Friday 30 June 2017

मुलांच्या लेखणीतून

. भरारी गट – भराडी, जळगाव

नेहमीप्रमाणे ठरलेल्या दिवशी शाळेच्या अंगणात आमची कुमार निर्माणची मिटींग चालू होती. सकाळी कुमार निर्माणच्या मुलांव्यतिरिक्त इतर मुले व पालक यांची ये-जा शाळेत सुरू होती. आम्हाला वाटलं काय आहे? बघण्यासाठी म्हणून आम्ही ज्या ठिकाणी पालक आपल्या मुलांना घेऊन जात होते त्या खोलीकडे गेलो. तेथे आम्हाला दिसले की गावातल्या लहान मुलांना पल्स पोलिओ लस देण्याची मोहीम सुरु आहे. मग त्या ठिकाणी आम्ही आमच्या सरांसोबत आणि अंगणवाडीच्या ताईसोबत चर्चा केली. पल्स पोलिओ म्हणजे काय? ते देण्याचे फायदे काय? याला राष्ट्रीय कार्यक्रम का म्हणतात? हा कार्यक्रम करताना ताईंना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. ताईंनी सर्वं विषयांवर सविस्तर चर्चा केली. ताईंनी सांगितलं की आज जी मुलं येतील त्यांना इथे औषध द्यायचं आणि जी इथे येणार नाही त्यांना घरी जाऊन औषध द्यायचं. गटातील सर्व सदस्यांनी ठरवलं की आज आपण ताईंच्या कामात हातभार लावून पल्स पोलिओ मोहिमेत सहभागी होऊया. आज हा कृतिकार्यक्रम करायचं ठरलं. त्यात नम्रता व  जगृती म्हणाल्या की गावातील मुले येतील परंतु गावाच्या बाहेर आलेले धनगर लोक जे मेंढपाळ आहेत त्यांच्या मुलांचे काय? तर ऋषिकेश व वैभव म्हणाले आपल्या परिसरात काठेवाड लोकं गायी शेतात बसवतात त्यांच्याकडे देखील छोटी मुले आहेत त्यांच्या साठी काय करता येईल? चर्चा झाली आणि गाव छोटेसे असल्याने आम्ही दोन दोन सदस्यांचे गट तयार केले आणि प्रत्येक गटाने गल्ल्या वाटून घेतल्या. गटातील मोठया सदस्यांनी धनगर वाडा व काठेवाड वस्ती गाठली. त्यांना पल्स पोलिओचे महत्त्व समजावून सांगितले व त्यांच्या पालकांना व बाळांना शाळेत आणले व औषध दिले. तर गावातील कुमार निर्माणच्या सदस्यांनी गावातील सर्व बाळांना व त्यांच्या पालकांना  शाळेत बोलावून औषध दिले त्यामुळे अंगणवाडीच्या ताईंच्या कामात पण मदत झाली व लाभार्थ्यांनाही मदत झाली. आम्ही केलेल्या कामाचे कौतुक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सुपरवायजर ताई या सर्वांनी केले. आमच्या छोट्या मदतीमुळे गावातील सर्व बाळांना महत्त्वाची लस मिळाली याचा आम्हाला खूप आनंद झाला. नंतर आम्ही सर्व आपापल्या घरी गेलो.
गट निमंत्रक: समाधान ठाकरे
 . किलबिल कट्टा, भुसावळ, जळगाव
२८ मे ला म्हणजेच रविवारी आमच्या किलबिल कट्ट्याने निसर्ग सहल आयोजित केली होती. मी सकाळी लवकरच उठून तयार झाली आणि माझ्या पप्पांनी सकाळी ६ वाजताच मला सहलीच्या ठिकाणी सोडलं. तिथे माझे सर्व मित्र-मैत्रिणी, शैला ताई, व इतर जणही जमले होते. मग आम्ही झाडांच्या बिया उचलायला सुरुवात केली. बिया उचलताना ताईंनी आम्हाला जवळ-जवळ २०-२५ झाडांची माहिती दिली. जसे, बहावा, रिठा, पिंपळ, जांभूळ, वड ई. यासोबतच तातोडा, कोकिळा हे पक्षी सुद्धा आम्ही पाहिले.
हे काम करताना आम्ही खूप धम्माल पण केली. बेलफळे एकमेकांत वाटावाटी करून खाल्ली. आम्हाला खरी मजा आली ती मुंग्यांनी झाडावर बांधलेल्या घरट्यांना पाहून. कुणीतरी अशीच एक घरटं असलेली फांदी तोडली तर क्षणात हज्जारो मुंग्या बाहेर आल्या आणि आम्ही सर्वजण लांब पळालो. नंतर आम्ही बहावाच्या शेंगांचा खुळखुळा म्हणून वाजवून धम्माल केली.
नंतर आम्ही फिरत फिरत जुन्या मार्केटमध्ये जाऊन वडापाव खाल्ला. जावळे सरांनी आम्हाला इंग्रजी चिंचा खायला दिल्या. मग आम्ही चांदणी गार्डनमध्ये जाऊन भंडारी सरांसोबत विविध खेळ खेळलो. नंतर आम्ही सर्वांनी मिळून पोहे खाल्ले आणि खूप गप्पा मारल्या.
आता या जमा केलेल्या बियांचे आम्ही बियांचे लाडू म्हणजेच सीडबॉल बनवणार आहेत आणि ते पावसाळ्यात आजूबाजूला टाकणार आहे. सीडबॉल म्हणजे एक बी घ्यायची आणि तीला मध्ये टाकून आजूबाजूने माती लावून त्याचा बॉल किंवा लाडू सारखा आकार बनवायचा.
आम्ही मस्तपैकी निसर्ग पहिला. मला सकाळची सहल खूप खूप आवडली. आणि परत अशा सहलीला जायला मला नक्की आवडेल.
श्रद्धा रमेश प्रधान
निमंत्रक: शैला सावंत
 . मलजल प्रक्रिया केंद्राला भेट - मी माणूस गट, नाशिक

१९-०३-१७ रोजी आम्ही मलजल प्रक्रिया केंद्राला भेट दिली. १४ मार्च ला वर्तमानपत्रात मलजल प्रक्रिया केंद्राला भेट देण्याची बातमी होती. आमच्या गटातील एकीने ती बातमी वाचून सर्वांना विचारले तर १५ जणांनी होकार दिला मग आम्ही आमची नोंदणी केली. ठरलेल्या दिवशी सगळे आपल्या पालकांसोबत ९.०० वाजता तापोवनला पोचले. तिथे एका सरांनी या कार्यक्रमाची आम्हाला माहिती दिली. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या काकांनी एक प्रेझेन्टेशन दाखवलं आणि आम्हाला सांगितलं की या कार्यक्रमाचं आयोजन ‘जागतिक जलदिना’निमित्त केलं आहे. मग त्यांनी आम्हाला प्लांटवर नेलं. सगळ्यांत पहिले इनलेट चेंबर दाखवलं. इथून सांडपाणी सोडल्या जातं, मग स्क्रीन चेंबर मध्ये जातं. तिथे एक मशीन आहे जिथे तरंगणाऱ्या वस्तू जसे, प्लस्टिकच्या पिशव्या, भाज्यांचा कचरा ई. वेगळं होतं. मग पुढे ते पाणी सिट चेंबर आणि मग बायपास चेंबरमध्ये जातं. इथे जड पदार्थ तुरटी टाकून खाली बसवतात. नंतर ते १२ पाईप्स द्वारे जातात. इथे त्यातल्या जंतूंची वाढ होते आणि मिथेन वायू तयार होतो. या बायपास चेंबरमधलं पाणी एरिएशन साठी एरिएटर मध्ये पाठवतात. तिथे टरबाईन फिरते ज्याने पाण्यातला कार्बन हवेत मिसळतो आणि हवेतलं ऑक्सिजन पाण्यात मिसळतं. त्यानंतर जे पाण्यातले कण होते त्यांना ड्राईंग बेडवर १५ दिवस ठेवतात, ते वाळवतात आणि त्याचं खत तयार होतं जे शेतीसाठी वापरतात. मग आम्ही पॉलिथीन पाँड पहिला. तिथे गेल्यावर सांडपाण्याचा वास कमी झाला होता. मग पाण्याला क्लोरीनेशन युनिटमध्ये त्यातले बॅक्तेरीया मारायला पाठवतात. आता पाणी भरपूर स्वच्छ झालेलं असतं पण पिण्याइतकं नाही. आता हे पाणी नदीत सोडतात. मग आम्हाला बायो-इंजिन रूम दाखवली. गॅस चेंबरमध्ये मिथेन वायू साठवलेला असतो ज्याची इथे वीजनिर्मिती होते. त्यानंतर तिथल्या सगळ्या तज्ञांनी आम्हाला माहिती दिली. आणि आम्ही त्यांना आमच्या शंका विचारल्या. मग आम्ही थोडावेळ खेळलो आणि घरी गेलो. तिथून आल्यावर आम्हाला वाटलं की आपण किती पाणी वाया घालवतो आणि मग आम्ही ठरवलं की पाणी वाया नाही घालवणार. नुकताच होळीचा सण झाला होता आणि ते रंगाचं पाणी त्यातील केमिकलमुळे अजूनही तसंच होतं. मग आम्ही केमिकलचे रंग वापरायचे नाहीत असंही ठरवलं. शेवटी त्या काकांनी आम्हाला एक-एक तुळशीचं रोपटं भेट दिलं.
- इंद्राणी
निमंत्रक: अजित टक्के
 . आम्ही पाहिलेला सूर्यास्त: उडान गट, भोटा, जळगाव
बुधवारी मी असाच रिकामा बसलो होतो. मोकळा वेळ होता. मला एकदम पश्चिमेकडे झुकलेला सूर्य दिसला आणि मनात एक भन्नाट आयडिया आली. मी घराजवळ राहणाऱ्या महेश, वैभव, मयूर व ज्ञानेश्वर यांना एकत्र केलं व आम्ही गावाबाहेरच्या मोकळ्या पटांगणाकडे फिरायला गेलो. सूर्य आता मावळत होता.

तिथे गेल्यावर बघतो तर काय? सूर्य एकदम लालबुंद दिसत होता. जणू सोन्याचा गोळा क्षितिजाच्या मागे लपत होता. आमच्यातल्या एकाला तर असं वाटलं की हे आकाश म्हणजे एखाद्या स्त्रीचा चेहरा आणि हा सूर्य म्हणजे त्या स्त्रीने लावलेली टिकली.
पण त्या सूर्याला पाहिल्यावर मनात असं आलं की सूर्यासारखी विशाल व अविश्वसनीय गोष्ट जर अस्ताला जाऊ शकते, तर आपण काय चीज आहोत? असं पण वाटलं की या सूर्याला  नेऊन शोकेसमध्ये ठेवावा.
थोड्यावेळाने आमच्या शाळेतील अजून काही मुंला-मुलींचा गट तिथे आला. त्यांनापण कळालं की आम्ही सूर्यास्त पाहायला आलोय. आमच्यासोबत त्यांनीपण मनभरून सूर्य पहिला आणि कोणाकोणाला तो सूर्य कसा वाटतोय ते सांगितलं. मग काही वेळ आम्ही थांबलो आणि मन भरून सूर्य पाहून घरी परत आलो.
- मयूर तायडे
निमंत्रक: मंगेश ढेंगे
  . एकता गट, सासवड, पुणे
कुमार निर्माणचा एकता गट सासवड यांच्या झालेल्या बैठकीत अनेक प्रश्नांबद्दल चर्चा झाली होती. त्यातील एक प्रश्न निवडून त्याबद्दल काहीतरी करायचं असं मुलांनी ठरवलं होतं.
या मुलाच्या कॉलनी मध्ये लोक कचरा एका मोकळ्या जागेवर टाकत होते. गटातील बऱ्याच मुलांच्या घरातील कचरा देखील तेथेच टाकल्या जात होता. मुलांनी हा प्रश्न निवडून त्यावर कृती करायची ठरवलं. लोक कचरा टाकतात त्या ठिकाणी पाटी लावायची असं मुलांनी ठरवलं. पण साध्या पाट्या असलेल्या ठिकाणी लोक अजून जास्त कचरा टाकतात हे मुलांना माहिती होतं. मग मुलांनी तेथे पुणेरी पाटी लावायची असं ठरवलं. ठरल्या प्रमाणे मुलांनी पुणेरी पाट्या बनवल्या. “येथे फक्त अतिहुशार लोक कचरा टाकतात” ‘येथे मूर्ख लोक कचरा टाकतात” अशा या पाट्या होत्या. मुलांनी या पाट्या लोक कचरा टाकतात तेथे लावल्या. मुलं परत परत जाऊन पाट्या योग्य ठिकाणी आहेत का हे बघत होते. एके दिवशी गटातील लहान मुलांना या पाट्या गायब असलेल्या दिसल्या. मुलांनी लगेच नवीन पाट्या आणून तेथे लावल्या.हळूहळू लोकांनी तेथे कचरा टाकणं बंद केलं. जिथे लोक कचरा टाकत ती जागा ज्या माणसाची होती त्यांना हे बघून खूप आनंद झाला. त्यांनी मुलां-मुलींना शाबासकी दिली. आता पर्यंत जो कचरा तिथे जमा झाला होता तो त्यांनी जाळून टाकला.
या मुलांच्या कॉलनी मध्ये कचऱ्याची घंटा गाडी येते पण ती थोडी उशिरा येथे आणि तो पर्यंत सगळे लोक आपल्या कामावर निघून गेलेले असतात. त्यामुळे या घंटागाडीची वेळ बदलावी आणि एक कचराकुंडी बसवून द्यावी ही विनंती नगर पालिकेला करायची असं या मुलांनी ठरवलं. त्यानुसार एक अर्ज तयार करून ही मुलं त्यांच्या पालकांना घेऊन नगर पालिकेत पोहचली. पण त्या दिवशी संबंधीत अधिकारी उपस्थित नव्हते. मग ही मुलं-मुली नगर पालिकेतील विविध विभागांची माहिती घेऊन घरी परतली. नगर पालिकेतील अधिकाऱ्यांना गटातील मुला-मुलींनी कुमार निर्माणची माहिती देखील सांगितली. अर्ज पुन्हा नव्याने काही सुधारणा करून लिहायचा आणि परत एकदा नगर पालिकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना द्यायचा असं या मुला-मुलींनी ठरवलंय.
गट निमंत्रक – चंद्रकांत घारमाळकर


No comments:

Post a Comment