Friday, 1 September 2017

संवादकीय

प्रिय सर्व,
सप्रेम नमस्कार!

कुमार निर्माणच्या चौथ्या सत्रातील दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!
आम्ही आशा करतो की तुम्ही सर्व मजेत असाल! आम्हीही इकडे मजेत आहोत.
इकडे अधून-मधुन चांगला पाऊस पडतोय पण तरी म्हणावा तसा नाही. आणि आता तर गेला आठवडाभर सगळीकडे भरपूर पाऊस पडतोय.

असे सर्वे मजेत असताना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजच्या दवाखान्यातील ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने ६० बालके मृत्यू पावली. या निष्पाप जीवांना आपणा सर्वांकडून आदरांजली.

हा अंक फक्त निमंत्रकांसाठी असल्याने मुलांशी तो शेअर करू नका ही खास विनंती.
तर गेले ८ महिने आपण कुमार निर्माणच्या निमित्ताने एकमेकांशी जोडलेले आहोत. हा प्रवास तुमच्या आणि मुलांच्यासोबतीने आम्हालाही समृध्द करणारा ठरला. गेल्या ८ महिन्यांत तुमच्यातील निमंत्रक छान खुलला आहे, आपापल्या गटांसोबत तुम्ही नवनवीन चर्चा, कृतिकार्यक्रम करत आहात आणि ते आमच्यापर्यंत पोचवत देखील आहात हे पाहून आमचाही कामातला उत्साह नक्कीच वाढतोय. विशेष नमूद करायचे म्हणजे यात कुठेही ‘स्पर्धा’ हा घटक दिसत नाहीये, किंबहुना प्रत्त्येक गट आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी नवनवीन कृतिकार्यक्रम करून इतर गटांना प्रेरणा देत आहेत.
परंतु तरीही काही निमंत्रकांना वेळेअभावी म्हणा किंवा काही वैयक्तिक अडचणीमुळे म्हणा हवा तसा गट पुढे घेऊन जाता आला नाहीये. हरकत नसावी. अजून इथून पुढचे जवळपास ३ महिने आपल्या हातात शिल्लक आहेत, त्याचा आपण नक्कीच सदुपयोग कराल अशी आम्ही आशा करतो.
अधून-मधुन आपल्या भेटीही होत राहिल्या आणि त्यातून तुमचे गट समजून घेता आले, आपापल्या अडचणींवर काय करता येईल यावर चर्चाही झाल्या, यातून आम्हीही बरंच काही शिकलो. तुमच्याशी चर्चा केल्यावर बहुतांश निमंत्रकांना काम करताना जाणवणारी मुख्य समस्या म्हणजे ‘मुलांच्याकडून कृतिकार्यक्रम नेमके कसे काढायचे?’! तर यावर आधारित आपण सर्व निमंत्रकांची जुलै मध्ये पुणे व जळगाव येथे प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश्य हा होता की गट-बैठक, त्यात होणाऱ्या चर्चा ते कृतिकार्यक्रम हा प्रवास नेमका कसा साधायचा हे नेमके समजून घेणे.
कुमार निर्माणच्या प्रशिक्षण कार्यशाळेत तुम्ही दाखवलेला उत्साह आणि उर्जा नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. तुमच्या सहकार्यामुळे आणि सक्रीय सहभागामुळेच आपली कार्यशाळा उत्तम प्रकारे पार पडली. आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला देखील भरपूर मजा आली असेल आणि शिकायला देखील मिळालं असेल.

कार्यशाळेदरम्यान आपण चर्चीलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथून पुढे निरक्षण व अभ्यास या टप्प्यांच्या पुढे जाऊन कृतिकार्यक्रम व त्याबाबतचे शेअरिंग या दिशेने आपला प्रवास सुरु व्हायला हवा. आपल्याकडे जवळपास ३ महिने आहेत आणि त्यांत १० बैठका नक्कीच होऊ शकतात. तर आपण आता दुप्पट जोमाने कामाला लागले पाहिजे. नजीकच्या काळात येणारे सण-उत्सव या कामी आपल्याला मदत करू शकतात. या सणांच्या निमित्ताने मुले उत्साही असतात. आपण त्याचा उपयोग करून आणि सणांमध्ये चालून आलेल्या संधीचा उपयोग करून मुलांमध्ये काही कृती कार्यक्रम नक्कीच रुजवू शकू. त्या बद्दल देखील अंकात आपण बोलूच.
कार्यशाळेत झालेले विविध सत्र पुढील कामासाठी नक्कीच उपयोगी पडतील असं तुम्ही दिलेल्या प्रतिसादावरून वाटतंय. या कार्यशाळेत झालेली विविध सत्रे आणि त्यातील ठळक वैशिष्ट्ये या अंकात देत आहोत, त्यासोबतच पुढे उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी तुमच्यासाठी या अंकात घेऊन येत आहोत.
हे वर्ष संपता संपता आपण सर्व मुलांसाठी एक कौतुक सोहळा आयोजित करणार आहोत. जिथे मुलं-मुली वर्षभर त्यांनी केलेले कृती कार्यक्रम आणि त्यामध्ये त्यांना आलेले अनुभव इतर गटांना सांगतील.
कार्यशाळेत दाखवलेला उत्साह तुम्ही पुढेही तसाच टिकवून ठेवाल आणि आपण सगळे मिळून कुमार निर्माणला आणखी एक पाऊल पुढे नेऊ असा आम्हाला विश्वास वाटतो!
सस्नेह,
कुमार निर्माण टीम

No comments:

Post a Comment