Tuesday 26 June 2018

गोष्ट


सुखी माणसाचा सदरा!

एक राजा होता. दूर दूर पर्यंत त्याचं राज्य पसरलेलं होतं. सगळ्या सुख सुविधा त्याच्या पायाशी लोळण घेत होत्या. खजिना अमाप संपत्तीने ओसंडून वाहत होता. राजा देखील शूर वीर होता. सतत हा राजा युद्धावर राहत असे. पण एकदा हा राजा फार आजारी पडला. त्याने मोठे मोठे वैद्य बोलावले, दूरदूरचे हकीम आणविले, औषधपाण्यात हजारो मोहरा खर्च केल्या; पण रोग काही हटेना आणि गुण काही येईना. तो दिवसेंदिवस जास्तच खंगत चालला होता. काय करावे कुणालाच कळेना. राजा अगदी निराश झाला. आपला शेवट जवळ आला असं त्याला वाटू लागलं.
एके दिवशी एक फकीर त्या राज्यात आला. त्याला कळले की, राजा आजारी आहे. तसा तो राजवाड्यात गेला. शिपायांनी त्याला राजाजवळ नेले.
फकीर म्हणाला, “महाराज, तुम्ही बरे व्हाल. पण त्याला एकच उपाय आहे. सुखी असेल अशा माणसाचा सदरा जर तुम्हाला घालायला मिळाला, तर तुमचा रोग ताबडतोब नाहीसा होईल.”
राजाला आनंद झाला. तो म्हणाला, “काय? सुखी माणसाचा सदरा मी अंगात घातल्यानं माझा रोग बरा होईल? फारच सोपा उपाय! मग काहीच अडचण नाही!”
प्रधान शेजारी उभा होताच. राजाने त्याला सुखी माणसाचा सदरा ताबडतोब घेऊन यायला सांगितले. फकीर निघून गेला.
प्रधानाने शिपाई बरोबर घेतले आणि तो सुखी माणसाच्या सदऱ्याच्या शोधासाठी शहरात निघाला. या घरी गेला, त्या घरी गेला; सोनाराकडे गेला, जवाहिऱ्याकडे गेला, जमीनदाराकडे गेला, व्यापाऱ्याकडे गेला. चहूकडे फिरून आला. सगळे मोठे महाल, बंगले, हवेल्या पालथ्या घातल्या. जो वाटेत भेटेल त्याला त्याने विचारलं, पण सुखी माणूस म्हणून त्याला कुणी भेटलं नाही. कुणी म्हणत, आम्हाला ही काळजी आहे; कुणी म्हणत, आम्हाला ती काळजी आहे; कुणी बोलले, आम्हाला झोप येत नाही; कुणी बोलले आम्हाला चैन पडत नाही; कुणी कशानं तर कुणी कशानं, पण जो तो आपला काळजीने पोखरलेला. “सदरे पाहिजे असतील तर आमच्याजवळ पुष्कळ आहेत, पण आम्ही काही सुखी नाही.”
हिंडून हिंडून प्रधान दमला.
एकदेखील सुखी माणूस त्याला शहरात आढळला नाही. प्रधानाची चिंता वाढू लागली.
फिरता फिरता तो शहराबाहेर दूर गेला. तिथे पाण्यात पाय टाकून एक माणूस एका दगडावर बसला होता. ओढ्याचे पाणी वाहत होते आणि त्याचा खळखळ आवाज येत होता. वारा गार वाहत होता. पाखरे किलबिल करीत इकडून तिकडे उडत होती. दूरवर क्षितिजावर काही ढग रेंगाळत होते.
प्रधान थोडावेळ बसावं म्हणून त्या माणसाजवळ गेला. त्याने त्या माणसाला विचारलं, “काय रे तू सुखी आहेस का?”
“कोण, मी?” तो म्हणाला, “माझ्यासारखा सुखी माणूस या जगात नसेल. मला कशाचीही खंत नाही.”
प्रधानाला अतिशय आनंद झाला. अखेर सापडला एकदाचा सुखी माणूस! प्रधान खाली बसला व त्याच्या दंडाला धरून म्हणाला, “अहाहा! मित्रा, तुलाच मी कधीचा शोधीत होतो, बरा भेटलास. झालं माझं काम! आता कृपा करून तुझा सदरा....”
बोलता बोलता प्रधान एकदम थांबला. तो डोळे फाडून त्या माणसाकडे पाहू लागला.
सदरा?? अरेरे... त्या माणसाच्या अंगात तर सदराच नव्हता! तो अगदीच उघडा-नागडा होता.
(‘आचार्य अत्रे’ यांच्या ‘फुले आणि मुले’ या पुस्तकातून साभार)


No comments:

Post a Comment