मा. रमेश पानसे

‘रचनावादी शिक्षण’ या पुस्तकातून साभार