Tuesday 31 May 2016

ओळख मलाला युसुफझईची

पाकिस्तानातील एक तुमच्या वयाची मुलगी. तिला शाळेत जायचं असतं. ती तशी शाळेत जातही असते. पण तालिबानी संघटना त्या परिसरातील मुलींच्या शिक्षणावर बंदी आणतात. मुलींनी शाळेत जाऊ नये असा फतवा काढतात. मग तिची शाळा बंद होते. पण तिला तर शाळेत जायला आवडायचं, तिथे तिला तिच्या मैत्रिणी भेटायच्या, त्यांच्यासोबत खेळता यायचं आणि अभ्यास करायला देखील तिला आवडायचं. तिने मग या तालिबानी संघटनांविरुद्ध आवाज उठवायला सुरवात केली. पत्रकार परिषदेत त्यांच्या विरुद्ध भाषण केलं. नंतर इंटरनेटच्या माध्यमातून तालिबानी संघटना आणि त्यांचे अत्याचार या विरुद्ध ती लिहायला लागली. तेव्हाच पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानी संघटना यांच्यात युद्ध सुरु झालं. या मुलीला, तिच्या घरच्यांना आणि गावातील इतर लोकांना गाव सोडून जावं लागलं. त्यांची शाळा पूर्णपणे बंद झाली. युद्धातील परिस्थिती आणि तिचा अनुभव ती वेगळ्या नावाने इंटरनेट वर लिहीतच होती. नंतर भाषणेही करायला लागली. आपल्या भाषणांतून ती मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडायची. त्यासाठी तिला पाकिस्तानचा शांती पुरस्कार मिळाला.


मग काय, तालिबानी संघटना यामुळे तिच्यावर खूप भडकल्या. त्यांनी तिला मारण्याची धमकी दिली. पण या शूर मुलीने मात्र न घाबरता तिचे काम सुरूच ठेवले. तिची शाळा पुन्हा सुरु झाली. एक दिवस अशीच ती शाळेच्या बस मधून शाळेत जात असताना तालिबानचे दोन लोक गाडीत चढले आणि त्यांनी ती मुलगी कोण आहे अशी विचारणा केली. बाकीच्या मुलींनी तिच्याकडे बघताच त्यांनी तिच्या दिशेने गोळीबार केला. एक गोळी तिच्या एका बाजूने डोक्यातून मानेत आणि खांद्यात येऊन रुतली. तिच्या दोन इतर मैत्रिणीही या गोळीबारात जखमी झाल्या. त्यांना तातडीने मिलिटरीच्या इस्पितळात हलवण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार करून मग तिला इंग्लंड मधील दवाखान्यात हलवण्यात आले.
या घटनेमुळे ती जगभर प्रसिद्ध झाली. मुलींच्या शिक्षणासाठी तिने दिलेल्या लढ्यासाठी तिला शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आतापर्यंत तुम्ही ओळखले असेलच की ही मुलगी कोण आहे ते! हो अगदी बरोबर, ती आहे सर्वात कमी वयात नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझई.

मलालाचा जन्म पाकिस्तानातील स्वातच्या खोऱ्यातील एका गावात झाला. तिचे वडील शिक्षणाच्या चळवळीतील एक कार्यकर्ते होते. ते त्या परिसरात खासगी शाळा चालवत. सगळ्यांना शिक्षण मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. मलाला देखील त्यांच्या शाळेत जाऊ लागली. तिला शाळेत जायला आवडायचं. तिथे तिच्या मैत्रिणी तिला भेटायच्या मग त्या मिळून अभ्यास करायच्या, खेळायच्या, गप्पा मारायच्या. पाकिस्तानातील आणि त्यातल्या त्यात स्वातच्या खोऱ्यातील भागात मुलींच्या शिक्षणालावातावरण फारसं पूरक नव्हतं. तालिबानी त्या परिसरात दहशत माजवू लागले होते.
एक दिवस मग तालिबानींनी मुलींच्या शाळा बंद करणारा फतवा काढला आणि मलालाची शाळा बंद झाली. मलालाला याबद्दल त्यांचा राग आला होता. २००८मध्ये पेशावर येथे होणाऱ्या एका पत्रकार परिषदेत मलालाचे वडील तिला घेऊन गेले. तिथे तिने एक भाषण केले. त्यात तिने ‘तालिबानची हिंमत कशी होते मुलींचा शिक्षणाचा मुलभूत हक्क हिसकावण्याची?’ असे भाषण केले. या भाषणाची दखल पाकिस्तानातील बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी घेतली.
त्याचवेळेस बी.बी.सी. ही वृत्तसंस्था तालिबानचा परिसरातील वाढणारा प्रभाव दाखवण्यासाठी एक उपक्रम राबवीत होती. त्यासाठी त्यांना आपले अनुभव लिहून पाठवेल अशी लहान मुलगी हवी होती. त्यांनी मग शाळेतील मुलींना निनावीपणे इंटरनेटवर आपले अनुभव ब्लॉगच्या माध्यमातून लिहा असे आवाहन केले. पण तालिबानींना घाबरून कोणीच तयार होईना. मलालाच्याच शाळेतील एक मुलगी हे करायला तयार झाली, पण ऐनवेळी तिला धमकी मिळाल्याने तिने त्यातून माघार घेतली. शेवटी ११ वर्षांची लहान मलाला हे काम करायला तयार झाली. खरं तर हे काम अतिशय धोक्याचं होतं. तालिबानींनी तशी धमकीच देऊन ठेवली होती. तरीही मलाला ब्लॉग लिहायला तयार झाली. मग तिने ‘गुल मकई’ खोट्या नावाने आपला ब्लॉग लिहायला सुरुवात केली. तिच्या ब्लॉगमधून तिने तालिबानींचे आणि त्यांनी स्वातचे खोरे काबीज करण्यासाठी चालवलेल्या धुमाकुळाचे वर्णन करायला सुरवात केली.
तालिबानींनी परिसरात टी.व्ही. वापरण्यावर, संगीत ऐकण्यावर, मुलींच्या शिक्षणावर आणि महिलांना खरेदीसाठी बाजारात जाण्यावर बंदी आणली. तालिबानींनी मारलेल्या पोलिसांचे शव ते चौकात लटकावून ठेवू लागले. सगळीकडे भीतीचे वातावरण तयार झाले. मलाला या सत्य परिस्थितीचे वर्णन तिच्या ब्लॉगवर करतच होती.
काही दिवसांनी जेव्हा शाळेच्या परीक्षा जवळ आल्या होत्या, तेव्हा तालिबानने मुलींच्या शिक्षणावरील बंदी हटवली. मलाला आणि तिच्या मैत्रिणी पुन्हा शाळेत जाऊ लागल्या. लवकरच त्यांच्या परीक्षा झाल्या आणि त्यांना सुट्ट्या लागल्या. पण सुट्या नंतर शाळा पुन्हा सुरु होतील की नाही याची त्यांना खात्री नव्हती. शाळा संपली तेव्हाच मलालाचे ब्लॉगवर लिहिणेही बंद झाले.
मलालाचा ब्लॉग वाचून न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार अॅडम एलिक यांनी मलालाच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी मलाला वर एक माहितीपट बनवला. याच दरम्यान तालिबानींचा त्रास कमी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य त्या परिसरात शिरले. तालिबानी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात लढाई सुरु झाली. तेव्हा परिसरातील सर्व लोकांना गाव सोडून दूर जाऊन रहाव लागलं. मलाला आणि तिच्या घरच्यांनादेखील गाव सोडून दूर नातेवाईकांकडे जाऊन राहावं लागलं. तिचे वडील दुसरीकडे राहिले आणि मलाला वेगळीकडे राहिली. युद्ध चालू असताना मलालाचे वडील तालीबान विरुद्ध चळवळीत सहभागी होते. त्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी तालिबान कडून देण्यात आली होती.
युद्ध संपल्यानंतर जेव्हा ते लोक परत आले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांच्या घरातील बरेच सामान चोरीला गेलेले आहे. मलालाच्या घरातून टी.व्ही. आणि इतरही बरेच सामान चोरीला गेलेले होते. तरी त्यांचे घर आणि शाळा चांगल्या स्थितीत होत्या आणि बॉम्बस्फोट होऊनही बचावल्या होत्या.
माहितीपट बनल्यानंतर मग मलालाच्या पाकिस्तानातील सगळ्याच वृत्तवाहिन्यांवर मुलाखती घेण्यात आल्या. मलाला वेगळ्या नावाने ब्लॉग लिहिते हेही लोकांना माहित झाले. मलालाने तिच्या मुलाखतीमधून देखील तालिबानवर टीका केली. त्यांच्यामुलींच्या शिक्षणबंदीवर टीका केली. त्यामुळे मलाला तालिबानींच्या डोळ्यात सलू लागली.
मलालाचे काम बघून तिला  International Children's Peace Prize साठी नामांकन देण्यात आले. पण तो पुरस्कार तिला नाही मिळू शकला. मलालाला लवकरच पाकिस्तानचा पहिला National Youth Peace Prize हा पुरस्कार मिळाला. जशी मलालाची लोकप्रियता वाढू लागली तशी ती तालिबानच्या डोळ्यात अजून खुपू लागली आणि तिच्या जीवाला धोका वाढू लागला. तालिबानने तिला खुनाच्या धमक्या देणारे पत्रक बातमीपत्रांतून प्रसिद्ध केले. तिचा घराच्या दरवाजाखालून देखील अशी पत्रके टाकण्यात आली. फेसबुकवर देखील तिला धमक्या मिळायला लागल्या. पण तरीही मलालाने तिचा संघर्ष चालूच ठेवला.
एक दिवस शाळेच्या बसने शाळेत जात असताना अचानक तालिबानचे दोन लोक त्यांची गाडी अडवून गाडीत चढले. त्यांनी गाडीतील मुलींना मलाला कोण आहे असे विचारले. ‘सांगा, नाहीतर सगळ्यांना मारून टाकू’ अशी धमकी दिली. जेव्हा बाकीच्या मुलींनी मलालाकडे बघितले, तेव्हा त्या लोकांनी मलालाच्या दिशेने गोळीबार केला. एक गोळी मलालाच्या डोक्यात शिरून तिच्या मानेतून जाऊन खांद्यात घुसली. इतर गोळ्यांमुळे बसमधील इतर दोन मुली जखमी झाल्या. मलालाला लगेच मिलिटरीच्या इस्पितळात हलवण्यात आले.  तेथे तिचे ऑपरेशन करण्यात आले जे की पाच तास चालले. डॉक्टरांना तिच्या खांद्यात घुसलेली बंदुकीची गोळी काढण्यात यश आले. त्यानंतर तिला रावळपिंडी येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पुढच्या उपचारांसाठी तिला बाहेर देशात पाठवण्याचे ठरले. बऱ्याच देशांनी तशी तयारी दर्शवली होती. तिला इंग्लंडमध्ये हलवण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार केल्यानंतर काही दिवसांनी ती ठीक झाली.
तालिबाननी तीच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे जगातील सर्व देशांचे लक्ष मलाला कडे वेधल्या गेले. सर्व जगातून तिला पाठींबा मिळाला. जगभर तिचे कौतुक झाले. तालिबानवर सगळीकडून टीकांचा भडीमार झाला. पाकिस्तानातील ५० मौलवींनी तालिबान विरुद्ध फतवा काढला.
त्यानंतर तिने संयुक्त राष्ट्रासमोर भाषण केले. संयुक्त राष्ट्रासमोर एवढ्या लहान व्यक्तीने भाषण करण्याची ही पहिलीच वेळ होती. १० ऑक्टोबर २०१४ मध्ये तिला कैलाश सत्यार्थी यांच्या समवेत शांतीसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. ती हा पुरस्कार पटकावणारी सर्वात लहान व्यक्ती ठरली.
१२ जुलै २०१५ रोजी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लेबनॉन मध्ये सिरीयन स्थलांतरित मुलांसाठी शाळा सुरु केली.
अशाचप्रकारे मुलींच्या शिक्षणासाठी आणि जागतिक शांततेसाठी काम करीत राहण्याची तिची इच्छा तिने वेळोवेळी तिच्या भाषणांमधून व्यक्त केलीये आणि त्या नुसार ती काम करतीय.
तिच्या कामासाठी तिला कुमार निर्माण कडून शुभेच्छा.
कृती
नोबेल पुरस्कार समारंभात  मलालाने केलेले भाषण मिळवून वाचा. त्यावर चर्चा करा.

  

No comments:

Post a Comment