Friday, 30 June 2017

गोष्ट

खरे मित्र
अशोक नावाचा एक मुलगा होता. त्याने या वर्षी नवीन शाळेत सातवीला प्रवेश घेतला होता. सहावीपर्यंतचं त्याचं शिक्षण त्याच्या मूळ गावाकडे झालं होतं.

आता शाळा सुरु होऊन जवळपास एक महिना झाला होता पण अजूनही अशोकने कुणाशी मैत्री केली नव्हती. तो आपला नेहमी मागच्या बाकावर एकटा बसलेला असायचा, कुणाशी फार बोलायचा नाही, खेळायचा नाही. शाळा सुटली की लगेच घरी निघून जायचा. त्याला कारणही तसंच होतं. अशोक वर्गात यायला लागला खरा पण त्याला अभ्यासात रस वाटत नव्हता, अभ्यासक्रम समजण्यात अडचणी येत होत्या, पण त्याच्या शांत राहण्याचं एक अगदी उघड कारण होतं ते म्हणजे अशोकच्या डोळ्यात असणारा दोष. तो समोरच्या कडे बघून बोलू लागला की, त्याच्या डाव्या डोळ्याचं बुबुळ सरकून एकदम कोपऱ्यात जाई. तसं झालं की अशोकचा चेहरा अगदी चमत्कारिक दिसायचा व समोरच्याला हसू यायचं. त्याची कुचेष्टा करण्याची इच्छा नसतानाही हे व्हायचं. पण त्याच्या आधीच्या शाळेतील वर्गमित्र यावरून त्याला चिडवायचे, मुद्दाम त्याला उत्तर द्यावं लागेल असं काही तरी विचारायचे आणि मग  त्याच्याकडे बघून जोरजोरात हसायचे. त्यामुळेच त्याने पहिली शाळा सोडून आता या शाळेत प्रवेश घेतला होता. आणि म्हणूनच त्याने इथे एकटं राहणं पसंत केलं होतं.
हळूहळू त्याला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या हे लक्षात यायला लागलं. तसंच मुलांच्या लाडक्या गीताली ताईंच्या देखील ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी अशोकला बोलावून घेतलं. त्याला अभ्यासात येणाऱ्या अडचणी विचारल्या. मुलं हसतात, टर उडवतात म्हणून आपण कुणाशी बोलत नाही आणि मैत्री करत नाही हे त्याने ताईंना सांगितलं. ताईंनी त्याला यावर असा उपाय सुचवला की त्याने रोज थोडावेळ येऊन ताईंच्या डोळ्यात बघून बोलावं आणि जर त्याला ताईंच्या डोळ्यात चेष्टेची झलक दिसली तर त्या पुढे ताईंशी बोलू नये. अशोकचा आत्मविश्वास वाढवा हा ताईंचा यामागील हेतू होता.
थोडेसे आढेवेढे घेत अशोक हे करायला तयार झाला. सुरुवातीला त्याचं ताईंकडे जाणं अनियमित होतंच पण बोलणंही अगदी जुजबी होतं. सुरुवातीला तो ताईंच्या डोळ्यांकडे बघायचं टाळायचा पण हळूहळू या संवादाला तो सरावला. मोकळेपणाने बोलू लागला. असं दोन-तीन महिने चालल्या नंतर ताईंनी येत्या शिवजयंतीला वर्गासमोर भाषण करायचा प्रस्ताव अशोक समोर ठेवला आणि कसा कोण जाणे अशोकने तो मान्य केला.
आता मात्र ताईंना चिंता वाटू लागली जर त्या दिवशी मुले अशोकला हसली तर परत तो कधीच कुणासमोर बोलणार नाही असं त्यांना वाटू लागलं. खबरदारीचा उपाय म्हणून अशोकच्या नकळत त्यांनी वर्गातील इतर मुलामुलींची बैठक घेतली आणि अशोकला न हसण्याबद्दल भावनिक आवाहन केलं. एक-दोन अपवाद वगळता इतरांनी हे मान्य केलं. एकदोन मुलं इतक्या सहजपणे ऐकणाऱ्यांतलीनव्हती. वर्गातील रोहनने मात्र स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारली त्याने परत परत इतर मुलांशी याबद्दल चर्चा केली व न हसण्याबद्दल सांगितले.

 शिवजयंतीला अशोकने अडखळत भाषण केलं, मात्र वर्गातील मुलं त्याला हसली नाही. यामुळे ताईंना आणि रोहनला विशेष आनंद झाला. त्या दिवसानंतर अशोक वर्गात बोलू लागला. ताईंशी तर त्याची छान गट्टी जमली. पण वर्गातील इतर मुलांशी मात्र त्याची अजून म्हणावी तशी मैत्री झाली नाही आणि म्हणून त्याचा आत्मविश्वास देखील पूर्णपणे वाढला नाही.
रोहन स्वतः ताईंकडे आला आणि त्याने ताईंना एक योजना सांगितली. अशोक चांगला धावतो हे रोहनला माहिती होतं. धावण्याची स्पर्धा घेतली तर अशोक पहिला येईल आणि त्याचा आत्मविश्वास अजून जास्त वाढायला मदत होईल असं त्याने ताईंना सुचवलं. ताईंनी त्याप्रमाणे स्पर्धा आयोजित केली. इकडे रोहनने अशोक सोबत मैत्री वाढवायला सुरुवात केली. रोहन आणि त्याचे इतर मित्र अशोकला सोबत घेऊन खेळायला जाऊ लागले. अशोकला चिडवणाऱ्या इतर मुलांना त्यांनी तसं न करण्या बद्दल सांगितलं. अशोकला त्यांनी धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावला.
धावण्याची स्पर्धा झाली त्या स्पर्धेत योजनेप्रमाणे अशोक प्रथम आला. आत्तापर्यंत धावण्याच्या स्पर्धेत नेहमी पहिला येणारा रोहन मात्र या स्पर्धेत कसा कोण जाणे तिसरा आला आणि त्याला तिसरा आल्याचाच जास्त आनंद झालेला दिसत होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. शिक्षण अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. त्यांच्या हस्ते अशोकला बक्षीस देण्यात आलं. त्यावेळेस अशोकच्या चेहऱ्यावारील आनंदापेक्षाही गीताली ताईंच्या आणि रोहनच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसत होता. तेव्हापासून अशोक इतर मुलांमध्ये मिसळू लागला. रोहनची आणि अशोकची तर अगदी घट्ट मैत्री झाली. गीताली ताईंना खूप आनंद झाला.
  

No comments:

Post a Comment