Tuesday 26 June 2018

सुट्ट्यांनंतर


सुट्ट्यांनंतर

वृषाली ताई व्हरांड्यात बसून विचार करत होत्या. शाळेला सुट्ट्या असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या कुमार निर्माणच्या सांकव संघाची नियमित बैठक झालेली नव्हती. बरीच मुलं-मुली सुट्ट्यांत नातेवाईकांकडे गावाला गेलेली होती. तसं हे अपेक्षितच होतं म्हणा, म्हणूनच वृषाली ताईंनी देखील नियोजन करून बाहेरगावची कामं करून घेतली होती आणि काही दिवस त्याही नातेवाईकांकडे फिरून आल्या होत्या. त्यासोबतच कुमार निर्माणची द्वितीय प्रशिक्षण कार्यशाळा देखील या दरम्यान झाली तिथे देखील वृषाली ताई जाऊन आल्या होत्या.
आता मुलं-मुली परत आल्यानंतर बैठका पुन्हा नियमित सुरु होण्यासाठी काय करूया असा विचार त्यांच्या मनात सुरु होता. हा विचार करत असतानाच वृषाSSलीSSS ताईSS वृषाSSलीSSS ताईSS असे ओरडत ओरडत सुरज, अरबाझ, मोनाली, लिसा आणि सानिका व्हरांड्यात आले. सर्वांना बघून ताईंना खूप आनंद झाला. ताईंनी खूप आपुलकीने सर्वांची चौकशी केली.
अरबाझने त्याच्या आत्त्याच्या गावावरून करवंद आणले होते तर सुरजने आंबे आणलेले होते ते त्यांनी ताईंना दिले. सानिका आणि मोनालीने त्यांच्या आजी आजोबाच्या शेतातून जांभळं आणली होती ती ताईंना दिली.

“हा खाऊ सगळ्यांना वाटण्यासाठी आणि सगळ्यांनी सुट्ट्यांत काय मजा केली ते ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनाच बोलवूया का?” वृषाली ताईंनी मत मांडलं.
“हो ताई, तशीही आपली कुमार निर्माणची बैठकदेखील बऱ्याच दिवसांत झालेली नाहीये.” सुरज म्हणाला.
सुरज आणि सानिका संघातील सगळ्यांना बोलावून आणायला पळाले.
थोड्याच वेळात एक-एक करत सर्व मुलं-मुली जमले. सोनाली आणि अरबाझने सर्वांना जमलेला खाऊ दिला. खाऊ खात सर्वांनी सुट्ट्यात काय केलं ते सांगायला सुरुवात केली.
“मी तर खूप आंबे खाल्ले, आंब्याच्या झाडावर सूरपारंब्या खेळलो, आणि खेळताना माझ्या मावशीचा मुलगा बाद्कन चिखलात पडला.” – सुरजने सांगितलं. हे ऐकून सगळ्यांना हसू आलं.
“माझ्या मावशीच्या गावाला नदी आहे तर आम्ही नदीत पोहायला शिकलो” – मोनाली आणि सानिका एकत्रच म्हणाल्या.
सर्वांनी सुट्टीत केलेल्या गमती-जमती एकमेकांना सांगितल्या.
“मी कुमार निर्माणच्या गटात आपण खेळतो ते खेळ आणि गाणी मामाकडे सर्वांना शिकवले.” लिसा म्हणाली.
“आम्ही खूप सारी फळं तर खाल्लीच पण त्यांच्या बिया जपून ठेवून त्यापासून सीड बॉल्स बनवले, मी ते सोबत देखील आणले आहेत. हे बघा!” – फातिमा म्हणाली.
“ताई आपण सीड बॉल्सचा उपक्रम करूया का?” – फातिमाने विचारलं.
“ताई त्यापेक्षा आपण रोपं आणून ती लावूया आणि त्यांची काळजी देखील घेऊया.” – मनोज म्हणाला.
यावर मग बरीच चर्चा झाली आणि शेवटी लांबच्या परिसरात सीड बॉल्स टाकायचे आणि जवळपास रोपं आणून ती लावायची आणि त्यांची काळजी घ्यायची असं ठरलं.
ही चर्चा सुरु असताना बाहेर पाऊस पडायला लागला आणि सगळे पाऊस बघण्यात दंग झाले.
“चला पावसात खेळायला जाऊया!” – प्रिया म्हणाली.
“अरे पण हे उपक्रम कसे करायचे ते ठरवायचं बाकी आहे की अजून” – वृषाली ताई म्हणाली.
“ताई. आपण सध्या शाळा सुरु होईपर्यंत रोज भेटूया. आणि उद्याच्या भेटीत या उपक्रमांचं नियोजन करूया, कोण कुठली जबाबदारी घेईल ते देखील उद्याच ठरवूया.” प्रशांतने प्रस्ताव ठेवला.
सगळ्यांनी तो आवाजी मतदानाने पारित करून पावसात खेळण्याकडे मोर्चा वळवला.
वृषाली ताई पुन्हा एकदा व्हरांड्यात बसल्या होत्या पण आता त्या मुला-मुलींचं खेळणं बघण्यात रमून गेल्या होत्या.

 पावसाचं पाणी

पाऊस सुरु झाला आणि संघातील मुलं-मुली खेळायला पळाले, पण प्रिया मात्र लगेच घरी पळाली.
प्रियाचं घर गावाच्या जरा बाजूला होतं आणि त्यामुळे त्यांच्या घरापर्यंत ग्रामपंचायतचं पाण्याचं कनेक्शन पोहचलेलं नव्हतं. तसं तर उन्हाळ्यात सर्वांनाच पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवायचा पण प्रियाच्या घरी नळ कनेक्शन नसल्याने त्यांना मात्र पूर्ण उन्हाळ्यात बाहेरून बैलगाडीवर मोठी टाकी ठेवून पाणी आणावं लागे. इतर वेळी मात्र त्यांच्या शेतातील विहारीचं पाणी त्यांना पुरत असे.
प्रिया घरी आली तेव्हा तिचे आई, बाबा आणि लहान भाऊ; रमेश तिघेही पाईप मधून येणारं छतावरील पावसाचं पाणी घरातील भांड्यांमध्ये भरत होते. प्रिया देखील झटपट मदतीला धावली.
पाणी भरताना रमेश आई बाबांना सारखे प्रश्न विचारत होता.
“बाबा उन्हाळ्यात आपल्या विहारीतलं पाणी का संपतं?”
“मग पाऊस पडला की ते कुठून परत येतं?”
“आपल्या विहिरीला तर कठडे बांधलेले आहेत तर त्यात पावसाचं पाणी आत कुठून जातं?”
“हे सगळं छतावर पडणारं पाणी साठवून ठेवायला किती मोठी टाकी लागेल?”
“जर आपण सगळ्या शेतावर पडणारं पाणी साठवून ठेवलं तर आपल्याला उन्हाळ्यात देखील पाणी पुरेल का?”
“आपल्याला वर्षाला किती पाणी लागतं?”
असे एक ना अनेक प्रश्न रमेश विचारत होता. आई बाबांनी मात्र त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं पाणी भरायचं काम सुरु ठेवलं होतं.
प्रियाच्या डोक्यात मात्र हे प्रश्न ऐकून एक आयडिया चमकली. आपण खरंच जर छतावर पडणारं पाणी जमा करू शकलो तर...? खरंच किती बरं पाणी लागत असेल आपल्याला रोज ..? हे प्रश्न आपण कुमार निर्माणच्या उद्याच्या बैठकीत मांडूया आणि जमलं तर यावर काही तरी कृती करूया.
तिचा असा विचार होईपर्यंत त्यांचं पाणी भरून झालेलं होतं आणि आता पाईप मधून येणारं पाणीही रस्त्यावर वाहत जाऊन पुढे नालीत जात होतं. त्या वाहणाऱ्या पाण्याकडे बघून प्रियाचा निश्चय अजूनच पक्का झाला. उद्याच्या बैठकीची वाट बघत ती सुट्टीतील अभ्यास पूर्ण करायला बसली.
मित्रांनो, प्रियासारखा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी? तुम्ही देखील प्रिया आणि सांकव संघाप्रमाणे तुमच्या संघात या विषयावर चर्चा करा आणि बघा तुम्हाला पुढील गोष्टी मोजता येताय का?
. तुम्हाला स्वतःला एका दिवसात किती पाणी लागत असेल?
. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वर्षाला किती पाणी लागत असेल?
. तुमच्या छतावर वर्षभरात पावसाचं किती पाणी पडत असेल?
. छतावर पडणारं पाणी वाया जाण्यापेक्षा त्याचा वापर कसा करता येईल?
तर मित्रांनो, पावसात भिजून मज्जा करताना या प्रश्नांचा नक्की विचार करा...



No comments:

Post a Comment