Friday 30 June 2017

गोष्ट

छटाकी आजीची गोष्ट !
 तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढले. आमच्या गावातून अमरावती व भोगवती या दोन नद्या वाहतात.
आम्ही कुटुंबात एकत्रितरीत्या सात भावंडे होतो; २ बहिणी आणि ५ भाऊ. एकत्र कुटुंब असल्याने सर्व भावंड हसत, खेळत, भांडत, रडत आणि एकमेकांची काळजी घेत एकमेकांच्या सोबत वाढलो. आणि सोबतीला कॉलनीमधील मित्र-मैत्रीणीही होतेच. कॉलनीमध्ये आम्हा सर्व मित्रांची एक भारीच गँग होती. अर्थात आम्ही गुंडा गर्दी नाही करायचो परंतु खेळणं, रात्री मोकळ्या आकाशाखाली झोपून तारे बघणं, खुप उशिरापर्यंत गप्पा मारणं, शाळेत जाणं, अभ्यास आणि बऱ्याचदा जेवण अशा सर्व गोष्टी एकत्र करायचो, सर्व सण-समारंभ एकत्र साजरे करायचो, खुप मजा करायचो. एकूण आमची  गँग तशी खुप फेमस होती.
आमचं घर रेल्वे लाईनला लागून होतं आणि सर्व ठिकाणी असते तशी आमच्या दोंडाईचामध्येही या रेल्वे लाईनला लागुनच एक मोठी झोपडपट्टी होती. ती अजूनही आहे. या झोपडपट्टीत मुख्यत्त्वेकरून भिल व पावरा समाजाची लोके राहत असत. हे सगळे दोंडाईच्याचा शेजारी असलेल्या नंदुरबार मधील आदिवासी समाजाची लोकं होती. तसा त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती होता आणि हे आदिवासी लोक जंगलात राहायचे, परंतु झोपडपट्टीत राहायला आल्यावर त्यांना स्वतःचा असा काही मुख्य व्यवसाय उरला नव्हता. मग यांच्यातील महिला वर्ग आसपासच्या कॉलनीमधील घरांत धुणी-भांडी असे घरकाम करायच्या, पुरुष वर्ग मजुरी करायचा आणि वृध्द महिला रेल्वे लाईनच्या आसपासच्या परिसरात भीक मागायच्या.

तर अशीच एक म्हातारी आमच्या कॉलनीत रोज अन्न मागायला यायची. तिची यायची वेळ अन आमची शाळेला निघायची वेळ एकच असायची. त्या म्हातारीला तिचं स्वतःचं असं काही नाव होतं की नाही ते फारसं आता नीट आठवत नाही पण आमच्या कॉलनीतल्या काही आजी तिला ‘ए छटाकीऽऽ...’ अशीच हाक मारायच्या. तिच्या खऱ्या नावाला सोडून आम्हीही तिला छटाकीच म्हणत असू.
ती दिसायला काळी पण चेहऱ्याने आखीवरेखीव होती, थोडी वेडसर होती. तिचे मोठ्ठाले डोळे मला अजूनही आठवतात. ती जवळ आली की तिचा एक विशिष्ट वास यायचा. खुप दिवस तिच्या अंगावर एकच लुगडं दिसायचं. ते फाटायला आलं की त्यावर काही ठिकाणी ठिगळही दिसायची. ती तिच्या झोपडीत एकटीच राहायची. अर्थात आम्ही मुलं कधी तिच्या झोपडीपर्यंत गेलो नाही. तिच्याजवळ नेहमी एक गाठोडं असायचं. त्यात काय असेल याचं आम्हाला नेहमीच कुतूहल असायचं. आणि रोज ते गाठोडं ती सोबत वागवायची. तिच्याजवळ नावाला एक-दोन भांडी दिसायची ज्यात ती घरोघरी मागितलेलं अन्न साठवायची आणि दुपारी एखाद्या झाडाच्या सावलीत बसून खायची. आमच्या कुणाच्या घरी पैसे मात्र तिने कधीच मागितले नाहीत. जेव्हा आम्ही खुप लहान म्हणजे पहिली-दुसरीत होतो तेव्हा ती घरी आली रे आली की आमची आई, काकू, आज्जी आम्हाला दम भरायच्या आणि म्हणायच्या की “आता जर तुम्ही मस्ती केली तर तुम्हाला छटाकीकडे देऊन टाकू. मग ती तुम्हाला कुठेतरी दूर घेऊन जाईल.” घरच्यांच्या अशा धाकामुळे छटाकी आमच्या गँगची दुश्मन होती. ती आली रे आली आम्ही सर्व जण तिला वाकुल्या दाखवत चिडवत असू, तिला दगड मारत असू, हाकलून लावत असू आणि मग ती आमच्यावर धावून येई आणि शेवटी आम्ही तिथून पळ काढत असू. हा आमचा रोजचा उद्योग झाला होता. कधीतरी तिने घरी तक्रार केली तर आम्ही मुलं मारही खात असू. एवढं होऊनही छटाकीला त्रास देणं काही आम्ही सोडलं नव्हतं आणि तिनेही आमच्या कॉलनीत येणं बंद केलं नव्हतं. आमच्या घरी तिला कुणी ‘भिकारी’ म्हणून वाईट वागणूक दिल्याचं मलातरी आठवत नाही. उलट आमच्या आई, काकू छटाकीच्या नावाची एक भाकरी किंवा जास्तीची खिचडी मात्र आठवणीने करून ठेवायच्या.
कधीतरी दुपारी आम्ही शाळेतून घरी यायचो तेव्हा छटाकी आमच्या आज्जीशी तासंतास गप्पा मारतानाही दिसायची. आमच्याकडे येणारे पाहुणे-राउळेही तिला पाठ झाले होते. तिला आम्ही आमची दुश्मन जरी मानत असलो तरी तिची आम्हाला कधी भीती वाटली नाही किंवा तिच्या अशा राहणीची किळसही वाटली नाही.
हळूहळू आम्ही मोठे होत गेलो आणि छटाकी मात्र अधिक म्हातारी होत गेली. ती आधीपेक्षा खुप खंगत गेली. तरी तिचं येणं मात्र चालूच होतं. थोडं मोठं झाल्यानंतर मात्र आमची तिच्याशी असलेली दुश्मनी कमी व्हायला लागली होती. कारण मोठे झाल्यावर आम्ही आमच्या आईला
म्हणायचो की, “छटाकी तर रोजच आपल्याकडे येते. जरी तुम्ही आम्हाला तिच्याकडे देऊन टाकलं तरी आम्ही दुसऱ्यादिवशी तिच्यासोबत घरी परत येऊच शकतो.” मग हळूहळू आम्हीही तिच्याशी गप्पा मारायला लागलो होतो. मला अजूनही आठवतं, एकदा आम्ही भावंडांनी तिला तिच्या मुला-बाळांबद्दल विचारलं होतं. तिने काही सांगितलं नाही पण तिच्या डोळ्यात पाणी मात्र आलं होतं. ते बघुन आम्हाला खुपच वाईट वाटलं होतं. मग त्यादिवसापासून आमच्या गँगने ठरवून टाकलं की इथून पुढे छटाकीला आपण अजिबात त्रास द्यायचा नाही. मग ती आजीशी गप्पा मारताना कधीतरी हळूच आमच्या केसांतून मायेचा हात फिरवायची, तिच्या रखरखलेल्या हातानी आमचे गालगुच्चे घ्यायची, आमचे लाड करायची. नकळत छटाकी आमच्या आयुष्याचा एक भाग बनली होती.
आम्ही साधारण चौथीत असू. झालं असं की खुप दिवस गेले पण छटाकी काही आमच्या कॉलनीत अन्न मागायला आली नाही. आम्ही आजुबाजूच्या घरांतही चौकशी केली पण कुणालाही ती दिसली नव्हती. मला आठवतं आमच्या गँगमध्ये ‘छटाकी कुठे गेली असेल?, ती काय खात असेल?, तिला काही झालं असेल का?’ यावर बोलणं होत असे. ती राहत असलेल्या झोपडपट्टीत त्यावेळी आम्ही का नाही गेलो ते माहित नाही पण रोज छटाकीची आठवण मात्र निघायची.
अन एक दिवस अचानक ती पुन्हा आली. सकाळच्या वेळी आम्ही भावंड घराच्या मागच्या ओट्यावर अभ्यास करत होतो अन अचानक “भाकरी दे वं माऽऽय...” अशी आरोळी आमच्या कानावर पडली. माझी ताई म्हणाली हा आवाज नक्की छटाकीचा आहे. कोण आनंद झाला होता तेव्हा ती आरोळी ऐकुन! मला आठवतं आम्ही सगळे अभ्यास सोडून तिच्याभोवती जमलो आणि आमच्या प्रश्नांनी तिला भंडावून सोडलं. शेवटी आम्हाला कळलं ते असं की छटाकीच्या पायाला जखम झाली असल्याने तिला चालता येत नव्हतं आणि म्हणून ती इतके दिवस आमच्या कॉलनीत फिरकली नव्हती. हे कळल्यावर आम्हाला खूपच वाईट वाटलं होतं. इतके दिवस खायला नीट न मिळाल्याने तीची तब्येत खूपच ढासळली होती. तिच्या हाडांचा अगदी सांगाडा झाला होता. लागलेल्या ठिकाणी पायाला तिने एक कापड गुंडाळलं होतं.
 मग पुन्हा छटाकी सतत आमच्याकडे येत राहिली अन आमच्याकडेही तिच्या नावाची एक भाकरी किंवा जास्तीची खिचडी शिजत राहिली. आता तिच्याबद्दलची भीती गळून पडल्याने आम्हीही तिला भाकरी नेऊन द्यायचो, तिचं खाऊन झालं की प्यायला पाणीही द्यायचो. कधीही आमच्या आई, काकू, आज्जीला तिच्या नावाची भाकरी करण्याचा कंटाळा आला नाही की आम्हालाही कधी तिच्या रोज येण्याचा तिटकारा आला नाही.
पाचवीनंतर वडिलांच्या बदलीमुळे आम्ही दुसऱ्या गावी राहायला गेलो. पण छटाकीचं येणं मात्र बरेच दिवस चालू होतं. नंतर आमचंही दोंडाईच्याला जाणं हळूहळू कमी झालं आणि छटाकीही माझ्या विस्मरणात गेली. कधीतरी पुढे सातवीत असताना मी दोंडाईच्याला गेले होते, त्यावेळी पुन्हा एकदा गप्पांच्या ओघात आमच्यात छटाकीचा विषय निघाला. तेव्हा मी लगेच आज्जीला विचारलं, “छटाकी आज्जी अजूनही येते का गं आपल्याकडे? बरीये का ती?” त्यावेळी आज्जीने सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून अचानक तिचं येणं बंद झालं आणि नंतर काही दिवसांनी असं कळलं की छटाकी आज्जी हे जग सोडून गेली. ते ऐकुन खरंतर खुप वाईट वाटलं होतं. रडूही आलं होतं.
तसं बघायला गेलं तर छटाकी आज्जी ही एक भिकारीण होती पण आमच्यासाठी आमच्या आज्जीसारखीच एक आज्जी होती, जिला आम्ही रोज न चुकता खायला द्यायचो, जिच्याशी प्रेमाने वागायचो आणि जिने आमच्या केसांतून फिरवलेला हात, आमचे घेतलेले गालगुच्चे आम्हाला आमच्या आज्जीइतकेच प्रेमळ वाटायचे!
- प्रणाली सिसोदिया




No comments:

Post a Comment