Tuesday 26 June 2018

उल्लेखनीय कृतिकार्यक्रम


आम्ही भरवले उन्हाळी शिबीर!

आमच्या ताईंकडे प्रणाली दीदी आणि शैलेश दादाने उन्हाळी सुट्टीचे उपक्रम पाठवले होते.  त्या उपक्रमांतून उन्हाळी शिबिराचा उपक्रम करायचा असं आम्ही ठरवलं. त्यासाठी आम्ही बैठक संघाची बैठक बोलवली. शिबिरात काय-काय करायचं याविषयी खुप चर्चा केली. त्यात असं ठरलं की निरामय केंद्राच्या सभागृहात लहान मुलांसाठी ३ दिवसांचं शिबीर आयोजित करायचं.  शिबिरासाठी कोलगाव व सावंतवाडीमधील काही शाळांमधील लहान मुलांना बोलवायचं असं ठरलं.  त्यासाठी आम्ही काही शाळा ठरवल्या आणि त्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापकांना भेटलो. त्यांना आमची शिबिराची कल्पना सांगितली आणि तुमच्या शाळेतील काही विद्यार्थी पाठवा अशी त्यांना विनंती केली. निघताना पुन्हा एकदा ‘तुम्ही किती मुले पाठवाल?’ अशी विचारणाही केली. त्यानुसार अंदाजे विद्यार्थ्यांची एक यादी बनवली. सोबतच शिबिरात काय काय करायचं याचंही प्लांनिंग सुरू होतंच. त्यात आम्ही मुलांना गोष्टी सांगणे, गाणे शिकवणे, त्यांचे खेळ घेणे, नाटक बसवणे, ओरिगामी शिकवणे असं बरंच ठरवलं.
 अखेर तो दिवस उजाडला. संघातील आम्ही सर्वजण निरामय केंद्रात जमलो परंतु मुलांची संख्या खूपच कमी दिसत होती. तरी आम्ही आमचं शिबीर सुरूच ठेवलं. त्यात आम्ही वाचन केलं, गोष्टींची पुस्तके वाचली. वाचलेल्या गोष्टी अधिक समजाव्यात म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचे दोन गट केले आणि वाचलेल्या गोष्टींचे नाटकांत रुपांतर केले. आणि मग दोन्ही गटांनी आपापले नाटक सादर केले. त्यानंतर आम्ही खुप खेळ खेळलो, गाणी म्हटली, ओरिगामीच्या विविध वस्तू बनवल्या आणि भरपूर धम्माल केली.
असं आम्ही सलग तीन दिवस दररोज ३ तास हे शिबीर घेतलं. शिबिरात सर्वांना खुपच मज्जा आली. तीन दिवस कसे गेले हे सर्वांना कळलंच नाही आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही शिबिराची सांगता केली.
प्रणय ठिकार, निर्मिती संघ, कोलगाव
निमंत्रक: सुलक्षणा व सुषमा

“उन्हाळ्याच्या सुट्टीची कमाल...मुलं करतील धम्माल!!!”


१६ मे रोजी आमच्या संघाची मिटिंग भरली. मिटिंगमध्ये दादांनी आम्हाला उन्हाळाच्या सुट्टीत करायच्या कृतिकार्यक्रमाची पत्रिका दिली. ती संपूर्ण वाचल्यानंतर सर्व मुला-मुलींच्या सहमतीने आम्ही ‘लहान मुलांसाठी उन्हाळी शिबीर’ हा कृतिकार्यक्रम करायचं ठरवलं.
आता हे शिबीर कसं, कुठे आणि कधी करायचं यावर चर्चा सुरु झाली. मग आम्ही चर्चेतून शिबिराची रूपरेषा ठरवली. शिबिराचं नाव आम्ही ‘प्रगती समर कॅम्प’ असं ठेवलं आणि “उन्हाळ्याच्या सुट्टीची कमाल...मुलं करतील धम्माल!!!” हे शिबिराचं घोषवाक्य ठरवलं. १८ मे ही तारीख तर जि. प. शाळा हे शिबिराचं ठिकाण ठरलं आणि वेळ ठरली सकाळी ७ ते १०!
रूपरेषेसोबत शिबिराचे काही नियमही आम्ही ठरवले. जसे की,
· शिबीर ५ ते १० वयोगटातील मुलांसाठी असेल.
· शिबीरात बेडकुचीवाडी, पिंपळनेर व सांडरणवन येथील मुलं सहभागी होऊ शकतात.
· मुलांसाठी छान छान गाणी घेतली जातील.
· मुलांसाठी लिंबू-चमचा, पोत्यात पाय घालण्याची शर्यत, व बेडुक-उडी शर्यत या स्पर्धा.
· प्रत्येक स्पर्धेत दोनच विजेते राहतील. प्रथम पारितोषीक - वही, द्वितीय पारितोषीक - पेन.
· मुलांचे खेळ घेऊन मज्जा करणे.
आमच्या शिबिराची माहिती परिसरातील मुलांना कळावी यासाठी आम्ही पोस्टर्स बनवायचं ठरवलं. पण आमच्याकडे मोठे कागद नव्हते ते बाहेरून आणावे लागणार होते. चर्चा सुरु असताना मध्येच रुपाली म्हणाली की, त्या मुलांना खाण्यासाठी काहीतरी पाहिजे. मग वैष्णवी म्हटली, “मी पोहे करते”, रुपाली म्हटली, “मी भेळ करते.” तेव्हा दादा म्हटले भेळ व पोहे करायचे असतील तर सामान भरावं लागेल. सागर म्हटला, “सर्वांनी १०-१० रु. जमा करायचे.” याला सर्वांनी ‘हो’ म्हटले पण त्यादिवशी संघातील सर्वजण उपस्थित नव्हते, आम्ही फक्त ८ जण उपस्थित होतो. बाकी जण मामाच्या गावाला गेले होते. मग जेवढे आहेत तेवढ्यांनी १० रु. जमा करायचे असं ठरलं. मग दुसऱ्या दिवशी दादांनी आम्हाला मोठे कागद आणून दिले आणि मी व वैष्णवीने मिळून चार्ट तयार केले. चार्टवर कुमार निर्माण, त्याखाली आमच्या संघाचं नाव लिहिलं. त्याच्याखाली वयोगट, ठिकाण आणि आयोजित केलेल्या स्पर्धांचे नावं लिहिले. मग पोस्टर्स लावले, त्यांतील एक लिंबारुई (देवी)  मध्ये दुकानाबाहेर लावले, सांडरवन गावातील मंदिरात एक लावले, एक पिंपळनेर मध्ये तर एक आमच्या गावातील मंदिरात लावले. त्यादिवशी दादा व ओंकारने नाश्त्याचे सर्व सामान भरून आणले. आमचे फक्त ८० रु. झालते, दादांनी वरून २६० रु. टाकले. त्यादिवशी दुपारी ४ वाजता आम्ही संघातील सर्व जणांनी ज्याच्या घरी ५ ते १० वर्षांतील मुल आहे त्यांच्या घरी जाऊन ‘उद्या त्याला/ तिला सकाळी ७ वाजता शाळेत पाठवा’ असं सांगितलं.
शिबिराच्या दिवशी म्हणजे १८ मे ला संघातील सर्व जण सक्काळी ६.३० वाजता शाळेत जमले. मग आम्ही शाळेतील बाहेरच्या बोर्डवर कुमार निर्माण व आमच्या संघाचं नाव लिहून त्यासोबत सुस्वागतम असं लिहिलं. सर्व मुलं-मुली जमा झाल्यावर संघातील रुपाली, वैष्णवी व भाग्यश्रीने ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना म्हटली आणि बाकीच्यांनी त्यांच्या मागून म्हटली. मग तुषारने एक छानशी गोष्ट सांगितली आणि सागर व तुषारने सर्वांचं ‘लंबी दाढीवाले बाबा’ हे गाणं घेतलं. त्यानंतर रुपालीने येगं येगं सरी, ये रे ये रे पावसा व नाच रे मोरा ही बालगीतं म्हटली. नंतर सर्वांना गोलात उभं करून दादांनी ‘हरियाली इधर उधर’ हे गाणं घेतलं  आणि नंतर वैष्णवी आणि भाग्यश्रीने ‘इतना बडा पहाड’ हे गाणं घेतलं. नंतर  वैष्णवी, रुपाली, ओंकार, अभिषेक असे सर्व मिळून नाश्त्याच्या तयारीला लागले. ठरल्याप्रमाणे रुपालीने भेळ व वैष्णवीने पोहे बनवले. पोहे बनवण्यासाठी एका काकूंनी आम्हाला थोडी मदत केली.नाश्ता तयार होईपर्यंत तुषार व सागर यांनी मुलांना सांभाळले. नाश्ता तयार झाल्यावर सर्वांना एकत्र बसवून नाश्ता वाढला.  मुला-मुलींचा नाश्ता झाल्यानंतर संघातील आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. नंतर आम्ही ‘लिंबू चमचा’ ही स्पर्धा घेतली, त्यात तन्मयचा पहिला नंबर आला. मग आम्ही सर्वांना चॉकलेट वाटल्या. आमच्या शिबिरात एकूण ४६ मुलं-मुली सहभागी झाले होते. हे सर्व करताना आम्हाला खुप आनंद वाटला, मज्जा आली व आम्ही खुप धम्मालही केली!


रुपाली व वैष्णवी, प्रगती संघ, बेडकुचीवाडी
निमंत्रक: सदानंद चिंचकर
आमचे बर्ड फीडर्स!
२२ एप्रिलला आमच्या स्नेहसंस्कार संघाची बैठक होती. ‘पायाखाली भूमी माता’ या गाण्याने आम्ही बैठकीची सुरुवात केली. मग आम्ही आधीच्या बैठकीविषयी चर्चा केली. अशीच चर्चा सुरु असताना ताईने प्रश्न टाकला की ‘पक्षी घरटे कसे तयार करतात? ते खाद्य कसे मिळवतात?’ मग आमची या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली. प्रत्येकजण स्वतःला माहित असलेली माहिती सांगू लागले. चर्चेमधून एक प्रश्न उपस्थित झाला की ‘आता उन्हाळ्यात आपण पक्ष्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो?’ मग यावर आम्ही चर्चा करत असताना पक्ष्यांसाठी ‘बर्ड फिडर’ बनवायचे असं ठरलं. मग ते कसे बनवायचे याविषयी बोलत असताना ताईने आम्हाला एक विडीयो दाखवला. त्यात बघुन आणि काही स्वतःच्या आयडिया लावून पुढच्या रविवारी बर्ड फिडर बनवून जवळच्या फायर ब्रिगेड ऑफिसच्या अंगणात बसवायचे असं ठरलं. मग पुढच्या रविवारी २९ मे ला बैठकीला येताना आम्ही बर्ड फिडर बनवून आणले आणि ठरल्याप्रमाणे फायर ब्रिगेड ऑफिस मध्ये गेलो व तिथल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आणि त्यांनी परवानगी दिली. त्यांनी आम्हाला सर्वांत जास्त पक्षी कुठे येतात ते दाखवलं आणि तिथे बर्ड फिडर लावण्यात मदतही केली. तेथील अधिकाऱ्यांना हे पाहून फार आनंद झाला. मग परत आल्यावर बर्ड फिडर तयार करताना आलेले अनुभव व अडचणी यांचे सर्वांनी शेअरिंग केले. परत असा उपक्रम करायला हवा असं सगळ्यांचं मत पडलं आणि ते पुढच्या बैठकीला ठरवायचं असंही ठरलं. मग ६ मे ला आम्ही लावलेले बर्ड फिडर पाहायला गेलो आणि तेथील काकांना विचारले की ते ‘पाणी टाकतात का? पक्षी येतात का?’, तेव्हा त्या काकांनी आम्हाला सांगितले की ते स्वतः त्यात पाणी ओततात आणि पक्षीही रोज येतात. पण त्यांनी एक सांगितलं की धान्याच्या बर्ड फिडरमध्ये काठी लावल्याने पक्ष्यांना धान्य खाता येत नाही तेव्हा लक्षात आलं की काठीच्या जागी चमचा लावायला हवा होता. पण पक्षी येतात हे ऐकुन आम्हाला फार आनंद झाला आणि त्या काकांचा निरोप घेऊन आम्ही परत आलो.
स्नेहसंस्कारसंघ पुणे
निमंत्रक: विजया धनगर आणि टीम

 माझा वाढदिवस!

१४ नोवेंबरला आमच्या शाळेत बालदिनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी बरेच मुलं त्यांचे मत मांडत होते आणि प्रत्येकजण काहीतरी संकल्प करीत होता. कोणी नियमित अभ्यास करण्याचा, कोणी नेहमी खरे बोलण्याचा, कोणी मोठ्यांचा आदर करण्याचा पण मला काही सुचत नव्हतं. माझी आई माझ्या शाळेत टीचर आहे मी तिला म्हटलं की मला काही सुचत नाहीये पण मला काहीतरी वेगळा संकल्प करायचा आहे. आईने मला एक आयडिया सुचवली की ‘वाढदिवसाला आपण फुगे, केक यावर भरपूर पैसे खर्च करतो, त्यापेक्षा काही वेगळं तुला करता येईल.’ मग मी ठरवलं की त्या पैशांतून माझ्या शाळेतील एका गरजू मित्राला छान नवे कपडे घेईल.
 पण माझा वाढदिवस अजून भरपूर लांब म्हणजे २९ एप्रिलला होता. मग पाच महिन्यांनी एप्रिल उजाडला. परीक्षेनंतर १३ एप्रिलला आम्हाला शाळेला सुट्ट्या लागणार होत्या. मी विचार केला की मी ठरवलेलं गिफ्ट कधी आणि नेमकं कुणाला देऊ. मग मी मनोज बारेला या माझ्या मित्राला ते गिफ्ट द्यायचं ठरवलं कारण तो खूपच गरीब आहे पण अभ्यासात खुप हुशार आहे आणि खो-खो, कबड्डी या खेळांत त्याला बक्षीसही मिळाले आहे. मग मी मनोजसाठी एक नवा ड्रेस घेतला. १२ एप्रिलला सकाळी शाळेत गेल्यावर प्रार्थनेच्यावेळी माझ्या सगळ्या शिक्षकांसमोर आणि मित्रांसमोर मनोजला समोर बोलवलं आणि माझा संकल्प सांगितला. मी आणलेला नवीन ड्रेस त्याला गिफ्ट दिला आणि त्याला तो लगेच घालून यायला सांगितलं. तो परत आल्यावर त्याला तो ड्रेस खुप आवडला त्यामुळे मला आणि माझ्या मित्रांना खुप आनंद झाला.

धीरज पाटील, नेचर संघ, एरंडोल
निमंत्रक: शरद पाटील
 कागदी पिशव्यांचे वाटप!

आमच्या गटाची २१ मार्च २१०८ या दिवशी या मीटिंग घेण्यात आली. त्या दिवशी चर्चा चालू असताना विवेक याने त्याचं मत मांडलं की आत्ता नुकताच गुढीपाडवा होता व त्यादिवशी चोपडा या शहरात प्लास्टिक-बंदी करण्यात आली व या प्लास्टिक-बंदीला चालना मिळावी म्हणून आपण काहीतरी करावे असं विवेकचं मत होतं. मग सर्व टीममधील मुलांनी मिळून ठरवलं की आपल्या घरी येणाऱ्या वर्तमान पत्रापासून आपण लहान कागदी पिशव्या बनवू. चर्चेमध्ये असं ठरलं की आपण जर पिशव्या किराणा दुकानावर दिल्या तर त्या किराण्याच्या वजनाने फाटतील आणि मग त्या पिशव्यांचा किराणा दुकानात काही उपयोग होणार नाही. म्हणून मग आम्ही कागदी पिशव्या मेडिकल स्टोअर्सवर द्यायच्या असं ठरवलं. मग सरांनी आम्हाला सुचवलं की त्यासाठी आम्हाला आमच्या भागातील मेडिकल स्टोअर्सची यादी बनवावी लागेल.
मग २४ मार्चला या विषयावर परत मिटिंग घेण्यात आली व त्या दिवशी आम्ही मुला-मुलींनी आपापल्या भागातील मेडिकल स्टोअर्सची यादी बनवली आणि नंतर एका दुकानात एका दिवसाला किती गिऱ्हाईक येतात याचीही माहिती मिळवली. मग आम्ही काम सोपं व लवकर व्हावं म्हणून तीन-तीन मुला-मुलींचे गट केले आणि पिशव्या बनवायला घेतल्या. आम्ही एक लहान व एक मोठी अशा दोन प्रकारच्या पिशव्या बनवल्या अन २७ मार्चला सर्वांच्या पिशव्या एकत्र केल्या. मग २८ मार्चला त्या सर्व पिशव्यांचे ५० – ५० पिशव्यांचे गठ्ठे केले आणि मोजले तर आमच्या ३००० पिशव्या बनल्या होत्या.
मग २९ आणि ३० तारखेला आम्ही परत तीन-तीनच्या गटाने या पिशव्यांचे मेडिकल स्टोअर्समध्ये वाटप केले. एकूण ५८ मेडिकल स्टोअर्समध्ये टीममधील सर्व मुला-मुलींनी बनवलेल्या कागदी पिशव्या वाटल्या.
हे करताना आम्हाला खुप मजा आली आणि आनंदही झाला.
प्रणव, फ्रेंड्स फॉरएवर टीम, चोपड़ा
निमंत्रक: जितेंद्र देवरे





No comments:

Post a Comment