Tuesday 26 June 2018

संवादकीय


हेल्लो मित्र-मैत्रिणींनो,

आम्ही आशा करतो की तुम्ही सर्व मजेत असाल. आम्हीही इकडे मजेत आहोत. दरवर्षीपेक्षा यावर्षीच्या उन्हाळ्याने जरा जास्तच जोर धरला होता. दुपारी बाहेर पडायची सोय देखील उरली नव्हती. दरवर्षी असा वाढत जाणारा उन्हाळा बघुन जाणवतं की हळू हळू का होईना पण पर्यावरण किती बिघडत चाललंय आणि पर्यायाने पृथ्वीला हे किती हानिकारक ठरत असेल! पण अशावेळी दुसऱ्या बाजूला कुमार निर्माणमधील तुम्ही मुलं झाडं लावतात, त्यांना जगवतात, कुठेही कचरा फेकत नाहीत, प्लास्टिकचा वापर कमी करताय, फटाके फोडण्याचं व होळीला कृत्रिम रंग खेळण्याचंही प्रमाण हळूहळू तुम्ही कमी करताय. त्यातून तुम्ही पर्यावरणाची सोबतच निसर्गाची काळजी घेतात, हे पाहून आणि तुमचा खारीच्या वाट्याचा सहभाग पाहून तुमच्या रुपात एक आशेचा किरण आम्हाला सतत दिसत राहतो!
तर मंडळी, नुकतीच भली मोठ्ठी सुट्टी संपवून तुम्ही सगळेजण शाळेला हजर झाले असणार. आम्हाला खात्री आहे की या सुट्टीत तुम्ही भरपूर धम्माल केली असेल, तुमच्यातील काही जण मामा-मावशीच्या गावाला गेले असाल, काहींनी शेतात मस्ती केली असेल, तर काही जण कुटुंबासोबत फिरायलाही गेले असतील.
सुट्टी असुनही शक्य होते त्याठिकाणी कुमार निर्माणचे संघ व बैठका हे नियमित सुरु होते. सुट्टी म्हटल्यावर मज्जा ही करायलाच हवी. पण त्यासोबतच इतरही काही चांगली कामं करायला हवीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला ‘उन्हाळ्याच्या सुट्टीतले कृतिकार्यक्रम’ याविषयीचे खाद्य पुरवले होते. त्यात परिसरातील काहींच्या मुलाखती, सेवा देणारे-घेणारे, लहानांसाठी शिबीर असे काही कृतिकार्यक्रम सुचवले होते. यातील बरेच कृतिकार्यक्रम काही संघांनी अतिशय उत्तमरित्या केले. आम्हाला खात्री आहे की हे कृतिकार्यक्रम करताना तुम्हाला मज्जा नक्कीच आली असेल परंतु सोबतच काही चांगले वाईट अनुभवही आले असतील. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला पाठवण्यास विसरू नका. तसेच तुमच्यापैकी काहींनी आपापल्या ठिकाणी वैयक्तिक कृती केल्या असतील तर तेही आम्हाला नक्की पाठवा.
सुट्टीमुळे काही संघ विस्कळीत झाले असण्याची शक्यता आहे पण आता शाळा सुरु झाली की संघही नियमित सुरु होतील. काहींच्या संघात नवीन मुलेही येतील तर त्यांना कुमार निर्माण समजावून सांगणे आणि आपल्या संघात सामावून घेणे हे आता तुमचे कर्तव्य आहे.
मित्रांनो, या भरारीत तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे, ते म्हणजे मुलांनीच मुलांसाठी आयोजित करायचे ‘मुलांचे गेटटूगेदर’! आता यात ‘मुलांचे’ असं जरी म्हटलं असेल तरी त्यात मुलीही आहेत बरं का! तर या गेटटूगेदर विषयी अधिक माहिती या भरारीत दिलेली आहे, ती नक्की आणि न विसरता वाचा. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ही गेटटूगेदरची कल्पना नक्कीच आवडेल!

तुम्हाला माहितीये? नुकतीच निमंत्रकांची म्हणजेच तुमचा संघ सांभाळणारे ताई-दादा, सर-मॅडम यांची ‘द्वितीय निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा’ जळगाव व पुणे येथे पार पडली. या दोन दिवसांत वेगवेगळे सत्रं होते, सोबतच आम्ही खुप गाणी म्हटली, खेळ खेळलो, सिनेमा पहिला, खुप मज्जा केली. यात विशेष सांगायचं म्हणजे सर्व निमंत्रकांनी गेल्या ५ महिन्यांचा आपापल्या संघाचा प्रवास सगळ्यांसोबत शेअर केला. ते ऐकताना आम्हाला जाणवलं की तुमचे संघ, बैठका तसेच कृतिकार्यक्रम अतिशय उत्साहात सुरु आहेत.
आता लवकरच आपल्या सर्वांचा आवडता ऋतू म्हणजेच पावसाळा येईल आणि ही उन्हाळ्याची रखरख कुठल्या कुठे पळून जाईल. गेटटूगेदर विषयी वाचून आम्हाला लवकरात लवकर कळवा म्हणजे मी आणि शैलेश त्याप्रमाणे तुम्हा सर्वांना भेटायला येऊ आणि नेहमीप्रमणे खुप धम्माल करू!
तर, येत्या पावसात सर्वांनी मनसोक्त भिजा आणि सोबत तब्येतीची काळजीही घ्या!
लवकरच भेटुया!
तुमचे
प्रणाली, शैलेश

No comments:

Post a Comment