Friday 30 June 2017

संवादकीय

नमस्कार दोस्तहो !!!
सर्वजण मजेत आहात ना? आम्हीही इकडे मजेत आहोत.
सर्वप्रथम वरच्या वर्गांत गेल्याबद्दल कुमार निर्माण टीम कडून तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन!
आम्हाला खात्री आहे की सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनीच खुप धम्माल केली असेल, खुप खेळला असाल आणि आपापल्या आवडीच्या गोष्टी केल्या असतील. तुमच्यापैकी काही जण मामाच्या गावी गेला असाल, काही इतर नातेवाईकांकडे, काही कौटुंबिक सहलीसाठी गेला असाल तर काहींनी घरीच राहून मजा केली असेल.
अर्थातच मोठ्ठ्या सुट्टीमुळे कदाचित आपला गट थोडा विस्कळीत झाला असेल, पण बरेच गट नेहमीप्रमाणे भेटत असतील. एव्हाना तुमच्या शाळा सुरु झाल्या असतील. नवीन वह्या, पुस्तकं यांच्या एका विशिष्ट सुगंधाचा घमघमाट सुटला असेल आणि सुट्टी संपून पुन्हा शाळा, शिकवण्यांमध्ये तुम्ही लवकरच व्यस्त व्हाल.
मित्रांनो, परंतु या व्यस्त वेळापत्रकात आपल्याला सुट्टीत विस्कळीत झालेला कुमार निर्माणचा गट पुन्हा त्याच उत्साहाने, उर्जेने सुरु करायचा आहे. तुम्हीही सुट्टीत केलेली धमाल आपल्या मित्रांना सांगायला उत्सुक असलाच. तुमच्या परीक्षा सुरु होण्याआधी म्हणजेच एप्रिलमध्ये सुट्टीतही तुम्हाला कुमार निर्माणशी जोडून ठेवेल असा धागा म्हणजेच ‘उन्हाळ्याच्या सुट्टीतील उपक्रम’ आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवले होते. यासोबतच ‘न्याया’वर आधारित भरारीही आम्ही तुम्हाला पाठवलं होतं. काही गटांना भरारी उशिरा मिळाल्याने तुम्हा मुलांपर्यंत ते पोचू शकले नाही याबद्दल Sorry!

अर्थात तुम्ही शाळेत परत आल्यावर ते भरारी वाचू शकतात. याशिवाय ज्या गटांना वेळेत भरारी व उपक्रम मिळाले आहेत त्यांनी यातील जास्तीत जास्त उपक्रम करण्याचा प्रयत्न नक्की केला असेल. तुम्ही केलेल्या सुट्टीतील उपक्रमांचे तुमचे अनुभव नक्की आमच्यापर्यंत पोचवा म्हणजे इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल.
‘उन्हाळ्याच्या सुट्टीतील उपक्रम’ करताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव नक्कीच आले असतील. घरात कोण जास्त काम करतं याचं कदाचित उत्तरही निरीक्षणातून मिळालं असेल, प्राण्यांचे वेगवेगळ्या वेळी निरीक्षण करताना कदाचित एखाद्या प्राण्याने तुमच्याशी संवादही साधला असेल, आपल्या परिसरातील व्यवसाय करणाऱ्यांची मुलाखत घेताना तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या असतील तसंच कुणालातरी मदत करून तुम्ही शाबासकीही मिळवली असेल. तर हे सगळे अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा, आमच्यापर्यंत पोचवा. ज्या गटांना भरारी उशिरा मिळाले ते गट सुट्टीत करायला दिलेले उपक्रम आत्ताही करू शकता. याव्यतिरिक्त जरी कुणी काही उपक्रम आपापल्या ठिकाणी केले असतील तर तेही जरूर आमच्याशी शेअर करा. आम्हीही तुमचे भन्नाट अनुभव वाचायला आतुर आहोत.
आधीच्या भरारीचे वाचन करून त्यातील गोष्टीवर, चित्रावर गटात चर्चा घडवून आणा, कोड्याचे उत्तर शोधा यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘न्याया’शी संबंधित दिलेले उपक्रम गटात कसे करता येतील यावरही चर्चा करा. या भारारीचेही वाचन करून त्यावर चर्चा करा.
आता उन्हाळ्यानंतर लवकरच पावसाला सुरुवात होईल. सगळीकडे मातीचा सुगंध दरवळेल. परिसर हिरवागार होईल. शेतांमध्ये पेरणीला सुरुवात होईल. पावसाळा ऋतूशी संबंधित तुम्ही काय उपक्रम करू शकतात यावर गटात नक्की चर्चा करा. कदाचित तुम्ही आपल्या गावातल्या किंवा गावाबाहेरील शेतकऱ्याला पेरणीच्या कामात मदत करू शकाल, त्यात तुम्हाला मजाही येईल, शिकायलाही मिळेल आणि शेतकऱ्यांनाही मदत होईल. यासोबतच तुम्ही गट मिळून आपापल्या परिसरात उपयुक्त अशी फळा-फुलांची, भाज्यांची रोपेही लावू शकता.
तर मित्रांनो, या मोठ्ठ्या सुट्टीनंतर गटाला पुन्हा रिचार्ज करूया आणि तेवढ्याच जोमाने पुन्हा मिटींग्स, विविध कृतिकार्यक्रम यांना सुरुवात करूया.
आणि लवकरच आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत...
  

No comments:

Post a Comment